शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (21:52 IST)

छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?

काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. महाराजांच्या नितीचा त्याग केलेल्या लोकांनी महाराजांचा अपमान झाल्याच्या वावड्या उठवल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. महाराजांच्या नावावर इथे राजकारण खेळले जाते, त्यांच्या नावावरून पक्षाची निर्मिती होते. त्यांचा अपमान झाल्याच्या वावड्या उठवून स्वतःची पोळी भाजली जाते. कुणी म्हणतो त्यांचा एकेरी उल्लेख केला तरी अपमान आहे. त्यांचा एकेरी उल्लेख करू नये असे काही जणांचे मत आहे.
 
मला या सगळयांच्या पलीकडे जाऊन महाराजांचा विचार करावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? या प्रश्नाच्या मुळाशी जावंस वाटतं. महाराज कोण होते म्हणजे? त्यांचं मूळ, त्यांचं कूळ, जात, भाषा आणि प्रांताबद्द्ल मी बोलत नाही. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने किल्ले रायगड व अशा ४० किल्ल्यांवरील माती ५ ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनासाठी नेली जाणार आहे. ही बातमी वाचून मला खूप आनंद झाला. कारण या बातमीतच छत्रपती शिवाजी महाराज कोण होते याचं उत्तर लपलेलं आहे.
 
मी जिथे राहतो त्या विभागात एक जागरुत श्रीराम मंदिर आहे. बाजूला हनुमंताचं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की राम मंदिरात जे शिवलिंग आहे, त्या शिवलिंगाचं दर्शन वसई किल्ला सर करण्याआधी चिमाजी अप्पांनी घेतलं होतं. महादेवांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी पराक्रम केला होता. बाजूला जे हनुमान मंदिर आहे त्यातील मूर्ती एका रामदासींनी स्थापन केली आहे. हा सबंध मंदिर परिसर खूपच अध्यात्मिक वातावरणाने भरलेला आहे. मी अगदी लहानपणापासून या मंदिरात जातो, मी तिथला कार्यकर्ताही आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून मी त्या मंदिरातल्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीसमोर उभा राहून आयोद्ध्येत भव्य राम मंदिर व्हावं यासाठी प्रार्थना करायचो. कोर्टाचा निकाल जेव्हा राममंदिराच्या बाजूने लागला तेव्हा आम्ही (मी आणि माझ्या कुटुंबियांनी) पेढे आणून देवापुढे ठेवले. कोणत्याही हिंदूसाठी हा सगळ्यात मोठा आनंद होता आणि ज्या हिंदूला आनंद झाला नाही तो हिंदू नाही असं माझं ठाम मत आहे. रवींद्रनाथांना पुरस्कार मिळाल्यावर सावरकरांनी तुरुंगात आनंद व्यक्त केला होता... भगतसिंह आणि राजगुरुंनी सौंडर्सचा वध केल्यानंतर सावरकरांनी रत्नागिरीच्या वास्तव्यामध्ये आपल्या घरी आनंदोत्सव साजरा केला होता. राष्ट्रीय आनंदोत्सव वैयक्तिक अथवा सामाजिक पातळीवर साजरा करण्याची परंपरा सावरकरांनी आपल्याला घालून दिलेली आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर होणार आणि त्यासाठी रायगडाची माती... हा एक सुंदर योग आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्य, त्यांची नीतिमत्ता, परस्त्री विषयीचा त्यांना असलेला आदर हे गुण आपल्याला माहिती आहेत. परंतु या सगळ्या गुणांच्या व्यतिरिक्त एक विशेष बाब महाराजांमध्ये होती, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पहिले क्रांतिकारक होते, ज्यांनी आपल्याला सांगितलं की हा देश आपला आहे, यावर सर्वप्रथम आपला अधिकार आहे, इथे आपलं राज्य असलं पाहिजे, स्वराज्य असलं पाहिजे. शिवरायांनी हे केवळ सांगितलंच नाही तर कृती केली. इस्लामी साम्राज्य हे परकीय साम्राज्य आहे. ते मोडून टाकून इथे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं... ही त्यांची श्रद्धा होती आणि पाहा, आज आपण स्वराज्य स्थापन केलं आहे... इथे आज आपलं राज्य आहे. या मातीतल्या लोकांचं राज्य आहे. ज्यूंचा स्वतःचा असा इस्रायल नावाचा देश आहे. तो देश त्यांनी पराक्रमाने निर्माण केला आहे. (जगामध्ये केवळ पाकीस्तान नावाचा देश आहे जो संघर्ष न करता निर्माण झाला आहे). छत्रपती शिवाजी महाराजांची जी निष्ठा होती तशीच निष्ठा ज्यू लोकांनी दाखवली... "नेक्स्ट इयर इन जेरुसलेम" हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं... ही श्रद्धा होती त्यांची... ती श्रद्धा विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली आहे. महात्मा गांधी शिवरायांचं तत्व त्यागून ज्या राम राज्याची चर्चा करत होते, ते राम राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं आहे.
 
जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मनावर बिंबवलं नसतं की हा देश आपला आहे, तर आज आपण स्वधर्माचं पालन करत नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही त्यांची युद्धनीति सांगाल, नीतिमत्ता सांगाल, रयतेविषयी असलेली त्यांची धारणा सांगाल... पण जर "हा देश आपला आहे आणि या देशावर आपलं राज्य असलं पाहिजे" हे शिवरायांचं मूळ तत्व तुम्ही सांगू शकला नाही तर शिवचरित्र पूर्ण होणार नाही. जसं महादेवाच्या मंदिरात शिरण्याआधी नंदीला नमस्कार करावा लागतो. त्याचप्रमाणे शिवचरित्र सांगताना, समजून घेताना हे तत्व तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे. ज्यावेळी प्रत्येक राजे आपापल्या राज्याचा विचार करत होते त्यावेळी आर्य चाणक्यांनी अखंड भारताचा अट्टहास धरला. आर्य चाणक्यांची परंपरा मधल्या काळात नाहिशी झाली, छत्रपती शिवाजी महाराजांनी ती परंपरा पुनरुज्जिवीत केली. सावरकर आदि क्रांतिकरकांनी त्यावर कळस बसवला... ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस... ज्ञानदेवांनी अध्यात्मिक चळवळीचा, भक्ती सांप्रदायाला पाया रचला त्याचप्रामाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी देशभक्तीचा, स्वातंत्र्यप्राप्तीचा पाया रचला आहे. भक्ती चळवळीतल्या वारसदारांना जसे वारकरी म्हटलं जातं तसं शिवरायांच्या वारसदारांना धारकरी म्हटलं जातं... पण ही धार आता तलवारीला नाही तर मनाला करायची आहे...
 
राम मंदिरासाठी रायगडाची माती घेऊन जाणे म्हणजे ही छत्रपती शिवरायांना खरी आदरांजली आहे. माता सीतेला सोडवण्यासाठी हनुमंतांनी प्रभू रामचंद्रांना सहाय्यता केली... स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांनी रामचंद्रांच्या विजयासाठी मोठे पराक्रम केले. यामागे त्यांचा कोणताच स्वार्थ नव्हता. त्याचप्रामणे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य म्हणजेच रामराज्य स्थापन करण्यासाठी हनुमंतांप्रमाणे झटले... ते हनुमंत सीतेला सोडवण्यासाठी रावणाशी लढले तसे आमचे हे हनुमंत सीतासमान भारतमातेला सोडवण्यासाठी मुघल आदि रावणांशी लढले. महाराष्ट्रात स्थापन केलेले स्वराज्य त्यांना प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करायचे होते... सबंध भारत एकसंध करायचा होता. पण त्यांची इच्छा त्यानंतर जन्मलेल्या पिढ्यांनी पूर्ण केली आहे. आता तर रायगडाची माती आयोध्येच्या भूमीशी एकरुप होणार आहे. युद्ध जिंकल्यानंतर भरलेल्या डोळ्यांनी ज्या आत्मीयतेने आणि प्रेमभावनेने प्रभू श्रीरामचंद्रांनी हनुमंतांना मिठी मारली त्या आत्मीयतेने आणि प्रेमभावनेने ५ ऑगस्टला प्रभू श्रीरामचंद्र छत्रपती शिवाजी महाराजांना मीठी मारणार आहेत... आयोद्ध्येची माती आणि रायगडाची माती एकरुप होणार आहे. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं शिवराय म्हणायचे, ते श्री म्हणजे श्रीराम आहेत... ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आजकाल अनेक लेखक व वक्ते निर्माण होत आहेत. ते इतिहासाच्या नावाखाली लोकांना माहिती सांगतात. पण ज्याप्रमाणे अध्यात्मिक क्षेत्रात निरुपण केलं जातं, ते निरुपण इथेही आवश्यक आहे. आम्हला माहिती नको, ती पुस्तके वाचूनही मिळेल. आम्हाला भावार्थ हवा आहे. तो भावार्थ सांगण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे इथल्या मातीवर तुमचं जीवापाड प्रेम असायला हवं, सागरा प्राण तळमळला हे गीत ऐकताना तुमच्या डोळ्यांत अश्रू यायला हवेत, अफझलखानवधाच्या कथा ऐकताना तुमचा ऊर अभिमानाने भरुन यायला हवा आणि १९०० नंतरच्या इतिहासाचा व्यवस्थित, सेक्युलर पद्धतीने अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. तरंच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळू शकतील. अन्यथा कठीण आहे.
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री