शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 15 सप्टेंबर 2016 (14:37 IST)

१७ सप्टेंबरला पुण्यात 'मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवाचे' आयोजन

मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर 
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने पुण्यात 'मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मराठवाडा समन्वय समिती तर्फे देण्यात येणाऱ्या 'मराठवाडा भूषण' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. शैक्षणिक पुरस्कार नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलकुरु डॉ. पंडित विद्यासागर, कृषी पुरस्कार परभणीचे प्रगतिशील शेतकरी कांतराव देशमुख, प्रशासकीय पुरस्कार लातुरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उद्योजक पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक सचिन इटकर, कला-साहित्य पुरस्कार निर्माता-दिग्दर्शक दिलीप खंडेराव आणि सामाजिक पुरस्कार नळदुर्गच्या आपलं घर या मुलांच्या अनाथ आश्रमाला जाहिर झाला आहे. 
 
मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवाला विधानपरिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सत्याग्रही विचारधाराचे संपादक कुमार सप्तर्षी, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, महापौर प्रशांत जगताप उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन आणि मराठवाडा भूषण पुरस्कारांचे वितरण १७ सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होईल, अशी माहिती मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, सचिव दत्ताजी मेहेत्रे, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश इंगवले, सांस्कृतिक प्रमुख ज्योतिबा बळप, संघटक अॅड.विलास राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 
यावेळी महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच 'वैभवशाली मराठवाडा' या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. पुणे आणि परिसरात मराठवाड्यातील ७ ते ८ लाख नागरीक राहतात. या महोत्सवाला बहुसंख्य नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मराठवाडा समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे. 
 
१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, हे जरी खरे असले, तरी स्वातंत्र्यानंतर मराठवाडा मात्र निजामांच्या गुलामितच होता. अखेर १७ सप्टेंबर १९४८ साली भारत सरकारच्या आदेशाने लष्करी जवानांनी कारवाई करून निजामांचा पराभव केला आणि मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. हा दिवस 'मराठवाडा मुक्ति संग्राम दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने पुण्यात दरवर्षी मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने 'मराठवाडा मुक्तिदिन' महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे महोत्सवाचे नववे वर्ष आहे.