शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (11:40 IST)

ऑलिम्पिकः खाशाबा जाधव, अभिनव बिंद्रा ते सिंधू आणि हॉकीचा सुवर्णकाळ

टोकियो ऑलिम्पिकचं उद्घाटन आज 23 जुलै रोजी होत आहे. यानिमित्ताने भारताच्या आतापर्यंतच्या ऑलिम्पिक पदकांचा घेतलेला आढावा.
 
1900 वर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तत्कालीन भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या नॉर्मन प्रिटचर्ड यांनी देशाला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं होतं. भारतावर त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य होतं.
 
नॉर्मन यांचा जन्म कोलकाता इथला. नॉर्मन अथलिट होते. 200 मीटर अडथळ्याची शर्यत आणि 200 मीटर डॅश इव्हेंट या दोन्ही प्रकारात नॉर्मन यांनी रौप्यपदकाची कमाई केली. हा विक्रम रचणारे ते पहिले भारतीय ठरले.
 
नॉर्मन अथलेटिक्सच्या बरोबरीने फुटबॉलही उत्तम खेळायचे. नॉर्मन भारतीय पासपोर्टसह पॅरिसला गेले होते. मात्र नॉर्मन यांची पदकं आमची आहेत असा दावा ब्रिटनने केला होता. नॉर्मन ऑलिम्पिक स्पर्धेत स्वतंत्र खेळाडू म्हणून सहभागी झाले होते.
 
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नॉर्मन यांचं पदक भारताच्या खात्यात दाखवलं. अधिकृत निकालातही तशीच नोंद आहे. ऑलिम्पिक पदक पटकावल्यानंतर नॉर्मन इंग्लंडला रवाना झाले. त्यांनी अभिनय क्षेत्रात जायचं ठरवलं.
 
हॉलिवूडमध्ये गेल्यावर त्यांनी नॉर्मन ट्रेव्होर असं नाव घेतलं. अनेक भूमिका समर्थपणे साकारल्या. भारताला पदक मिळवून देणारा हा खेळाडू विस्मृतीत गेला आहे.
 
भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ
तब्बल 28 वर्षांनंतर भारताचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपला आणि सुरू झाला भारतीय क्रीडा विश्वातला एक सुवर्णकाळ. स्वातंत्र्यपूर्व असा तो काळ. देशभरात सगळीकडे स्वातंत्र्यासाठी चळवळी जोरात सुरू होत्या.
 
खेळ हे प्राधान्य असण्यासारखी परिस्थिती नव्हती. आर्थिक आघाडीही बळकट नव्हती. मूलभूत गोष्टींसाठीच संघर्ष सुरू असल्याने खेळांसाठीची संसाधनं उपलब्ध असण्याचा प्रश्नच नव्हता.
 
या खडतर परिस्थितीला तोंड देत भारतीय पुरुष हॉकी संघाने 1928 (अमस्टरडॅम), 1932 (लॉस एंजेलिस), 1936 (बर्लिन) अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जगात सर्वोत्तम असल्याचं सिद्ध करत सुवर्णपदक पटकावलं.
 
प्रवासाची साधनं मर्यादित आणि वेळखाऊ होती. प्रतिस्पर्ध्यांच्या खेळाचा अभ्यास करण्यासाठी व्हीडिओ विश्लेषण तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं.
 
ऑलिम्पिक स्पर्धेत जगातील अव्वल संघ सहभागी होतात. वातावरणाचा अभ्यास, खेळातल्या बारकाव्यांवर पकड, प्रतिस्पर्ध्यांच्या खेळातील उणेपण हे सगळं सातत्याने करून भारतीय संघाने देदिप्यमान यश साकारलं.
 
दुसऱ्या महायुद्धाच्या व्यत्ययानंतर ऑलिम्पिक खेळ पुन्हा सुरू झाले. 1948 (लंडन), 1952 (हेलसिंकी) या स्पर्धांमध्येही भारतीय पुरुष हॉकी संघाचंच सुवर्णपदकावर वर्चस्व राहिलं.
 
खाशाबा जाधव- वैयक्तिक पदकाचे किमयागार
वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाची किमया मराठमोळ्या खाशाबा जाधव यांनी केली. खाशाबांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या बँटमवेट प्रकारात त्यांनी कांस्य जिंकलं होतं.
 
लाल मातीत कुस्तीचे डाव गिरवलेल्या खाशाबा यांचा हेलसिंकीतला पदकाचा सामना, त्याआधी काय काय घडलं, नंतर काय काय घडलं हे तुम्ही इथे वाचू शकता.
 
खाशाबांचं नशीब चांगलं असतं तर त्यांना दोन लढतींदरम्यान वेळ मिळाला असता. असा वेळ मिळणं नियमानुसार आहे. मात्र दुर्देवाने त्यावेळी त्यांच्याबरोबर कोणीच नव्हतं. खाशाबांनी प्रयत्नांची शर्थ केली.
 
ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलंवहिलं वैयक्तिक पदक मिळवून देण्याचा मान खाशाबा यांच्या नावावर आहे. मात्र या पदकाचा रंग चंदेरी किंवा सोनेरी असू शकला असता मात्र ऑलिम्पिक स्पर्धा संपायला आलेली, पदकाची आशा नाही अशा वातावरणात भारतीय व्यवस्थापन गाफील राहिलं.
 
गेल्या काही वर्षात ऑलिम्पिकवारी करू शकतील अशा संभाव्य गुणी खेळाडूंना सरकारकडून, संबंधित खेळाच्या संघटनेकडून आर्थिक मदत मिळते.
 
परदेशी प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. फिजिओ, ट्रेनर, सायकॉलॉजिस्ट मदतीला असतात. खाशाबा यांच्यावेळची परिस्थिती दुर्दम्य अशी होती. खाशाबा ज्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते तिथले प्राध्यापक खर्डीकर यांनी राहतं घर गहाण टाकून सात हजार रुपये उभे केले. एका बँकेकडून सहा हजारांचं कर्ज घेतलं आणि त्यातून ही हेलसिंकी वारी शक्य झाली.
 
खाशाबांनी पदक जिंकल्यावर करवीरवासीयांच्या उत्साहाला उधाण आलं आणि गावकऱ्यांनी कऱ्हाडपासून जन्मगाव गोळेश्वर पर्यंत 151 बैलगाड्यांची मिरवणूक काढली होती.
 
ऑलिम्पिक पदक पटकावल्यानंतर खाशाबा यांचं आयुष्य पालटून गेलं नाही. चार वर्षांनंतर त्यांना पोलीस दलात नोकरी मिळाली मात्र पुढची 22 वर्ष एकाही बढतीशिवाय त्यांनी काम केलं. 1984मध्ये एका मोटार अपघातात त्यांचं निधन झालं.
 
हॉकी संघाची कीर्ती दुमदुमत राहिली
भारतीय पुरुष हॉकी संघाचं ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकावरचं अद्भुत वर्चस्व पुढच्या स्पर्धांमध्येही कायम राहिलं. विशेष म्हणजे बाकी खेळांमध्ये मिळून पदकांची पाटी कोरी राहत असतानाही हॉकी संघाने दाखवलेली जिद्द विलक्षण अशी आहे.
 
कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाला हेवा वाटेल अशी कामगिरी भारतीय हॉकी संघाच्या नावावर आहे.
 
1956 (मेलबर्न), 1960 (रोम), 1964 (टोकियो), 1968 (मेक्सिको), 1972 (म्युनिक), 1980 (मॉस्को) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. भारतीय खेळाडूंनी अफलातून कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय खेळ हॉकीला प्रतिष्ठा मिळवून दिली.
 
अचंबित करणाऱ्या सातत्यानंतर मात्र भारतीय हॉकी क्षेत्राला अनागोंदीने ग्रासलं. संघटनांमधील वाद, निधीचा अभाव, संघनिवड-प्रशिक्षक निवड यातील वाद हे प्रबळ होत असतानाच जागतिक स्तरावर बाकी देशांनी आपली गुणकौशल्यं घोटली.
 
तब्बल 41 वर्षं हॉकी संघ ऑलिम्पिक पदकापासून दूर राहिला आहे, यावरूनच हॉकीची दुरवस्था लक्षात यावी.
 
पेसने फोडली कोंडी
टेनिसपटू लिएंडर पेसने 16 वर्षांची पदकाची कोंडी फोडली. अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत पेसने कांस्यपदक पटकावलं. अटलांटासारख्या हाय अल्टिट्यूट ठिकाणचा सराव व्हावा यासाठी पेसने हार्ड कोर्टवर आणि उंचीवरच्या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. तरीही पदकाचं आव्हान खडतरच होतं.
 
दमदार खेळ करत उपांत्य फेरी गाठणाऱ्या पेसला आंद्रे आगासीने नमवलं. ऑलिम्पिक नियमांनुसार कांस्यपदकासाठीच्या लढतीत पेसने ब्राझीलच्या फर्नांडो मेलिजेनीवर 3-6, 6-2, 6-4 असा विजय मिळवला.
 
पहिला सेट गमावलेल्या पेसने नंतर मात्र निर्धाराने खेळ करत पदकावर नाव कोरलं. आजही ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावणारा पेस एकमेव टेनिसपटू आहे.
 
पेसची मशाल मल्लेश्वरीकडे
पेसने प्रज्वलित केलेली पदकाची मशाल चार वर्षात वेटलिफ्टिंगपटू करनाम मल्लेश्वरीने तेवत ठेवली. 2000 साली सिडनी इथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मल्लेश्वरी यांनी 69 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं.
 
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक पटकावणाऱ्या मल्लेश्वरी पहिल्या महिला खेळाडू होत्या.
 
राज्यवर्धन सिंग राठोडचा लक्ष्यवेध
लष्करी सेवेत असणाऱ्या राज्यवर्धन यांनी अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य परंपरेच्या पुढे जात डबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. नेमबाजी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या राज्यवर्धन यांनी अथेन्समध्ये लौकिकाला साजेसा खेळ करत देशाला पदक मिळवून दिलं.
 
राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, पद्मश्री यांच्यासह राज्यवर्धन यांना लष्करातर्फे अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. लष्करातून निवृत्ती घेतल्यानंतर राज्यवर्धन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
 
2014 मध्ये राज्यवर्धन जयपूर ग्रामीण मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. राज्यवर्धन यांनी माहिती आणि प्रसारण आणि क्रीडा खात्याचा कारभार पाहिला आहे.
 
सुवर्णपदकाचा 'अभिनव' क्षण
बीजिंग इथे 2008 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं वैयक्तिक सुवर्णपदकाचं स्वप्न नेमबाज अभिनव बिंद्राने प्रत्यक्षात साकारलं. अभिनवने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलं.
 
भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवून देणारा अभिनव पहिला खेळाडू ठरला.
 
ऑलिम्पिकच्या पोडियमवर जनगणमनचे सूर निनादत आहेत आणि मागे तिरंगा फडकतोय या अनोख्या क्षणाची अनुभूती अभिनवमुळे देशवासीयांनी अनुभवली. मायदेशी परतल्यानंतर अभिनववर कौतुकाचा वर्षाव झाला.
 
अनेक वर्ष नेमबाजी क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अभ्यासू नेमबाजांमध्ये अभिनवची गणना व्हायची. घरच्यांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर अभिनवने खेळातले बारकावे विदेशात जाऊन पक्के करून घेतले.
 
ऑलिम्पिक स्पर्धेत दडपणाच्या क्षणी मनशांती ढळू न देता अभिनवने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. अभिनवचं सुवर्णपदक हा देशातल्या असंख्य युवा पिढीसाठी प्रेरकबिंदू ठरला.
 
खेळातून बाजूला झाल्यानंतर अभिनव आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटना तसंच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं काम करतो. अभिनव बिंद्रा फाऊंडेशनची त्याने स्थापना केली आहे. गेल्या वर्षी भुवनेश्वर इथे अभिनव बिंद्रा स्पोर्ट्स मेडिसन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची त्याने स्थापना केली.
 
सुशील-विजेंदरची कमाल
बीजिंगमध्ये कुस्तीपटू सुशील कुमार आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांनीही पदकावर नाव कोरलं. सुशीलने 66 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल प्रकारात तर विजेंदरने मिडलवेट गटात कांस्यपदक पटकावलं.
 
आपापल्या खेळांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दोघांनी ऑलिम्पिक व्यासपीठाचं दडपण न घेता चांगला खेळ करत पदक पटकावलं. सुशीलचं यश हे युवा कुस्तीगीरांसाठी आश्वासक टप्पा मानला जातो.
 
सुशीलच्या खेळाने, यशाने प्रेरित होऊन अनेकांनी या खेळात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. एका युवा कुस्तीपटूचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी सुशील सध्या तुरुंगात आहे.
 
विजेंदर सिंग ऑलिम्पिक पदकानंतर पोस्टर बॉय ठरला. विजेंदरच्या यशाने भारतीय बॉक्सिंगला नवी दिशा मिळाली. ऑलिम्पिक यशानंतरही विजेंदरने आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली.
 
रॅम्पवॉक, चित्रपटात भूमिका याबरोबरीने विजेंदरने प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये विजेंदरने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याने निवडणूकही लढवली मात्र त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.
 
थेम्सच्या किनारी पदकांचा षटकार
 
अभिनव-सुशील-विजेंदर यांच्या यशाने नेमकं काय साधलं याचं उत्तर लंडन ऑलिम्पिकमधल्या भारताच्या कामगिरीत आहे. भारताने लंडनवारीत सहा पदकांची कमाई केली.
 
नेमबाज विजय कुमारने रौप्य तर गगन नारंगने कांस्यपदक पटकावलं. सुशीलने बीजिंगमधल्या यशाला झळाळी देत चंदेरी पदकावर नाव कोरलं.
 
भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवालने कांस्यपदक नावावर केलं. देशवासीयांना अभिमान वाटावा अशी कारकीर्द नावावर असणाऱ्या बॉक्सर मेरी कोमने कांस्यपदक मिळवून दिलं.
 
कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही आपली क्षमता सिद्ध करत कांस्यपदक जिंकलं.
 
सायनाच्या यशाने भारतीय बॅडमिंटन क्षेत्राला नवा आयाम मिळाला. ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी सायना पहिली बॅडमिंटनपटू ठरली.
 
सायना मायदेशी परतल्यानंतर देशभरात तिच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजित झाले. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे देशात अनेक गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये, मेट्रो शहरांमध्ये बॅडमिंटन खेळलं जाऊ लागलं.
 
पालक हौसेने आपल्या मुलांना बॅडमिंटन खेळायला पाठवू लागले. मेरी कोमच्या यशाने पूर्वांचल राज्यांना नवी ओळख मिळवून दिली. मेरीच्या यशाने महिला बॉक्सिंगमध्ये नवं पर्व सुरू झालं.
 
सिंधू-साक्षी चमकल्या पण...
ब्राझीलमधल्या रिओ दी जानिरो इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाच्या खूप अपेक्षा होत्या. पण भारताच्या हाती अवघी दोन पदकं आली.
 
पी. व्ही. सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मारिनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला मात्र बॅडमिंटन विश्वातल्या सार्वकालीन महान मुकाबल्यांमध्ये या सामन्याची गणना होते. सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली.
 
जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, सुपर सीरिज स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सिंधूने अपेक्षांचं ओझं न बाळगता बहारदार खेळ करत पदक पटकावलं. कुस्तीत साक्षी मलिकने फ्रीस्टाईल 58 किलो वजनी गटात कांस्यपदक नावावर केलं.
 
भारताची आतापर्यंची कामगिरी
सुवर्ण-9
 
रौप्य-7
 
कांस्य-12
 
एकूण- 28