सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (10:15 IST)

अयोध्येत रंगणार अवघ्या काही तासांवर भूमिपूजनाचा मुख्य सोहळा

अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजले आहे. परिसर सुशोभित करण्यात आला असून संपूर्ण अयोध्या नगरी विद्युत दिव्यांच्या रोषणाईने झळाळून उठली आहे. जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 5 ऑगस्ट रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. कोरोनाच्या सावटाखाली होत असलेला हा भूमिपूजन सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे.

या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष नृत्यगोपाल दास हे निमंत्रण पत्रिका पाठवत आहेत. या निमंत्रण पत्रिकेत अयोध्येतील राम जन्मभूमी खटल्यात मुस्लिम पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. श्रीरामाच्या इच्छेमुळेच मला या सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्य भूमिपूजन सोहळा
बुधवार, 05 ऑगस्ट रोजी प्रमुख नऊ ब्राह्मण भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होतील. तर उर्वरित तेथे उपस्थित असतील. सर्व 21 ब्राह्मणांच्या साक्षीने राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनाचा संकल्प करतील. भूमिपूजनाचा मुख्य सोहळा सुमारे 40 मिनिटे असेल. राम मंदिराची पायाभरणी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी करण्यात येणार आहे. पायाभरणी सोहळा अभिजित मुहूर्तावर होणार आहे. या सोहळ्याचा शुभारंभ धनिष्ठा नक्षत्रावर होणार असून सोहळ्याची सांगता शतभिषा मुहूर्तावर होणार आहे.
 
असा असणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संपूर्ण कार्यक्रम
5 ऑगस्ट रोजी सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून प्रस्थान, 10.35 वाजता लखनऊ विमानतळावर लँडिंग, 10.40 हेलिकॉप्टरने अयोध्येसाठी रवाना होणार, 11.30 वाजता अयोध्येच्या साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लँडिंग, 11.40 वाजता हनुमानगढी येथे पोहचणार. त्यानंतर 10 मिनिटे दर्शन आणि पूजा, 12 वाजता राजजन्मभूमी परिसरात पोहचणार,  रामलल्लांचे दर्शन आणि पूजा,12.15 वाजता रामलल्ला परिसरात पारिजातचे वृक्षारोपण, 12.30 वाजता भूमिपूजन कार्यक्रमाला सुरुवात, 12.40 वाजता राम मंदिर आधारशिलाची स्थापना, 2.05 वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडकडे प्रस्थान, 2.20 वाजता लखनऊमधून हेलिकॉप्टरने प्रस्थान, लखनऊवरून दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.

एकीकडे राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून राजकारण होताना दिसत आहे. काहींच्या मते हा शुभ मुहूर्त नाही तर काहींच्या मते अभिजित नक्षत्रावर हे भूमिपूजन होत असताना अन्य कोणताही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही तर दुसरीकडे सोमवारपासून अनेक धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात झाली आहे. हे धार्मिक विधी भूमिपूजन सोहळ्यापर्यंत सुरू राहणार आहेत. यामध्ये 21 ब्राह्मण सहभागी झाले आहेत. एवढेच नव्हे, तर अयोध्येतील कानाकोपर्‍यात पूजन, होम-हवन, धार्मिक विधी सुरू झाले आहेत.

100 पवित्र नद्यांचे जल
राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून माती आणि जल आणले जात आहे. देशभरातील सुमारे 2 हजार पवित्र स्थानांवरील माती अयोध्येत आणली गेली आहे तसेच 100 पवित्र नद्यांचे जल भूमिपूजनस्थानी पोहोचले आहे. राम मंदिर भूमिपूजनानिमित्ताने संपूर्ण अयोध्येत अद्भुत वातावरण निर्माण झाले आहे. श्रीरामांच्या जयघोषाने अयोध्या दुमदुमत आहे. भूमिपूजन कार्यक्रमासाठी काशीहून आशीर्वाद म्हणून चांदीची पाच बेलाची पाने प्रतीक म्हणून अयोध्येत आणली गेली आहेत. बाबा विश्‍वनाथ यांना अर्पण करण्यात आलेली ही चांदीची बिल्वपत्रे भूमिपूजन कार्यक्रमात श्रीरामांना अर्पण करण्यात येणार आहेत. पूजा, होम-हवनासाठी लागणारे सर्व पूजासाहित्य काशीतून अयोध्येला पाठवण्यात आले आहे. दररोज नव्या रंगाची वस्त्रे, दररोज वेदपठण विविध ठिकाणी सुरू आहे.
 
अयोध्येत सज्जनगडची माती, संगममाहुलीचे पाणी पोहोचले
अयोध्येत उद्या राम मंदिराचा भूमिपूजनाचा अद्भूत सोहळा पार पडणार आहे. मंदिर उभारणीसाठी भारतातील महत्वाच्या ठिकाणांहून माती, पाणी, विटा पाठविण्यात आल्या आहेत. या मंदिर उभारणीत सातार्‍याचेही महत्त्वाचे योगदान राहणार आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडावरील माती संस्थानच्यावतीने अखिल भारत हिंदू महासभेकडे पाठविण्यात आली होती. ही माती व संगममाहुलीहून आणलेले पाणी (तीर्थ) आठ दिवसांपूर्वी कुरिअरने पाठविण्यात आले असून ते अयोध्येला पोहोचही झाले आहे. त्यामुळे या सोहळ्यात सातारचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.