शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (17:03 IST)

राज ठाकरेंना 16 वर्षांत जे जमलं नाही, ते अरविंद केजरीवालांना 7 वर्षांत कसं जमलं?

फोटो साभार :Twitter
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची (आप) दणदणीत विजयाच्या दिशेनं घोडदौड सुरू आहे.
सुरुवातीचे आकडे पाहता 'आप'नं 117 पैकी 91 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता 'आप' आणि अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
 
दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 16 वा वर्धापन दिन 9 मार्च रोजी पुण्यात पार पडला. पण, आम आदमी पक्षाची 7 वर्षांची कामगिरी आणि मनसेची गेल्या 16 वर्षांची कामगिरी पाहिल्यास केजरीवालांना जे जमलं, ते मनसेला का जमलं नाही, असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.
 
आम आदमी पक्ष आणि मनसे
अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं गेल्या 7 वर्षांत दिल्लीत दोनदा सत्ता काबीज केली.
 
'आप'नं 2015 मध्ये पहिल्यांदा दिल्लीत 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. तर 2020 मध्ये दुसऱ्यांदा 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. दोन्ही वेळी 'आप'नं भाजप आणि काँग्रेसचा दणदणीत पराभव केला होता.
 
आता पंजाबमध्येही 'आप' एकतर्फी विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. 117 पैकी 90 हून अधिक जागांवर आपनं आघाडी घेतली आहे.
मनसेचा राजकीय प्रवास बघितला तर राज ठाकरे यांनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली.
 
पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरेंनी 2006 साली मुंबई महापालिकेत पहिल्यांदा निवडणूक लढवली. या निवडणुकीत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले.
 
त्यानंतर 2009 मधील विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मनसेचे 13 आमदार निवडून आणले. पण, 2014 आणि 2019च्या निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला.
 
'नुसती भूमिका नको, कामंही हवं'
 
'आप' आणि मनसेच्या स्थापनेची तुलना करताना हे दोन्ही पक्ष प्रस्थापितांच्या विरोधात सत्तेत आल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.
 
'द हिंदू' या वर्तमानपत्राचे प्रिन्सिपल करस्पॉँडंट आलोक देशपांडे यांच्या मते, "आम आदमी पक्ष जिथं जातो तिथल्या प्रस्थापितांविरोधात भूमिका घेतो. दिल्लीत आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी 'आप'ने हेच केलं. 'आप'चा हाच अॅप्रोच लोकांना आवडतो. मनसेचीही सुरुवात अशीच झाली. शिवसेनेतल्या प्रस्थापितांविरोधात राज ठाकरे यांनी बंड करत मनसेची स्थापना केली. लोकांना ते आवडलं आणि लोकांनी त्यांना सुरुवातीच्या काळात मतेही दिली.
 
"पण, मुद्दा हा आहे की तुम्ही ते टिकवून कसं ठेवता? लोकांनी एकदा निवडून दिल्यानंतर तुम्ही कसं काम करता ते महत्त्वाचं आहे. ते काम बघूनच लोक तुम्हाला निवडून देतात.
 
"आपच्या बाबतीत हा पक्ष नुसती भूमिका घेत नाही तर शाळा, पाणी, वीज असे सर्वसामान्यांच्या काळजाला हात घालणारे प्रश्न मांडत राहिला, त्याच्यावर काम करत राहिला. आपलं काम आप सातत्यानं जनतेत जाऊन त्यांना सांगत राहिला. सामान्य जनतेला ते आवडत राहिलं आणि आता आप पंजाबमध्ये सत्ता स्थापनेच्या मार्गावर आहे."
 
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी जेव्हा पंजाबमध्ये निवडणूक कव्हर करत होते, तेव्हा त्यांनाही असंच चित्र दिसलं. 'आप'नं दिल्लीत केलेली कामं पंजाबच्या जनतेपर्यंत पोहचवण्यात अरविंद केजरीवाल यशस्वी ठरल्याचं दिसत होतं. पंजाबच्या ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य जनतेच्या बोलण्यातून ते समोर येत होतं.
 
राज ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाविषयी आलोक देशपांडे सांगतात, "अरविंद केजरीवाल चतुर राजकारणी आहेत. आपल्यावर झालेली टीका आपल्या फायद्यासाठी कशी वळवून घ्यायची हे आजघडीला देशातल्या दोनच नेत्यांना जमतं. एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे केजरीवाल. पण, राज ठाकरे असं करू शकणार नाहीत. कारण, मराठी माणूस या भूमिकेला काऊंटर होईल, असं काही केलं तर आता त्यांचा जो काही बेस आहे, तोही त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो."
 
नवमतदार आणि संसाधनांची उपलब्धता
आपण विकासाचा एक नवा आयाम राजकारणाला देत आहोत, असा प्रचार करत 'आप'ने दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता काबीज केली आहे आणि एक मोठा नवमतदार राजकारणाकडे वळवला आहे, असं मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर सांगतात.
 
मनसेविषयी बोलताना आंबेकर पुढे सांगतात, "राज ठाकरेंच्या पक्षाच्या एकूण रचनेत नवमतदारांसाठी काहीही नाही. शिवसेनेत ज्यांना पदे मिळू शकली नव्हती त्यांचा भरणा या पक्षात होता. मनसेने आक्रमकपणात आघाडी घेतली. याला लोकांचा प्रतिसादही मिळाला, पण हे नवनिर्माण नव्हतं.
 
"केजरीवालांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात पक्ष काढला. पण राजकारणात भ्रष्टाचार हा मुख्य मुद्दा केला नाही. राज ठाकरेंनी नवनिर्माणासाठी पक्ष काढला आणि त्यांनी नवनिर्माणाचं राजकारण केलं नाही. राज ठाकरेंनी विरोधी पक्षाची स्पेस घेतली नाही. त्या स्पेसमध्ये काही दिवस ते होते, तेव्हा त्यांना यश मिळालं. मात्र त्यानंतर त्यांनी बऱ्याच तडजोडी केल्या आणि म्हणून राज्याच्या जनतेने त्यांना कधी निवडणुकीत यश दिले नाही."
अरविंद केजरीवाल आणि राज ठाकरे यांच्या कामगिरीची तुलना करताना संसाधनांची उपलब्धता हाही मुद्दा राजकीय विश्लेषकांच्या बोलण्यातून समोर येतो.
 
रवींद्र आंबेकर सांगतात, "आपकडे संसाधनांची कमी नव्हती. आलेल्या संसाधनांचं वाटप आणि नियोजनात त्यांनी प्रोफेशनल्सची मदत घेतलेली दिसतेय. राज ठाकरेंकडे मात्र तशी टीम नाही. 16 वर्षांत राज ठाकरे तशी टीम बनवू शकले नाहीत आणि तसं नॅरेटीव्हही लिहू शकले नाहीत. राज ठाकरेंनी आपणच महाराष्ट्रासाठी सक्षम पर्याय असल्याची प्रचार यंत्रणाही राबवली नाही.
 
"एका वाक्यात सांगायचं झालं तर राज ठाकरेंनी महाराष्ट्र जिंकण्यासाठी कधी रणनीतीच बनवली नाही आणि भाजपसारखा पर्याय असताना राज ठाकरेंच्या पदरात जनतेने बहुमत टाकावं अशा भूमिकेत ही ते कधी राहिले नाहीत."
 
मार्केटिंगमध्ये कमी पडलो हे खरं - संदीप देशपांडे
मनसेनं कामं केली, पण त्याचं मार्केटिंग व्यवस्थित केलं नाही, हे खरं आहे. पण, आता आम्ही आमची कामं जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. यासोबतच राज ठाकरेंचा करिश्मा पक्षासोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मनसे प्रस्थापितांना पर्याय ठरणार हे निश्चित आहे, असं मत मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी बीबीसी मराठीबरोबर बोलताना व्यक्त केलं.
 
पण, मनसेकडे महाराष्ट्र जिंकण्यासाठीची रणनीती नसल्याची टीका होते.
 
यावर संदीप देशपांडे म्हणतात, "मनसेकडे रणनीती आहे. रणनीती काही एका रात्रीत बनत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो."
 
पण, मनसेला आता 16 वर्षं झालीत आणि आम आदमी पक्षाला केवळ 7. त्यामुळे 16 वर्षांचा कालावधी मोठा आहे. यावर संदीप देशपांडे म्हणाले, "आपची गोष्ट वेगळी आहे. त्यांची पद्धत वेगळी आहे. आपला जे मिळालं त्याला पार्श्वभूमी आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे आप मोठं झालं. आम्ही मात्र सुरुवातीपासूनच एकटे लढतोय."
दरम्यान, 9 मार्च रोजी पुण्यात मनसेचा वर्धापनदिन पार पडला.
 
यावेळच्या कार्यक्रमात मनसेच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्रातील सामान्य लोक सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात, कारण इथं प्रश्न सुटेल असा त्यांना विश्वास आहे. ही लोक ज्या विश्वासानं आपल्याकडे येतात, तीच गेल्या 16 वर्षांतील आपली कमाई आहे."