ओबामा - एक संघर्षरत प्रवास
अभिनय कुलकर्णी
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत बराक ओबामा यांची निवड झाली. हा क्षण आंतरराष्ट्रीय पातळीवरच अत्यंत महत्वाचा होता.एक कृष्णवर्णीय अध्यक्ष अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला तो याच वर्षी. डेमोक्रेटिक पक्षाकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी बराक ओबामा यांचीच निवड निश्चित होणार त्यावेळी ओबामांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. '''हा आपल्या देशासाठी अतिशय निर्णायक क्षण आहे. मी अत्यंत विनयाने आणि माझी कुवत लक्षात घेऊन हे आव्हान स्वीकारतोय. पण त्याचवेळी अमेरिकन लोकांच्या अफाट क्षमतेवरील निस्सीम श्रद्धेपोटीही मी ते स्वीकारतोय.''ओबामांचा हा प्रवास सहजी झालेला नाही. या प्रवासात खूप मोठा संघर्ष आहे. या प्रवासाची सुरवात ओबामांच्या जन्माअगोदरपासून झाली...... ओबामांचे वडिल हेही बराक ओबामाच. हे सिनियर ओबामा मुळचे आफ्रिकेतल्या केनियातले. शेळ्या सांभाळता सांभाळता त्यांनी शिक्षणातही चमक दाखवली आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. हे सिनियर ओबामा अत्यंत हुषार होते. शिष्यवृत्तीच्या आधारे ते अमेरिकेत हवाईमध्ये आले. शिक्षण घेताघेताच एन डनहम या गोर्या मुलीच्या प्रेमात पडले. दोघांनी रितसर लग्न केलं. पण अमेरिकी परंपरेप्रमाणे हे लग्न दोन वर्षच टिकलं. सिनियर ओबामा केनियात निघून गेले. तोपर्यंत ४ ऑगस्ट १९६१ ला बराक ओबामा (ज्युनियर) यांचा जन्म झाला होता. यानंतर सिनियर ओबामांनी आपल्याला मुलाला आयुष्यात फक्त एकदा पाहिलं. |
ओबामांच्या विधानाला अनेक पैलू आहेत. ओबामा हे वर्णाने काळे आहेत आणि याच अमेरिकेत काळे-गोरे हा संघर्ष दीर्घकाळ होता, त्याच अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष म्हणून आज त्यांची निवड झालीय. अमेरिकन लोकांमधल्या या बदलाचे ओबामा हे प्रतीक झाले आहेत. म्हणून |
|
|
इकडे ज्युनियर ओबामांच्या आईने लोलो सोएटोरो या इंडोनेशियन तरूणाशी लग्न केलं. लग्नानंतर हे कुटुंब इंडोनेशियात स्थलांतरीत झालं. ओबामा जाकार्तातच शाळेत जायला लागले. दहा वर्षांपर्यंत ते तिथेच होते. पण इंडोनेशिया त्यांना मानवलं नाही. ते रहात असेलल्या वस्तीत आरडाओरड, भांडणे, हाणामार्या, छेडछाड आणि व्यसनं हे सगळं काही नांदत होतं. याच वातावरणात ओबामांचं बालपण गेलं. तिथे रहाता रहाता मारीजुआना, कोकेन, दारू या अमली पदार्थांचा नाद त्यांनाही लागला. पण वेळीच त्यांच्या आईने धोका ओळखून त्यांना अमेरिकेत ओबामांच्या आजी-आजोबांकडे पाठवलं. होनोलुलूमध्ये त्यांचं पुढचं शिक्षण सुरू झालं. मग ७२ मध्ये त्यांची आईसुद्धा आपली डॉक्टरी पूर्ण करून अमेरिकेत परतली.पुढे शाळेनंतर कॉलेज शिक्षणासाठी ओबामांनी लॉस एंजिल्स गाठलं. तिथे ऑक्सिडेंटल कॉलेजमध्ये दोन वषे शिक्षण घेतल्यानंतर न्यूयॉर्कला कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे राज्यशास्त्रात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात बीए केलं. त्यानंतर ते शिकागोला गेले आणि तिथे तीन वर्षे कम्युनिटी ऑर्गनायझर म्हणून काम केलं. मग १९८८ मध्ये ते हॉर्वर्ड लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. पुढे ते इथेच हॉर्वर्ड लॉ रिव्ह्यूचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन अध्यक्ष बनले. हॉर्वर्डनंतर ओबामांनी शिकागोत वकिली सुरू केली. त्याचबरोबर सामाजिक चळवळीमध्येही ते उतरले. आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या नागरी हक्कांसाठी त्यांनी लढाई सुरू केली. त्याच्याच जोरावर त्यांनी इलिनॉईस राज्याची निवडणूक लढवली आणि ते लेजिसलेचर म्हणून निवडून आले. १९९६ ते २००४ या काळात त्यांनी ही भूमिका यशस्वीपणे पार पाडली. मधल्या काळात त्यांचे लग्न मिशेल या कृष्णवर्णीय वकिल मुलीशीच झाले. त्यांना दोन मुलीही झाल्या. ओबामांची दखल आता डेमोक्रॅटिक पार्टीत महत्त्वाचा माणूस म्हणून घेण्यात येत होती. म्हणूनच २००४ मध्ये झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात ओबामांनी केलेले भाषण महत्त्वाचे ठरले. ते म्हणाले, 'माझ्या वडिलांनी कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर शिष्यवृत्ती मिळवली आणि ते अमेरिकेत, एका जादुई जगात आले. या जगात जे आले त्यांना स्वातंत्र्य आणि संधीही मिळाल्या.' पुढे सिनेटच्या निवडणुकीत ते इलियॉनिसमधून निवडून आले. त्यानंतर मग त्यांचा प्रवास फक्त वरच्याच दिशेने सुरू राहिला. मीडीयात सतत त्यांच्याबद्दल लिहून येऊ लागले. त्यांची दोन पुस्तके बेस्ट सेलरही ठरली. 'ड्रिम्स फ्रॉम माय फादर' हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक तर खूपच गाजले. यानंतर त्यांची अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून वाटचाल सुरू झाली. त्यांना पहिला पाठिंबा मिळाला तो ऑप्रा विनफ्रेच्या टॉक शोमधून. ऑप्राने त्यांच्या तोंडून त्यांची निवडणूक लढविण्याची इच्छा काढली. आणि पक्षातर्फे उमेदवारीच्या स्पर्धेत ते उतरले. त्यांच्याविरोधात होत्या माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन. पण क्लिंटन यांना मागे सारून ओबामांनी अखेर उमेदवारी मिळवलीच. त्यांच्या उमेदवारीला माजी परराष्ट्रमंत्री कॉलीन पॉवेल, स्कॉट मॅकक्लिन यांनीही पाठिंबा दर्शवला. हिलरी आणि बिल क्लिंटन यांनीही नंतर ओबामांना पाठिंबा जाहीर केला.
ओबामा इराक मुद्यावर पहिल्यापासूनच अमेरिकी भूमिकेच्या विरोधात होते. इराकमध्ये हल्ला करण्यापू्र्वीपासूनच त्यांनी त्याचा निषेध करायला सुरवात केली होती. निवडणूक जाहीर झाली तेव्हा त्यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षातर्फे उभे ठाकले होते ते जॉन मॅक्केन हे मुत्सद्दी राजकारणी. सैनिकी पेशातून राजकारणाकडे वळालेले मॅक्केन हे येनकेनप्रकारे युद्ध जिंकण्याच्या वृत्तीनेच या 'निवडणूक युद्धा'त उतरले. रिपब्लिकन पक्षाप्रती असलेली नाराजी लक्षात घेता ओबामांना हरविणे जड जाईल हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ओबामांना बदनाम करायला सुरवात केली. त्यासाठी त्यांचे कृष्णवर्णीयपण चर्चेत आणले. मगओबामा मुस्लिम आहेत, असा अपप्रचार सुरू केला. 'बराक हुसेन ओबामा' असे संबोधूनच ते आपल्या भाषणाची सुरवात करायला लागले. पण या आरोपानंतरही ओबामा शांत होते. कृष्णवर्णीय असल्याच्या आरोपांचा उलट परिणाम होऊन ओबामांनाच त्याचा फायदा झाला. ओबामांनी मुस्लिम धर्माला सोडचिठ्ठी देऊन ख्रिश्चन धर्म अंगिकारल्याचेही त्यांनी लोकांना पटवून दिले. वैयक्तिक आयुष्यावर अशी चिखलफेक होऊनही ओबामांनी स्वतः मात्र पातळी सोडली नाही. त्यांनी ही निवडणूक मुद्यांवरच लढवली आणि अखेरीस त्याच आधारे ते यशस्वीही झाले. केनियातली मुळ असलेला एक काळा मुलगा अखेर जगातील महासत्ता असलेल्या देशाचा राजा झाला.