रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

स्वाइन फल्यूने सरकारच्या उणिवा उघड!

भारतात सध्या सर्वच राज्यात स्वाइन फल्यू अर्थात ए.(एच १ एन १) चा साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मात्र सर्वच राज्य सरकारांनी या आजाराबाबत पुरेशी जनजागृती करुन साथीला आळा घालण्यासाठी सुयोग्य कार्यक्रम अंमलात आणलेला नाही. उलट पक्षी सर्वच प्रसारमाध्यमे या आजाराबाबत उलट सुलट माहिती प्रसारित करुन जनतेत घबराट पसरविण्याचे काम करीत असल्याची टीका विख्यात जवाहरलाल नेहरु विापिठाच्या सोशल मेडिसिन आणि कम्युनिटी हेल्थ विभागातील प्राध्यापक आणि इतर वरिष्ठ संशोधक - शिक्षकांनी केली आहे.

प्रसारमाध्यमातून जेवढे स्तोम माजविले जात आहे, तेवढा स्वाईन फल्यू जीवघेणा नसल्याचे प्रतिपादन जवाहरलाल नेहरु विापिठांच्या सेंटर फॉर सोशल मेडिसिनि ऍण्ड कम्युनिटी हेल्थ, विभागातील डॉ. मोहन राव, प्रा.रमीला बिश्त, प्रा. रमा बारु आदी वरीष्ठ आणि ज्येष्ठ संशोधक शिक्षकांनी केले आहे.

आपल्या नित्याच्या माहितीतला फल्यू (किंवा इन्फल्यूएन्झा) आणि डेन्ग्यू या आजारापेक्षा स्वाइन फल्यू (ए. एच.१ एन १ ) अधिक वरिष्ठ आणि जीवघेणा आजार नसल्याचे सांगत याबाबत घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही असे या संशोधक प्राध्यापकांनी म्हटले आहे. नित्याच्या फल्यू प्रमाणेच याही आजारावर उपचार करता येतात. मात्र तो बळावला तरच रुग्णाला दाखल करणे गरेजेचे ठरते. अन्यथा नाही. त्याचबरोबर या आजाराबाबतची उपचारपध्दती आणि आजाराचे व्यवस्थापन या बाबत अधिक सुस्पष्टता असणे आवश्यक आहे, असेही या डॉक्टरांनी प्रतिपादन केले आहे. यामुळे आजाराबाबत सर्वसामान्य जनतेला सुध्दा संपूर्ण आणि स्पष्ट माहिती मिळू शकेल.

पुढच्या टप्प्यातील तपासण्या केवळ निदान आणि उपचारासाठीच केल्या जाव्यात, रुग्णांच्या प्राथमिक चाचणीसाठी केल्या जाऊ नयेत असेही या डॉक्टरांच्या गटाने आवाहन केले आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननेही सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे, असे या डॉक्टरांनी म्हटले आहे.

सरकारने खाजगी रुग्णालयांना चाचणीचे अधिकार दिले तर त्यातून रुग्णाचे केवळ आर्थिक शोषणच होईल यासाठी चाचण्या केवळ शासकिय यंत्रणेव्दारेच केल्या जाव्यात असे सांगत ही साथ म्हणजे इष्टापत्तीच मानून आपली सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी या संधीचा वापर व्हावा अशी अपेक्षा या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.