बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

गणेशोत्सवातली गर्दी टाळावी- भुजबळ

यंदा गणेशोत्सवावर दहशतवादाबरोबरच स्वाइन फ्ल्यूचे सावट आहे. अशावेळी जनतेने गणेश दर्शनासाठी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. लालबागच्या राजाला होणारी गर्दी कमी करण्यासाठी वाहिन्यांनी त्याच्या पूजेचे व आरतीचे प्रक्षेपण करावे अशी सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, आगामी काळात मुस्लिम बांधवांनीही रमजानचे रोजे सोडताना गर्दी टाळावी असे आवाहन भुजबळ यांनी येथे केले. आता गणेशोत्सव मंडळे याला कसा प्रतिसाद देतात, यावर स्वाइन फ्लूचा प्रसारही अवलंबून आहे.

`सार्वजनिक गणेशोत्सव-2009`च्या कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले की, गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाखो लोक एकत्र येतात आणि मोठ्या शांततेने उत्सव साजरा करतात, ही जगभरात मोठी आश्चर्याची आणि कुतूहलाची बाब समजली जाते. पण हीच बाब यंदा आपल्यासाठी धोक्याची ठरली आहे. दहशतवाद आणि स्वाइन फ्ल्यू या दोन्ही गोष्टींचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दी करणे टाळले पाहिजे. ज्या ज्या वेळी राज्यावर काही संकटाचा प्रसंग आला, अशा प्रत्येक वेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शासनाला नेहमीच सहकार्य केले आहे. यंदाच्या आपल्या उत्सवावर स्वाइन फ्ल्यूचे सावट आहे. या रोगाचा हवेतूनच संसर्ग होत असल्याने गर्दी टाळणे एवढा एकच महत्त्वपूर्ण उपाय त्यावर करता येणे शक्य आहे. त्यामुळे मंडळांनी या संकटाचे गांभीर्य ओळखून गर्दी टाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

`लालबागच्या राजा`सारख्या मंडळांच्या गणपतीच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून सुमारे एक कोटी भाविक येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्याअनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, यंदाच्या उत्सवकाळात अशा गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जशी सुरक्षा व्यवस्थेवर आहे, तशीच ती जनतेवरही आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी दर्शनासाठी गर्दी न करता यंदा घरगुती स्तरावरच गणेशोत्सव साजरा करावा. या कामी मंडळांनीही नागरिकांना आवाहन करून शासनाला सहकार्य करावे. यंदा ठरल्याप्रमाणे गणपती येतील, कार्यकर्ते त्यांची पूजा, आराधना करतील; पण, फक्त तेथे गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंडपाच्या परिसरात काटेकोरपणे स्वच्छता सांभाळावी, अशी सूचना त्यांनी केली. विविध प्रसारमाध्यमांनी, वाहिन्यांनी `लालबागच्या राजा`सारख्या महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सव मंडळांच्या श्रीगणेशाच्या आरती व आराधनेचे नागरिकांना घरबसल्या दर्शन घडवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

दहशतवादाच्या पार्श्र्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या बाबतीत अजिबात कसूर करू नये. परिस्थितीनुसार त्यांनी तत्क्षणी योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली. गणेशोत्सवाच्या बरोबरीनेच मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजानच्या महिन्यास सुरवात होते आहे. मुस्लीम बांधवांनीही उपवास सोडत असताना गर्दी करणे टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

दहीहंडीच्या संदर्भात श्री. भुजबळ म्हणाले की, या उत्सवावर बंदी आणून लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा प्रश्न आणखी जटील करण्याचा शासनाचा मानस नाही. ज्याठिकाणी फार उंच किंवा फार मोठ्या बक्षीसाच्या दहीहंडी असतात, अशा ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मंडळांनी अशा गोष्टी टाळाव्यात. काही मंडळांनी स्वतःहून दहीहंडीचा कार्यक्रम यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. अन्य मंडळांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गर्दी न करता उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. नागरिकांनीही सूज्ञपणे या गोष्टीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव चंद्गा अय्यंगार यांनी, उत्सव काळात बंदोबस्त करीत असताना स्वयंसेवक आणि पोलिसांनी सर्जिकल मास्क वापरण्यास हरकत नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी या मास्कच्या विल्हेवाटीची योग्य व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी पालिका प्रशासनाला केली.

उपमुख्यमंत्र्यांची साळगावकरांना विनंती
स्वाइन फ्ल्यूच्या पार्श्र्वभूमीवर, धार्मिक क्षेत्रामध्ये दबदबा असलेल्या आपल्यासारख्या व्यक्तींनी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले तर ते जरूर ऐकतील. त्यामुळे आपण या कामी पुढाकार घ्यावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांना आज दूरध्वनीद्वारे केली. गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीमध्ये स्वाइन फ्ल्यूचा फैलाव टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील, याविषयी चर्चा सुरू होती. त्यावेळी या पर्यायाचा विचार होताच उपमुख्यमत्र्यांनी बैठकीतूनच श्री. साळगावकर यांना दूरध्वनी केला.

उपमुख्यमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, नागरिकांना आम्ही शासन म्हणून कितीही कळकळीने आवाहन केले तरी त्यांना त्यामध्ये राजकारणच दिसते; मात्र, धार्मिक क्षेत्रात दबदबा असलेल्या आपल्यासारख्या व्यक्तींनी आवाहन केले तर लोकांच्या मनावर त्याचा अधिक चांगला परिणाम होईल. आपल्या या मंगल उत्सवावर स्वाइन फ्ल्यूचे सावट आहे. त्यामुळे सार्वजनिकरित्या उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले तर होणार्‍या संसर्गाला रोखणे कठीण जाईल. गणेश हा सर्वव्यापी आहे. सार्वजनिक ठिकाणांऐवजी तो घरातल्या आरतीनेही प्रसन्न होईल, असे आवाहन आपण जनतेला करावे, अशी विनंती त्यांनी श्री. साळगावकर यांना केली.