मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : मंगळवार, 26 एप्रिल 2022 (15:41 IST)

साईसच्चरित - अध्याय ३१

sai satcharitra chapter 31
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
गताध्यायीं जाहलें कथन । सप्तशृंगीच्या भक्ताचें आख्यान । माधवरावांचा नवसही पूर्ण । साई फेडून घेववीत ॥१॥
कैसें दिधलें स्वप्नीं दर्शन । खुशालशेट रामलालालागून । कैसियापरी घेतलें ठेवूनि । आनिर्वाण रामलालाला ॥२॥
त्याहून अपूर्व ही प्रकृत कथा । श्रोतां परिसिजे अति सादरता । संन्यासी एक मानसा जातां । कैसा निजमुक्तता लाधला ॥३॥
कैसा मानकर नूलकर मेघा । यांचाही हेतु पुरविला अवघा । हे तर नर परी एका क्रूर वाघा । निजपदीं जागा दीधली ॥४॥
कथा आहेत अति विस्तृत । ग्रंथविस्तार होईल बहुत । कथीन संक्षिप्त सारमूत । होईल निजहितसाधक ॥५॥
अंतकाळीं जैसी मति । तैसी प्राण्यांस लाभे गति । किडे भीतीनें भ्रमर होती । हरिणप्रीती जडमरत ॥६॥
अंतकाळीं जें जें ध्यान । तें तेंच रूपें पुनर्जनन । भगवत्पदीं झालिया लीन । जन्मविहीन होई तो ॥७॥
याचकरितां नामस्मरण । लाविला अभ्यास हेंच कारण । प्रसंगीं जावें न गांगरून । अंतीं आठवण रहावी ॥८॥
आयुष्यभर जागृत राहिला । अंतकाळीं जरी कां निदेला । तरी तो शेवटीं फुकट गेला । यदर्थ केला सत्संग ॥९॥
म्हणूनि जे भक्त भावार्थी । ते झीव निरविती संतांहातीं । कीं ते जाणती गती - निर्गती । अंतींचे सांगाती ते एक ॥१०॥
ये अर्थींची गोड कथा । साईंसमोर घडलेली वार्ता । ऐकतां दिसेल श्रोतयां चित्ता । भक्तवत्सलता साईंची ॥११॥
कोठें मद्रास कोठें शिरडी । कोठें मानससरोवरदरडी । कैसी भक्तांची भरतां घडी । आणीत ओढीत पायांपाशीं ॥१२॥
एकदां एक मद्रासी संन्यासी । विजयानंद नाम जयासी । मद्रासेहून  मानस - सरोवरासी । महदुल्लासीं निघाला ॥१३॥
एका जपानी प्रवाशाचा । नकाशा मानस - सरोवराचा । पाहून निश्चय झाला मनाचा । दर्शनाचा उत्कट ॥१४॥
वाटेंत लागला शिरडी गांव । कर्णीं पडला बाबांचा प्रमाव । दर्शनाची धरूनि हांव । आले ठाव शोधीत ॥१५॥
साईमहाराज मोठे संत । कीर्तिमंत जगविख्यात । ऐकूनि धरिला दर्शनीं हेत । थांबले मार्गांत जातांना ॥१६॥
होते तेव्हां शिरडीमाजी । हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी । उभयतांची भेट सहजीं । भक्तसमाजीं जाहली ॥१७॥
तयांस मग संन्यासी पुसती । मानससरोवर तें दूर किती । पांचशें मैल स्वामी म्हणती । गंगोत्रीवरती आहे तें ॥१८॥
तेथें बर्फ फारचि पडतें । पन्नास कोसांत भाषा बदलते । भूतान - वासियां शंका येते । परस्थांतें बहु पीडा ॥१९॥
स्वामीमुखींचें वर्तमान । परिसोनि संन्यासी खिन्नवदन । जाहलें तयाचें दुश्चित्त मन । चिंतानिमग्न झाला तो ॥२०॥
घेतलें साईबाबांचें दर्शन । घातलें पायीं लोटांगण । चित्त झालें सुप्रसन्न । बैसले आसन घालुनी ॥२१॥
तों बाबांची खवळली वृत्ति । मग ते तेथील मंडळीस म्हणती । द्या हाकलून या संन्याशाप्रती । नाहीं संगती कामाची ॥२२॥
आधीं संन्यासी तो नवा । स्वभाव बाबांचा नाहीं ठावा । जरी खजील झाला जीवा । पहात सेवा बैसला ॥२३॥
प्रात:काळींचा दरबार । मशिदींत मंडळी चिकार । भक्रोपचार  पूजासंभार । पाहूनि तो गार झाला ॥२४॥
कोणी बाबांचे पाय धूती । पळींत अंगुष्ठतीर्थ घेती । शुद्ध सद्भावें सेवन करिती । नेत्र स्पर्शिती तैं कोणी ॥२५॥
कोणी लाविती तयांस गंध । कोणी फांसिती अत्तर सुगंध । ब्राम्हाण - शूद्रादि जातिनिर्बंध । गेले संबंध विसरूनि ॥२६॥
बाबा जरी भरले रागें । संन्यासी उचंबळला  अनुरागें । तयाचें पाऊल न निघे मागें । बैसल्या जागें उठेना ॥२७॥
राहिला शिरडींत दोन दिवस । इतुक्यांत पत्र आलें तयास । अत्यवस्थ माता गांवास । तेणें उदास तो झाला ॥२८॥
आईस भेटावें आलें मनीं । परत जावें स्वदेशालागुनी । परी न बाबांचे आज्ञेवांचुनी । पाऊल तेथूनि काढवे ॥२९॥
मग तें पत्र घेऊनि हातीं । संन्यासी गेला मशिदीप्रती । बाबांस करूं लागला विनंती । मातेची स्थिती निवेदुनी ॥३०॥
महाराज साई समर्था । मनीं मातेच्या भेटीची आस्था । आज्ञा दीजे प्रसन्नचित्ता । मज मार्गस्था कृपा करीं ॥३१॥
धांवोनि लागला बाबांचे चरणीं । होईल कीं आज्ञा कृपा करुनी । माता प्राण कंठीं धरुनी  । असेल धरणीं खिळलेली ॥३२॥
असेल पाहत माझी वाट । घेऊं द्या मज द्दष्टिभेत । होतील तिचे सह्य कष्ट । सुखें शेवट होईल ॥३३॥
साई समर्थ अंतर्ज्ञानी । त्याचेंच आयुष्य सरलें जाणुनी । वदती काय तयालागुनी । चित्त देउनी तें परिसा ॥३४॥
होता इतुका मातेचा लळा । तरी कां हा वेष स्वीकारिला । साजेना ममत्व या वेषाला । कलंक भगव्याला लाविला ॥३५॥
जा बैस त्वां व्हावें न उदास । जाऊं दे कीं थोडे दिवस । करूं मग पुढील विचारास । धीर त्वां चित्तास धरावा ॥३६॥
वाडयांत असती बहुत चोर । कवाडें लावोनि रहावें हुशार । सर्वस्वाचा करितील अपहार । घाला अनिवार घालितील ॥३७॥
वैभव कधींही नव्हे शाश्वत । शरीर हें तों सर्वदा अनित्य । जाणूनि मृत्यु नित्य सन्निहित । धर्म जागृत ठेवावा ॥३८॥
देहस्त्रीपुत्रादिकीं । अहंममाभिमान जो लोकीं । तत्प्रयुक्त तापत्रिकीं । अनर्थ ऐहिकी या नांव ॥३९॥
दुजा अनर्थ आमुष्मिक । जन जे जे परलोककामुक । परलोकही मोक्षप्रतिबंधक । अधोमुख सर्वदा ॥४०॥
तेथें नाहीं पुण्योपचय । तेथील प्राप्ति नाहीं निर्भय । क्षीणपुण्यें पतनभय । आहे नि:संशय तेथेंही ॥४१॥
तरी हे ऐहिक - आमुष्मिक । उभयही भोग अनर्थावहक । तयांचा त्याग  नि:शेख । आद्योत्पादक आनंदा ॥४२॥
संसारास जे जे विटले । अढळ हरिपदीं जे जे विनटले । तयांचा बंधाचें बिरडेंच फिटलें । धरणें उठलें अविद्येचें ॥४३॥
हरिभजनस्मरणाची घडी । पाप ताप दैन्य दवडी । ध्यानासी आणितां बहु आवडी । संकटीं उडी घाली तो ॥४४॥
तुझी पूर्वपुण्याई गहन । तेणेंच आलासि हा ठाव ठाकून । आतां मद्वचनीं द्यावें अवधान । करूनि घे साधन जीवाचें ॥४५॥
उद्यांपासून भागवताचें । परिशीलन करावें साचें । तीन सप्ताह त्या ग्रंथाचे । कायावाचामनें करीं ॥४६॥
होऊनियां निर्वासन । करीं त्या ग्रंथाचें श्रवण । अथवा मनोभावें वाचन । निदिध्यासनतत्पर ॥४७॥
प्रसन्न होईल भगवंत । सर्व दु:खांचा करील अंत । होईल मायामोह शांत । सौख्य अत्यंत लाभेल ॥४८॥
होऊनियां शुचिर्भूत । ठेवुनी हरिचरणीं चित्त । संपादीं हें साङ्ग व्रत । मोहनिर्पुक्त होशील ॥४९॥
आला निकट स्वदेहा अपाय । पाहूनि बाबांनीं हाच उपाय । योजिला वाचविला रामविजय । जेणें मृत्युंजय संतुष्टे ॥५०॥
दुसरे दिवशीं प्रात:काळीं । सारोनि मुखमार्जन अंघोळी । वाहूनि बाबांस पुष्पांजुळी । चरणधुळी वंदिली ॥५१॥
बगलेस मारिलें भागवत । पाहिजे वाचावयास एकांत । लेंडीस्थान मौजेचें शांत । पडलें पसंत तयांसी ॥५२॥
गेले बैसले घालूनि आसन । सुरू केलें पारायण । संन्यासीच ते भगवत्परायण । केले संपूर्ण दोन सप्ते ॥५३॥
करूं घेतां तिसरा सप्ता । वाटली एकाएकीं अस्वस्थता । वाढूं लागली अशक्तता । टाकिला अपुरता तैसाच ॥५४॥
आला वाडियांत परतोन । काढिले कष्टें दिवस दोन । उजाडतां तिसरा दिन । बुवांनीं नयन झांकिले ॥५५॥
ठेवूनियां निजशिर । फकीर बाबांचे मांडीवर । संन्यासी झाला तेथें स्थिर । मुक्तशरीर विदेही ॥५६॥
संन्याशाचें देहावसान । होतां बाबांस निवेदन । जाहलें तयांचें आज्ञापन । देह दिनभर ठेवावा ॥५७॥
इतुक्यांत टाकूं नका पुरून । होईल त्याचें पुनर्जीवन । लोकांनीं बहु आशा धरून । केलें रक्षण देहाचें ॥५८॥
गेला एकदां प्राण निघून । तो काय ये मागें परतोन । परी बाबांचा शब्द प्रमाण । देहाचें जतन तें केलें ॥५९॥
परिणामीं तें फळा आलें । निवारसी प्रेत रक्षितें गेलें । पोलिसांचे संशय फिटले । जीवन कसलें मेल्याचें ॥६०॥
हें काय बाबांस नव्हतें ठावें । कीं मेलेलें कैसें उठवावें । हेतु न योग्य चौकशीअभावें । भुईंत दाटावें त्या प्रेता ॥६१॥
निवारसीचा राजा धणी । चौकशी करी आकस्मिक मरणीं । व्हावी न आधींच प्रेताची दाटणी । म्हणोन बतावणी बाबांची ॥६२॥
असो पुढें हें सर्व झालें । यथाविधि प्रेत तें संस्कारिलें । योग्य स्थळीं मग तें पुरलें । कार्य उरकलें संताचें ॥६३॥
ऐसीच आणीक एक वार्ता । श्रोतयांलागीं कथितों आतां । परिसा क्षणभर सादर चित्ता । दिसेल व्यापकता साईंची ॥६४॥
भक्त एक बाळाराम । मानकर जयाचें उपनाम । होते बाबांचे भक्त परम । गृहस्थाश्रम करून ॥६५॥
परी पुढें तयांची भार्या । पंचत्व पावूनि आश्रमकार्या । व्यत्यय आला अंतरले स्थैर्या । परमैश्वर्या ते चढले ॥६६॥
पूर्वार्जित फलप्राप्ति । लाधली साईचरणसंगती । जडली तेथें निश्चल भक्ति । पूर्ण विरक्ति संसारीं ॥६७॥
आशापाश मुलें बाळें । तोडूनियां हे बंध सगळे । पहा मानकर दैवाआगळे । संसारावेगळे जाहले ॥६८॥
परमार्थद्वाराची अर्गळा । परसेवेची मोहनमाळा । घालूनियां निजपुत्रांचे गळां । ऐहिका टाळा दीधला ॥६९॥
हाही एक जातीचा संन्यास । संन्यासाच्या परी बहुवस । परी जों नव्हे ज्ञानगर्भन्यास । उपजवी त्रास पदोपदीं ॥७०॥
म्हणून हा साई उदारमूर्ति । मानकरांची अनन्यभक्ति । कृपा करावी आलें चित्तीं । केली विरक्ती द्दढ त्यांची ॥७१॥
अनंत जन्मींचें संस्कारपटल । चंचल मन राहीना अचल । मनोराज्याचे तरंग प्रबळ । वैराग्य अढळ ठरेना ॥७२॥
शिरडीच नव्हे माझें स्थान । मी तों देशकालानवच्छिन्न । दावावया हें सप्रमाण । करीत आज्ञापन मानकरां ॥७३॥
पुरे झाली आतां शिरडी । ही घे खर्चीं बारा रोकडी । तपार्थ जाईं मच्छिंदरगडीं । सुखनिरवडीं वस तेथें ॥७४॥
परिसूनि ऐसें साईवचन । आज्ञा करूनि शिरसा वंदन । घालूनि साष्टांग लोटांग लोटांगण । केलें अभिवंदन पायांचें ॥७५॥
होऊनियां अति विनीत । वदे बाळाराम साईंप्रत । नाहीं आपुलें दर्शन जेथ । काय म्यां तेथ करावें ॥७६॥
येथें नित्य पायांचे दर्शन । घडे चरणतीर्थसेवन । होई अहर्निश सह्जीं चिंतन । तेथें मी अकिंचन एकला ॥७७॥
तरी बाबा आपणांविरहित । काय तेथें माझें स्वहित । हें आकळाया नाहीं मी समर्थ । धाडितां मज किमर्थ ते स्थानीं ॥७८॥
परी न भक्तें धरावा अल्प । निजगुरुवचनीं ऐसा विकल्प । तात्काळ मनांत उठला संकल्प । निर्विकल्प मानकर ॥७९॥
म्हणे बाबा क्षमा कीजे । क्षुद्रबुद्धीचे विचार माझे । झालों शंकित तेणें मी लाजें । शंका न साजे ही मज ॥८०॥
मी तों आपुला आज्ञाघर । राहून नामस्मरणतत्पर । केवळ आपुल्या सामर्थ्यावर । गडावरही राहीन ॥८१॥
तेथेंही करीन आपुलें ध्यान । आपुल्या कृपामूर्तीची आठवण । आपुल्याच पायांचें चिंतन । हेंचि निरंतर तप माझें ॥८२॥
अनन्य - शरण मी तुम्हांप्रती । माझी गमनागमनस्थिती । दिधली असतां तुम्हां हातीं । हा कां चित्तीं विचार ॥८३॥
तावज्ञेची निजसत्ता । तेथेंही मनास देईल शांतता । ऐसी तुमची असतां समर्थता । व्यर्थ कां चिंता बाहूं मी ॥८४॥
साईसमर्थ ब्रम्हा सनातन । ब्रम्हालिखित तयांचें वचन । पाहील जो विश्वास ठेवून । घेईल पूर्ण अनुभव तो ॥८५॥
मग बाबा वदती तयासी । सावधान होऊनि मनासीं । परिस गा तूं मद्वचनासी । विकल्यासायासीं पडूं नको ॥८६॥
जाईं मच्छिंदरगडीं सत्वर । करीं प्रत्यहीं तप त्रिवार । कांहीं काळ क्रमिल्यावर । स्वानंदनिर्भर होसील ॥८७॥
ऐकतां ऐसें आश्वासन । मानकरांसी पडलें मौन । पुढें मी काय बोलूं दीन । गडाभिगमन आरंभीं ॥८८॥
पुनश्च लागोनि साईचरणा । पावोनि उदी प्रसादासीर्वचना । मग मानकर स्वस्थमना । मच्छिंदरभुवना निघाले ॥८९॥
ठाकोनियां तें रम्य स्थान । जेथें शुद्ध निर्मळ जीवन । मंद मंद वाहे पवन । समाधान पावले ॥९०॥
ऐसे मानकर साईप्रयुक्त । असतां गडावर साईवियुक्त । आचरिते झाले तप यथोक्त । यथानियुक्त राहूनि तैं ॥९१॥
पहा बाबांचा चमत्कार । तपनिमग्न असतां मानकर । प्रत्यक्ष दिधलें दर्शन गडावर । झाला साक्षात्कार तयांस ॥९२॥
होईल दर्शन समाधिस्था । यदर्थीं कांहीं नाहीं आश्चर्यता । परी आसनस्थित उत्थानावस्था । असतां श्रीसमर्था देखिलें ॥९३॥
नाहीं केवळ द्दष्टी देखिलें । बाळकरामें समक्ष पुसलें । कां मज बाबा येथें धाडिलें । काय दिधलें प्रत्युत्तर ॥९४॥
“शिरडींत असतां अनेक कल्पना । उठूं लागले तरंग नाना । म्हणोनि तुझिया चंचल मना । गडप्रयाणा नेमियलें ॥९५॥
पृथ्वी - आपादिकांच्या गारा । रचोनि रचियेल्या या अगारा । साडेतीन हातांचिया घरा । शिरडीबाहेरा नव्हतों तुज ॥९६॥
आतां जो येथें तोच कीं तेथें । पाहूनि घेईं स्वस्थचित्तें । तेथूनि जें म्यां पाठविलें तूतें । तें येच निमित्तें तूं जाण” ॥९७॥
असो पुढें हे मानकर । उद्दिष्ट काळ क्रमिल्यावर । यावया आपुल्या मुक्कामावर । सोडिला मच्छिंदरगड त्यांनीं ॥९८॥
वांद्रें ग्राम वसतिस्थान । यावें तेथें जाहलें मन । दादरपर्यंत पुण्हाहून । योजिलें प्रयाण अग्निरथें ॥९९॥
गेले पुणाचे स्टेशनावर । येतां तिकीट घेण्याचा अवसर । होतां खिडकीपाशीं सादर । वर्तला चमत्कार तंव एक ॥१००॥
लंगोटी एक कटिप्रदेशीं । खांदां कांबळी कुणबी वेषीं । ऐसा एक अनोळखी प्रवासी । खिडकीपाशीं देखिला ॥१०१॥
घेऊनि दादरचें तिकीट । कुणबी मागें फिरे जों नीट । बालकरामाची द्दष्टाद्दष्ट । होतांचि निकट पातला ॥१०२॥
म्हणे तुम्ही कोठें जातं । ‘दादरास’ बाळकराम वदतां । तिकीट देऊनि टाकिलें तत्त्वतां । म्हणे हें आतां तुम्ही घ्या ॥१०३॥
मीही जाणार होतों तेथें । परी महत्कार्यांतर येथें । कर्तव्य आहे आठवलें मातें । म्हणून जाणें तें राहिलें ॥१०४॥
वेंचितांही गांठीचे दाम । तिकीट मिळविणें कठीण काम । तें जैं लाधे अविश्रम । संतोष परम मानकरां ॥१०५॥
पुढें तें मोल चुकवावयाला । खिशांतून जों पैका काढिला । तोंच तो कुणवी दाटींत घुसला । कोठें निसटला कळेना ॥१०६॥
तेव्हां तो कुणबी शोधावयाला । बाळकरामें प्रयत्न वेंचिला । परी तो सर्व निष्फळ गेला । येऊनि ठेला अग्निरथ ॥१०७॥
नाहीं जोडा वहाण पायीं । फटकूर एक वेष्टिलें डोई । कांबळ लंगोटी लावी । कुणबी भाई हा कोण ॥१०८॥
भाडें नाहीं थोंडे थोडकें । तेंही देऊनि पल्लवचें रोकडें । कां मज आभाराचें सांकडें । घातलें हें कोडें नुलगडे ॥१०९॥
उदार आणि निरपेक्ष स्वांतीं  । ऐसा हा कोण कुणबी वरकांती । राहून गेलें अनिश्चित अंतीं । लागली खंती मानकरां ॥११०॥
तैसेच मग ते आश्चर्यचकित । धरोनि भेटीचा पोटीं हेत । अग्निरथ जागेचा हालेपर्यंत । ठेले तटस्थ द्वारांत ॥१११॥
पुढें जेव्हां गाडी सुटली । समूळ भेटीची आशा खुंटली । जाणून गाडीची खीळ पकडिली  । उडी मारिली गाडींत ॥११२॥
गडावरील प्रत्यक्ष गांठ । तैसाच इकडे हा निराळा घाट । पाहून कुणब्याचा विचित्र थाट । लागली चुटपुट मानकरां ॥११३॥
असो पुढें हे सद्भक्त । साईपदीं पूर्णानुरक्त । द्दढ श्रद्धा भक्तिसंयुत । जाहले कृतार्थ शिरडींत ॥११४॥
साईसंलग्नपदाब्जरजीं । साईनामाची घालीत रुंजी । भक्त - भ्रमर बालकरामजी । शिरडीमाजींच राहिले ॥११५॥
घेऊनि बाबांचें अनुज्ञापन । मुक्तारामजी सवें घेऊन । कधीं कधीं हे शिरडी सोडून । करीत भ्रमण बाहेर ॥११६॥
परी शिरडी केंद्रस्थान । वेळोवेळीं येत परतोन । अखेर जाहलें देहविसर्जन । परम पावन शिरडींत ॥११७॥
धन्य पूर्वकृत भागधेय । होऊनि साईंचा द्दष्टिविषय । लागून तयां पायीं लय । मरण निर्भय पावे जो ॥११८॥
धन्य तात्यासाहेब नूलकर । धन्य मेघा भक्तप्रवर । अंतीं शिरडींत भजनतत्पर । जिंहीं कलेवर विसर्जिले ॥११९॥
मेघा जेव्हां पावला पंचत्व । पहा तैं रत्तरविधानमहत्त्व । आणीक बाबांचें भक्तसख्यत्व । मेघा तो कृतकृत्य आधींच ॥१२०॥
सवें  घेऊन भक्त समस्त । स्मशानयात्रेस गेले ग्रामस्थ । बाबाही गेले स्मशानाप्रत । पुष्पें वर्षत मेघावर ॥१२१॥
होतां मेघाचें उत्तरविधान  । बाबाही झाले साश्रुलोचन । मायानुवर्ती मानवासमान । शोकनिर्विण्ण मानस ॥१२२॥
प्रेमें बाबांनीं जिजकरें । प्रेत आच्छादिलें सुमननिकरें । शोकही करूनि करुणस्वरें । मग ते माघारे परतले ॥१२३॥
मानवांचा उद्धार करिती । ऐसे संत देखिले बहुतीं । परी साईबाबांची ती महती । वर्णन किती करावी ॥१२४॥
व्याघ्रासारिखा क्रूर प्राणी । तो काय मनुष्यापरी ज्ञानी । परी तोही लागे तयांचे चरणीं । अघटित करणी बाबांची ॥१२५॥
ये अर्थींची रम्य कथा । परिसा नीट देऊनि चित्ता । मग कळेल बाबांची व्यापकता । समचित्तता सकळिकीं ॥१२६॥
शिरडीस एकदां चमत्कार झाला । असतां सप्त दिन निर्याणाला । गाडा एक बैलांचा आला । राहिला उभा द्वारांत ॥१२७॥
वरी एक व्याघ्र प्रचंड । गळां जयाचे साखळदंड । जखडून टाकिला उदंड । भेसूर तोंड मागिलीकडे ॥१२८॥
त्याला कांहीं होती व्यथा । दरवेशी थकले उपाय करितां । संतदर्शनोपाय सरता । मानला चित्ता तयांचे ॥१२९॥
होते ते दरवेशी तीन । तो व्याघ्र त्यांच्या जीविकेचें साधन । गांवोगांवीं खेळ करून । करिती गुजराण आपुली ॥१३०॥
फिरतां फिरतां त्या बाजूला । कर्णीं आली बाबांची लीला । म्हणती दर्शन घेऊं चला । वाघही नेऊं ते ठायीं ॥१३१॥
चरण तयांचे चिंतामणी । अष्टसिद्धी लोटांगणीं । नवनिधी येती लोळणीं । घेती पायवणी तयांचें ॥१३२॥
माथा ठेवूं तयां चरणीं । दुवा मागूं व्याघ्रालागुनी । संतांच्या आशीर्वादवचनीं । कल्याण होईल सर्वांचें ॥१३३॥
एतदर्थ ते दरवेशी । व्याघ्रास उतरविती द्वारापाशीं । घट्ट धरूनि साखळदंडासी । तिष्ठत द्वारासीं राहिले ॥१३४॥
आधींच हिंस्र भयानक मस्त । वरी होता तो रोगग्रस्त । तेणें तो अत्यंत अस्वस्थ । कौतुक समस्त पाहती ॥१३५॥
व्याघ्राची स्थिती बाबांचे कानीं । घातली समग्र दरवेशांनीं । बाबांची आधीं संमति मिळवुनी । आले परतोनी दाराशीं ॥१३६॥
साखळदंड द्दढ कसिती । तोडून न पळे ऐसें करिती । मग त्यास सांभाळूनि आणिती । साईप्रती समोर ॥१३७॥
पाहोनि साई तेजोराशी । व्याघ्र येतांच पायरीपासीं । नकळे काय दचकला मानसीं । अत्यादरेंसीं अधोमुख ॥१३८॥
काय पहा चमत्कार । होतां परस्पर नजरानजर । व्याघ्र चढतांच पायरीवर । प्रेमपुर:सर निरीक्षी ॥१३९॥
लगेच पुच्छाचा गोंडा फुलविला । त्रिवार धरित्रीं प्रहार केला । साईचरणीं देह ठेविला । विकळ पडला निश्चेष्ट ॥१४०॥
एकदांच भयंकर डरकला । तात्काळ ठायींच पंचत्व पावला । जन सकळ विस्मयापन्न झाला । व्याघ्र निमाला पाहूनि ॥१४१॥
एकेपरी दरवेशी खिन्न । पुनश्च तेच दिसले प्रसन्न । कीं रोगग्रस्त आसन्नमरण। प्राणी निर्वाण पावला ॥१४२॥
साधुसंतांचे द्दष्टीसमोर । प्राणोत्क्रमणीं पुण्य थोर । कृमि कीटक वा व्याघ्र । पाप समग्र तो तरला ॥१४३॥
कांहीं मागील जन्माचा ऋणी । फेडिलें ऋण झाला अनृणी । देह ठेविला साईचरणीं । अघटित करणी विधीची ॥१४४॥
ठेवितां संतपदीं डोई । जया प्राणिया मरण येई । सवेंच तो उद्धरोनि जाई । हीच कमाई जन्माची ॥१४५॥
असल्यावीण भाग्याचा थोर । संतांचिया द्दष्टीसमोर । पडेल काय उगाच शरीर । होईल उद्धार तयाचा ॥१४६॥
साधूंचिया द्दष्टीसन्मुख  । देह ठेवितां परमसुख । पीतां विख होय पीय़ूख । मरणाचा हरिख ना दु:ख ॥१४७॥
द्दष्टीपुधें संतचरण । असतां जया प्राणिया मरण । धन्य देह तो कृष्णार्पण । पुनर्जनन नाहीं त्या ॥१४८॥
संतांचिया द्दष्टीसन्मुख । मरण नव्हे तें वैकुंठसुख । जिंकिला तेणें मृत्युलोक । न पुनर्भव शोक तया ॥१४९॥
संतांचेखतां देह त्यागिती । तयां नाहीं पुनरावृत्ति । तीच सर्व पापांची निष्कृती । उद्धारगती पावला ॥१५०॥
आनखाग्र संतावलोकन । करितां करितां जें देहपतन । तया काय म्हणावें मरण । निजोद्धरण तें साचें ॥१५१॥
पाहूं जातां पूर्वविधान । कोणी तरी हा पुण्यवान । मिरवूं जातां विद्याभिमान । पावला अवमान हरिभक्त ॥१५२॥
तयाचिया शापापासुनी । पावला ही क्रूर योनी । उ:शापयोगें लागला चरणीं । अभिनव करणी भक्तांची ॥१५३॥
वाटे जाहला त्या उ:शाप । साईदर्शनें जळलें पाप । तुटले बंध सरले ताप । झाला आपाय उद्धार ॥१५४॥
पूर्ण सभाग्य असल्यावीण । कैंचें संतद्दष्टीपुढें मरण । त्रिताप त्रिपुटी त्रिगुण मर्दन । होऊनि निर्गुण ठाकला ॥१५५॥
ऐसा पूर्वकर्मानुबंध । सुटला क्रूरदेहसंबंध । तुटला लोहशृंखलाबंध । ईश्वरी निर्बंध हा एक ॥१५६॥
साधुतांच्या चरणांपरती । इतरत्र कोठें उद्धारगती । ती लाधतों या व्याघ्राप्रती । प्रसन्न चित्तीं दरवेशी ॥१५७॥
व्याघ्र तयांचें चरितार्थसाधन । व्याघ्र तयांचें कुटुंबपोषण । तया व्याघ्राला येतां मरण । खिन्नवदन दरवेशी ॥१५८॥
दरवेशी महाराजांस पुसती । आतां पुढें कैसी गती । कैसी द्यावी मूठमाती । लावा सद्नति निजहस्तें ॥१५९॥
महाराज म्हणती न करा खंत । येथेंच होता तयाचा अंत । तोडी मोठा पुण्यवंत । सौख्य अत्यंत पावला ॥१६०॥
त्या तक्क्याचे पलीकडे । शंकराचें देऊळ जिकडे । नेऊन त्याला पुरा तिकडे । नंदीनिकट द्या गती ॥१६१॥
पुरलिया तेथें तयाप्रती । लाधेल तोही सद्नती । ॠणनिर्मुक्ति बंधमुक्ति । तुमचिया हस्तीं पावेल ॥१६२॥
गतजन्मींचा देणेदार । फेडावया ऋण हा अवतार । तुमचिया बंधनीं साचार । तो आजवर राहिला ॥१६३॥
दरवेशी मग उचलून तयासी । जाते जाहले देउळापाशीं । नंदीचिया पश्चात्प्रदेशीं । तया खांचेशीं दाटिती ॥१६४॥
काय तरी चमत्कार वहिला । व्याघ्र तात्काळ कैसा निमाला । प्रकार इतुकाचि असता घडला । विसर पडला असता कीं ॥१६५॥
परी येथूनि सातवेच दिनीं । बाबांनीं देह ठेविला धरणीं । तेणें ही आठवण वरचेवर मनीं । उचंबळोनी येतसे ॥१६६॥
पुढील अध्याय याहून गोड । बाबांहीं वर्णिलें निजगुरुचें कोड । पुरविली गोखलेबाईंची होड । अनुग्रह जोड देउनी ॥१६७॥
हेमाड साईनाथांसी शरण । गुरुहस्तें कूपीं उफराटें टांगवून । कैसा बाबांनीं कृपा संपादन । केली तें श्रवण करावें ॥१६८॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । दर्शनमहिमा नाम एकत्रिंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥