शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (20:08 IST)

गंगापुर धरणांमधून पाणी सोडले।

gangapur dam
मराठवाड्याला नाशिक, नगरच्या जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मराठवाड्यातून करण्यात आली होती. यासाठी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे सर्व पक्षीय नेत्यांकडून आंदोलनही करण्यात आले होते. मराठवाड्यातील पाण्याचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. या वादावर न्यायालयाने मार्ग काढत जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता शुक्रवारी  रात्री उशिरा नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून जायकवाडीसाठी 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर रविवारी  सकाळपासून अहमदनगर जिल्ह्यातील निळंवडे धरणातून सुद्धा जायकवाडीसाठी 100 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील 48 ते 50 तासांमध्ये जायकवाडी धरणात पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीत पाणी सोडताना प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने रात्री उशिरा काढलेल्या आदेशानंतर रात्रीतूनच नगर, नाशिकच्या प्रकल्पांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळा, प्रवरा, दारणा या धरणांमधून पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. मात्र रात्री नाशिकमधील दारणा धरणातून विसर्गाला सुरुवात केल्यानंतर रविवारी सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील निळंवडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले.नगर, नाशिक जिल्ह्यातल्या या तीन धरणांमधून 8.603 टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात येणार आहे.
 
मराठवाड्यात दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कमी पाऊस पडला. ज्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. परंतु, याला कोणाचाही विरोध होऊ नये, यासाठी धरण क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्गावेळी नदीपात्रात कुणी उतरू नये, पाळीव जनावरांना जाऊ देऊ नये. विसर्गात अडथळा निर्माण होणार नाही याची नदीकाठच्या रहिवाश्यांनी दक्षता घ्यावी. प्रवाहामुळे काही जीवित वा वित्तहानी झाल्यास त्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे.