Last Modified: परंडा , मंगळवार, 7 ऑक्टोबर 2014 (14:45 IST)
परिवर्तन घडवून विकासाला साथ द्या : पंकजा
केंद्रात बदल घडविला, आता राज्यातही परिवर्तन घडवून भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी आणि राज्याच्या विकासाला जनतेने चालना द्यावी, असे आवाहन आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी केले.
सोमवारी, परंडा येथे महायुतीचे उमेदवार बाळासाहेब पाटिल हाडोंग्रीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, उमेदवार बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझे वडील गोपीनाथ मुंडे यांचे परंड्यावर खूप प्रेम होते. त्यांनी 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी याच मैदानावर विराट सभा घेऊन युतीचा उमेदवार निवडून घेऊन मी आज परंड्याच्या मैदानावर सभेला आले, आज जनसागराला पाहून असे वाटते की, महायुतीचे बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर हे निवडून येतीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या उमेदवारांसाठी आपण महाराष्ट्रभर सभा घेत आहोत. गोपीनाथ मुंडे यांच्यावर महराष्ट्रासह इतर सर्व राज्यातील जनतेचे प्रेम होते. त्यामुळेच त्यांच्या व आपल्या सभेला आपल्या माणसांची गर्दी होते. महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार आहे. आघाडी सरकारने काही चांगले केले नाही. कशातही भ्रष्टाचार करून पैसे कमविले आहेत. आता त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांची भाषणे झाली. उमेदवार बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपले दोन्ही विरोधक दोनवेळा विधानसभेत गेले. त्यांनी या मतदारसंघासाठी काहीच केले नाही. मला एकवेळ संधी द्या, या तालुक्याला उजनीचे पाणी आणून या भागाचा विकास कसा करायचा तो त्यांना दाखवून देतो, असे सांगितले. सूत्रसंचालन अँड. संतोष सूर्यवंशी यांनी केले. या सभेस भूम, परंडा व वाशी तालुक्यातील भाजप युतीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.