शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By अभिनय कुलकर्णी|

वर्ध्याजवळ पंजाबातील तीन भाविक ठार

पंजाबमधील सुमारे शंभर भाविकांना नांदेड येथून देवदर्शन करून परत घेऊन येणार्‍या ट्रकला नांदेड येथूनच साखर घेऊन जाणार्‍या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन भाविक जागीच ठार झाले तर सुमारे १७ जण जखमी झाले. वर्ध्याजवळच असलेल्या सालोड हिरापूर परिसरात आज पहाटे हा अपघात झाला.

पंजाबच्या गुरुदासपूर येथील शीख समुदायाचे सुमारे शंभर भाविक एच.आर. ५८-एम ४५६२ क्रमांकाच्या ट्रकने देवदर्शनासाठी नांदेडला गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर परत येत असताना वर्ध्यानजिकच्या सालोड (हिरापूर) परिसरात लघुशंकेसाठी ट्रक थांबविण्यात आला. दोन भाविक लघुशंकेसाठी ट्रकमधून खाली उतरले. त्याचवेळी नांदेडहून नागपूरकडे साखर घेऊन भरधाव निघालेल्या एम.एच.२६ एच७४२७ क्रमांकाच्या ट्रकने उभ्या असलेल्या भाविकांच्या ट्रकला जोरदार धडक दिली.