गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (13:08 IST)

श्रावण सोमवार पूजा विधी, महत्व आणि कथा

श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे या काळात शिवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व असल्याचे मानलं जातं. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात तसंच इच्छित फळ प्रदान करतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
 
पूजा विधी
श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून स्नान करावे.
गंगा जल किंवा एखाद्या पवित्र नदीचं पाणी घरात शिंपडावे.
त्यानंतर व्रताचा संकल्प करावा.
श्रावण सोमवारी उपवास करावा.
देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी.
नंतर एका ताम्हणात शंकराची पिंड ठेवावी.
शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा.
महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावं.
महादेवासमोर दिवा लावावा.
पूजा करताना “ॐ महाशिवाय सोमाय नम:” किंवा “ॐ नम: शिवाय” या मंत्राचा जप करावा.
शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी.
धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरुन वाहावी, ही शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणावा-
नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने ।
शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।
 
तसेच, शिवामूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा”, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी.
शंकराची आरती करावी आणि मनोभावे प्रार्थना करावी.
पूजन केल्यावर कहाणी करावी.
 
दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा.
 
तसंच नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. पहिल्या सोमवारी मूठभर तांदूळ, दुसर्‍या सोमवारी तीळ, तिसर्‍या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस, आणि पाचवा सोमवार आल्यास सातूची शिवमूठ शिवाला वाहतात.