कृष्णवर्णीय अध्यक्ष- हॉलीवूडकडून व्हाईट हाऊसकडे
प्रगल्भ लोकशाही असे मानले जाणार्या अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी बरीच वर्षे लागली असली तरी अमेरिकेची ओळख असलेल्या हॉलीवूडच्या चित्रपटात मात्र यापूर्वी अनेकदा कृष्णवर्णीय अध्यक्ष दाखवण्यात आले आहेत. हॉलीवूडकडून व्हाईट हाऊसकडे असा हा प्रवास झाला आहे. गेल्या शतकात अनेक चित्रपटांत आफ्रो अमेरिकन नागरिकांना अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दाखविण्यात आले. १९७२ मध्ये रिलीज झालेल्या द मॅन या चित्रपटात राष्ट्राध्यक्ष व सभापती हे दोघेही इमारत कोसळल्याने मृत्युमुखी पडल्याचे दाखविले आहे. उपाध्यक्ष हे प्रकृती अस्वास्थ्याने हे पद स्वीकारण्यास नकार देतात आणि मग सिनेटर डग्लस डिलमन हे कृष्णवर्णीय सदस्य अध्यक्ष बनल्याचे दाखविले आहे. त्यानंतर १९९८ मध्ये आलेल्या डिप इम्पॅक्ट या चित्रपटातही अमेरिकेचे अध्यक्ष कृष्णवर्णीय दाखवले होते. पुढे २००३ मध्ये आलेल्या हेड ऑफ स्टेट या विनोदी चित्रपटातही राष्ट्राध्यक्ष कृष्णवर्णीय होते. ख्रिस रॉक याने ही भूमिका केली होती. एका अपघातात पक्षाचे राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार मरतात आणि रॉक याला अध्यक्षपदाची संधी मिळते, असे त्यात दाखविण्यात आले आहे.