बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. मागोवा 2009
Written By विकास शिरपूरकर|

कॉंग्रेस आणि आंदोलनांसाठीही 'जय हो' ठरलेले वर्ष

- विकास शिरपूरकर

मुंबई हल्‍ल्‍यानंतर आंतरराष्‍ट्रीय राजकारणात पाकवर पुरेसा दबाव टाकण्‍यात आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्‍यातही अपयशी ठरलेले संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार पुन्‍हा सत्तेवर येणे. ' पीएम इन वेटींग' पासून 'पीएम वॉज वेटींग'पर्यंतचा भाजप नेते लालकृष्‍ण अडचाणींचा प्रवास आणि स्‍वतंत्र तेलंगाणा मागणीला केंद्राने मान तुकविल्‍याने पुन्‍हा उभी राहू पाहत असलेली लहान-लहान राज्‍यांच्‍या मागणीची आंदोलने या मावळत्‍या वर्षातील प्रमुख घटना ठरल्‍या.

लोकसभा निवडणू

मुंबई हल्‍ल्‍यानंतर पाकवर दबाव निर्माण करण्‍यात आलेले अपयश आणि सातत्‍याने वाढत चाललेली महागाई या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला लोकसभा निवडणुकांना सामोरे जावे लागले. अणू कराराच्‍या वेळी डाव्‍यांनी सोडलेली साथ, समाजवादी पक्ष आणि लालू प्रसाद यादव यांच्‍याशी निर्माण झालेला दुरावा तर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसाध्‍यक्ष शरद पवारांनी आघाडीतच राहूनही चालविलेले पडद्या मागील हालचाली यामुळे या निवडणुकीत संपुआचा पराभव होऊन त्रिशंकू लोकसभा निर्माण होईल असे भाकीत एक्झिट पोलने वर्तविले होते.

शरद पवार, मायावती व मुलायम सिंह यांनाही पंतप्रधानपदाची स्‍वप्‍ने पडू लागली होती. तर भाजपचे 'लॉंग वेटींग पीएम' ज्येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी तर पंतप्रधान झाल्‍या सारखेच काम सुरू केले होते. निवडणुकीच्‍या तोंडावर सुरू केलेली अडवाणींची वेबसाईट आणि इंटरनेटच्‍या जगतात सर्वाधिक सर्चेबल ठरण्‍यासाठी त्‍यांनी केलेला खटाटोप याही गोष्‍टी या निवडणुकीत प्रचंड चर्चेच्‍या ठरल्‍या.

मात्र तमाम एक्झिट आणि राजकीय पक्षांचे दावे फोल ठरवत शांत आणि मितभाषी व्‍यक्तीमत्वाचे धनी असलेल्‍या डॉ.मनमोहन सिंह यांनी पुन्‍हा सत्ता हस्‍तगत केली. मुलायम सिंह यांचा समाजवादी पक्ष, लालूप्रसाद यांचा राजद आणि प.बंगालमधली डावी आघाडी या ऐकेकाळच्‍या मित्रपक्षांसह सर्वांत मोठा विरोधी पक्ष भाजपलाही आसमंत दाखवत कॉंग्रेसने 200 जागा मिळवल्‍या. तर भाजपला अवघ्‍या 116 जागांवर समाधान मानावे लागले.

गांधी घराण्‍याचे आकर्षण या निवडणुकीतही महत्‍वाचे ठरले आणि राहुल गांधी यांनी रेकॉर्ड मते मिळवली. सोनिया गांधी यांची धोरणात्मक निर्णय क्षमता आणि राहुल गांधींचा थेट जनसंपर्क याबळावर 60 वर्षांत पहिल्‍यांदा उत्तर प्रदेशातून कॉंग्रेसने 19 जागा जिंकल्‍या. या राज्‍यात गांधी घराण्‍याचा आणखी एक वारसदार बराच गाजला वरूण गांधी यांच्‍या भाषणामुळे त्‍यांच्‍यावर लावण्‍यात आलेला रासुका... तरुंगवास आणि भाजपने त्‍याचे केलेले भांडवल हा देखिल या निवडणुकीतील चर्चेचा विषय ठरला.

भाजपची अधोगत

प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्‍यापेक्षा पक्षांतर्गतच विरोधकांना तोंड देण्‍यातच भाजपच्‍या प्रमुख नेतृत्वाला आपली ताकत खर्ची पाडावी लागली. निवडणुकीतील निकालानंतर तर हा वाद उघडपणे समोर आला. पराभवाची जबाबदारी कुणाची या संदर्भात नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप आणि माध्‍यमांतून उघडपणे केलेली टीका यामुळे पक्षशिस्‍तीचे अक्षरशः बारा वाजले. एवढे होऊनही पक्षाध्‍यक्ष राजनाथ सिंह किंवा अडवाणी याच्‍यापैकी कुणीही त्‍यावर नियंत्रण करू शकला नाही. याला जोडून नंतर दिल्‍ली आणि राजस्‍थान विधानसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार कोण हे मुद्देही चर्चेला आले. अखेर यात राजस्‍थानच्‍या माजी मुख्‍यमंत्री वसुंधरा राजे यांना विरोधी पक्ष नेत्यापदाचा राजीनामा द्यायला भाग पाडण्‍यात आले. हा प्रकार म्‍हणजे 'जखम मांडीला आणि मलम शेंडिला' असा असल्‍याची टीका झाली.

फाळणीस सरदार पटेल आणि पंडित नेहरू हेच जबाबदार असल्‍याची टीका केल्‍याबद्दल आणि पाकिस्‍तानचे संस्‍थापक मो.अली जिन्‍ना यांच्‍यावर पुस्‍तक लिहून त्याद्वारे त्‍यांचा उदोउदो केल्‍याचे कारण पुढे करून पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते जसवंत सिंह यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्‍यात आली. त्‍यामुळे तर हा वाद अधिकच वाढला अखेर रा.स्‍व.संघाच्‍या हस्‍तक्षेपानंतर पक्षातील वादळ शमले.

त्‍यानंतर पक्षात नेतृत्व बदल घडवत राजनाथ सिंह यांना पदावरून दूर करत त्‍यांच्‍या जागी महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्ष असलेल्‍या नितीन गडकरी यांच्‍याकडे राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदाची जबाबदारी सोपविण्‍यात आली. तर अडवाणींच्‍या विरोधी पक्ष नेतेपदी सुषमा स्‍वराज यांना बसविण्‍यात आले आहे. नवीन नेतृत्‍व पक्षात प्राण फुंकण्‍यात कितपत यशस्‍वी होते ते येणारा काळच ठरविणार आहे.

'चांद्रयान' मोही

मावळत्या वर्षात शास्त्रीय क्षेत्रात अनेक शोध भारताच्या नावे जमा झाले. राष्ट्रीय महत्वाच्या घटनेत सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र, बप्रह्मोसचे ब्लॉक टू आवृत्ती सेनात समाविष्ट करण्यात आली. स्वदेशी इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची तिसरी चाचणी यशस्वी ठरली व मे महिन्यात ओरिसा किनार्‍याजवळ व्हीलर बेटावरुन इंटरमीडिएट रेंजचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्री-2 व अग्री-3 तर ऑक्टोबर महिन्यात पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

देशाने रडार इमेजिंग सॅटेलाईट रीसॅट टू व समुद्र हेरगिरी उपग्रह ओशनसॅट-2 ची यशस्वी परीक्षण केले. 23 सप्टेंबर रोजी पीएसएलवी-सी 14 चे ओशनसॅट टू व 6 विदेशी नॅनो सॅटेलाईटसह पहिले पूर्ण व्यावसायिक उड्डाण करण्‍यात आले.

तथापि, चांद्रयान-1 चा ऑगस्ट 2009 पासून इस्त्रोचा संपर्क खंडीत झाला पण यापूर्वी 312 दिवसांपर्यंत चंद्राच्या कक्षेत राहत 3400 पेक्षा जास्त प्रदक्षिणा मारल्या व पृथ्वीवर पाठवलेल्या आकड्यांवरुन चंद्रावर पाणी असल्याचे सिद्ध झाले. या संशोधनास नासानेही दुजोरा दिल्‍याने चांद्रयान यशाची जगभर प्रशंसा झाली.

वायएसआर रेड्डींचे निध

एका प्रचार सभेत जात असलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेले निधन ही देखिल या वर्षातील सर्वांत मोठी घटना. रेड्डी यांच्या निधनाने राज्यात निर्माण झालेली पोकळी अजूनही भरुन निघालेली नाही.

जयपूर अग्निकां

ऑक्टोबर महिन्‍याच्‍या सुमारास जयपूर येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या तेल विहिरींना लागलेली आग देखिल या वर्षातील सर्वाधिक चर्चित घटना ठरली. देशातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी आग असून ती सुमारे 7 ते 8 दिवस चालली. यात 12 जण ठार झाले तर सुमारे 500 कोटींचे नुकसान झाले.

लिबरहान अहवा

बाबरी मशीद पतनाच्‍या घटनेचा अभ्‍यास करून त्या संदर्भात अहवाल सादर करण्‍यासाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या न्‍या.मनमोहनसिंह लिबरहान समितीने अखेर 17 वर्षांच्‍या कालखंडानंतर अहवाल सादर केला. वर्षाखेरीस संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनात हा अहवाल सादर करण्‍यात आला. अहवालात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचेही नाव आल्‍याने त्‍यावरून मोठा गदारोळ माजला.

स्‍वतंत्र तेलंगाणा राज्‍यासाठी आंदोल

स्‍वतंत्र तेलंगाणा राज्‍याची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पुढे करत तेलंगाणा राष्‍ट्र समितीचे नेते के.चंद्रशेखर राव यांच्‍या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. राव यांच्‍या उपोषणापुढे केंद्र सरकारने माघार घेत अखेर स्‍वतंत्र तेलंगाणा राज्याच्‍या निर्मितीस अनुकूलता दर्शविली. मात्र त्‍यानंतर आंध्र प्रदेशात सुरू झालेले विरोधाच्‍या आंदोलनाचे वादळ अद्यापही शमलेले नाही.

केंद्राने स्‍वतंत्र तेलंगाणाबद्दल अनुकूलता दर्शविल्‍यानंतर लहान राज्‍यांच्‍या मागणीस पुन्‍हा जोर आला आहे. विदर्भ, हरीतप्रदेश, ब्रज, गोरखालँड या राज्‍यांचीही नव्‍याने मागणी केली जाऊ लागली आहे.

एनडी तिवारी आणि सेक्सकां

आंध्र प्रदेश हे राज्य या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिले. मावळत्या वर्षाच्‍या अखेरच्‍या दिवसात राज्याचे राज्‍यपाल नारायण दत्त तिवारी राज भवनात तीन तरुणींसोबत अश्‍लील चाळे करत असतानाचे वृत्त एका तेलुगु वृत्तवाहिनीने प्रसारित केल्‍यानंतर देशभर खळबळ माजली. भाजपसह, तेलगु देसम पार्टी आणि डाव्‍या आघाडीनेही तिवारी यांच्‍या राजीनाम्याची मागणी केली. अखेर तिवारी यांना राजीनामा देणे भाग पडले.

यासह उत्तर प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्री मायावती यांनी पुतळा बांधकामासाठी केलेला कोट्यवधींच्‍या निधीचा गैरवापर आणि त्यानंतर सुरू झालेली कायद्याचा लढा, समलिंगी संबंधांना कायद्याने मान्‍यता देण्‍यासंदर्भात चर्चेला आलेला विषय आणि देशात स्‍वाईन फ्लूचा झालेला शिरकाव या मावळत्‍या वर्षातील प्रमुख घडामोडी ठरल्‍या.