शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

कलमाडी पुन्हा गोत्यात !

WD
२०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान मॉरिशस येथील कंपनीला ७० कोटींचे कंत्राट देण्यात आलेल्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या सुरेश कलमाडींच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सीबीआयने सुरेश कलमाडी यांची आज कसून चौकशी केली.

पुण्याचे काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांची आज सुमारे तीन तास कसून चौकशी करण्यात आली आणि यावेळी या वादग्रस्त कंत्राटासंबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ३ ते १४ ऑक्टोबर २०१० या कालावधीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचे सुशोभीकरण आणि व्यवस्था पाहाण्यासाठीचे कंत्राट याच कंपनीला देण्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न अधिका-यांनी केला. इव्हेंट नॉलेज सिस्टिम नावाच्या या कंपनीला आयोजन समितीने ७० कोटींचे कंत्राट दिले होते. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी राष्ट्रकुल घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या शुंगलू समितीने याची तपासणी केली असता त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. संपूर्ण कंत्राट ईकेएसला देणे म्हणजे दर्जावर आधारित निवड करण्याच्या प्रक्रियेचे तीनतेरा वाजविण्यासारखे आहे, अशी खरमरीत टीका शुंगलू समितीने अहवालात केली होती. समितीने केलेल्या शिफारशींनुसार पीएमओने आणि ईडीला याच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे आता सुरेश कलमाडी चांगलेच अडकले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी कलमाडी यांना काही महिने तुरुंगात काढावे लागले होते. नियमांचे उल्लंघन करून कंत्राट देण्याबरोबरच स्पर्धेत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात कलमाडी यांच्यावर आरोप करण्यात आले असून त्याची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे.