शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन २०१०
Written By वेबदुनिया|

महानोरांनी उपटले सरकारचे कान

मराठीचा सन्मान टिकवण्यासाठी सरकारने प्रयत्न केलेत नाही असे नाही. पण त्या प्रयत्नांना आता शेवाळे लागले आहे. सरकार मोठा गाजावाजा करत भाषेच्या, कलांच्या जपवणूकीसाठी दालनं सुरू करतं, परंतु त्याचे पुढे काहीच होत नाही. अशी जहाल टिका करत पुण्याच्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक ना धो महानोर यांनी राज्यसरकारचे अक्षरश: कान उपटले आहेत.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच सांस्कृतिक खाते असते. परंतु साहित्य व कला क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार काहीच करत नसल्याची खंत महानोरांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

विंदांचे मोठेपण, मर्ढेकर, मुक्तीबोध, करंदीकर या साहित्यिकांनी महाराष्ट्राला दिलेले साहित्य मोती. असा प्रवास करतानाच महानोरांनी अचानक आपल्या भाषणाचा रोख व्यासपीठावर उपस्थित पुण्याचे पालक मंत्री अजित दादा पवार यांच्या दिशेने वळवला.

मंत्री हा कोणत्याही खात्याचा नसतो. तो राज्याचा मंत्री असतो. त्याच्यावर कोणतीही एक विशिष्ट जबाबदारी नसते. भोपाळ व गोव्यात कला अकादमींच्या माध्यमातून साहित्य व कलांना जोपासण्याचे काम केले जाते. महाराष्ट्र व मुंबई ही देशाची सांस्कृतिक, आर्थिक राजधानी असतानाही राज्यात मात्र अशा कला व साहित्याला प्रोत्साहन देणारे कोणतेही दालन नसल्याची खंत व्यक्त करत, तुम्ही पवार आहात. पवारांनी एखाद्या विषयात हात घातला की ते काम होतेच, त्यामुळे अजित दादा तुम्ही याकडे जरा लक्ष द्या असा चिमटाही महानोरांनी पवारांना काढला.

यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत साऱ्यांनी महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी केलेल्या कामाचा पाढाही महानोरांनी आपल्या भाषणात वाचला. संमेलने आणि महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून मराठी वाढत आहे. मराठी जिवंत आहे. यापुढेही मराठी जिवंतच राहणार आहे. मराठीची चिंता करायची गरज नसल्याचा चिमटा पुण्यातील 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक ना धो महानोर यांनी काढला.

मराठीच्या जागरणासाठी साहित्य संमेलन रूपाने मागील अनेक वर्षांपासून मेळावे घेतले जात असून, यातूनच मराठी जिवंत असल्याचे ते म्हणाले. विंदांच्या आज्ञेनेच आपण आज इथे उभे असून, त्यांच्या जाण्याची मोठी खंत वाटत असल्याचे महानोर म्हणाले. विंदांनी आपल्या हातात दिवा दिला होता तोच आपण पुढे नेत असल्याचे ते म्हणाले.

मर्ढेकर, करंदीकर मुक्तीबोध यांच्यामुळेच उत्तम कविता व उत्तम आयाम मिळाल्याने माझ्या पिढीच्या कवींना कविता लिहिता आल्या अशी कृतज्ञताही महानोरांनी व्यक्त केली.

विंदांचा व माझा परिचय 45 वर्षांचा आहे. कविता संवेदनाचं व जाणीवेचं भान असल्याचे महानोर म्हणाले. विंदांच्या अनेक आठवणींना महानोरांनी आपल्या भाषणात उजाळा दिला. तुकोबांनी जे दिले तेच करंदीकर बोलले.

करंदीकरांनी पाठीवर हात फिरवला व आशीर्वाद दिला यानंतर आपल्याला आणखी स्फुरण चढल्याचे ते म्हणाले. मराठी साहित्य, मराठी कवितांसाठी विंदांनी मोठे योगदान दिल्याचेही महानोर म्हणाले.

साहित्य संमेलन म्हणजे साहित्य शारदेची वार
साहित्य संमेलन म्हणजे पंढरीच्या वारीप्रमाणे असते. ज्या प्रमाणे पंढरपुरात अनेक वारकरी एकत्र येतात व विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असतात त्याच प्रमाणे साहित्य संमेलनासाठी स्वखर्चावर अनेक जण साहित्य संमेलनात जमतात. ती पंढरपुराची वारी तर ही साहित्य शारदेची वारी असल्याचे मनोहर म्हणाले.