बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (11:12 IST)

तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला धोका नाही : मुश्रीफ

चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी
राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस बरेच प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र असेपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
 
‘तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’, अशा आशयाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील प्रचारसभेत केले होते. त्यानंतर भाजपने महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत पंढपूरची निवडणूक जिंकली. त्यामुळे आता भाजप राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. 
 
चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर या दोघांनी यासंदर्भात थेट भाष्य करणे टाळले असले तरी देवेंद्र फडणवीस बोलत असतील तर त्यामध्ये तथ्य असेलच, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेने जोर धरायला सुरुवात केली होती.
 
मात्र, हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना हे सर्व दावे फेटाळून लावले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचं हे सरकार पुढील २५ वर्षे चालेल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.
 
‘पंढरपूरात भगीरथ भालकेंच्या आईला उमेदवारी दिली असती तर…’
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा पराभव हा लोकांच्या नाराजीमुळे झालेला नाही. तर याठिकाणी रणनीती आखण्यात महाविकासआघाडी थोडीशी कमी पडली. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या आईला उमेदवारी दिली असती तर काम सोपं झालं असतं. मात्र, आम्ही हा निकाल स्वीकारला आहे, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
 
चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयी झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करत भुजबळ यांनी धमकी दिली होती. आता याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे.