गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (16:48 IST)

डायबेटिसवर चुकीचे उपचार केल्याने अभिजीतला डोळ्यांचा आजार झाला 

mayank bhagwat
मयांक भागवत
"उजव्या डोळ्याची दृष्टी 70 टक्के गेली आहे. डाव्या डोळ्याने 5 फूटांच्या पुढे माणूस दिसत नाही. हे इन्सुलिन बंद केल्याचे परिणाम आहेत. माझी दृष्टी हळूहळू कमी होत चालली आहे," टाईप-1 मधुमेहाने म्हणजेच डायबेटिसने ग्रस्त, अभिजित गुडेकर इन्सुलिनचा डोस घेताना सांगत होता.
 
टाईप-1 रुग्णांसाठी इन्सुलिन म्हणजे जगण्याची संजीवनी. पण 'इन्सुलिन'ला कंटाळून, अभिजितने पर्यायी उपचार पद्धतीची मदत घेतली आणि इन्सुलिनचे डोस बंद केले. परिणामी दृष्टी कमकुवत झाली. अभिजितला 'डायबेटिस रेटिनो गदपॅथी' आजार झालाय. यात शरीरातील साखरेचं प्रमाण खूप वाढल्याने डोळ्यांच्या पडद्याला इजा होऊन दृष्टी अंधूक होते.
 
मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश शिवणे सांगतात, "पर्यायी उपचार पद्धतीची औषधं शास्त्रीय मानकांवर योग्य असली पाहिजेत. पण जाहिरातबाजीवर जास्त कल असल्यामुळे सामान्य माणूस याकडे आकर्षित होऊन उपचार घेतो."
 
काही दिवसांपूर्वी योगगुरू बाबा रामदेवांना सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली हाटकोर्टाने आयुर्वेदिक औषधांबाबत केलेल्या दाव्यामुळे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांवर चुकीचे आरोप केल्यामुळे फटकारले होतं.
 
तीन वर्षांचा असताना डायबेटिसचं निदान
मुंबईतील खारदांडा परिसरात दहा-बाय-दहाच्या खोलीत अभिजित आई-वडिलांसोबत राहतो. एका सामान्य मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या अभिजितला तीन वर्षाचा असताना टाईप-1 मधुमेहाचं निदान झालं. इन्सुलिनचे दररोज दोन डोस घेऊनही शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात रहात नव्हती.
 
बारावीच्या परीक्षेच्या आधी त्याला अचानक त्रास सुरू झाला. तब्येत खूप खराब झाली. ICU मध्ये दाखल व्हावं लागलं. तो बरा झाला, पण डॉक्टरांनी इन्सुलिनचा डोस वाढवून दररोज चार डोस सुरू केले.
 
आम्ही घरी तेव्हा अभिजित खुर्चीवर बसून मोबाइलवर मेसेज पाहात होता. त्याला मोबाइलमधील मेसेज तीन-चार पट फॉंट वाढवल्यानंतरच वाचता येतो. तो म्हणाला "कॉलेज, क्रिकेट, काम यात इन्सुलिन घेणं जमत नव्हतं. त्यामुळे इन्सुलिनचे दररोज चार डोस घेण्याचा खूप कंटाळा येत होता."
 
इन्सुलिनचे डोस आणि सारखी करावी लागणारी रक्तातील सारखेची तपासणी. मी अक्षरश: वैतागलो होतो. इन्सुलिन बंद करण्याचा प्रत्येक पर्याय आम्ही शोधत होतो, तो पुढे सांगत होता.
 
आणि एक दिवस अचानक अभिजित आणि त्याच्या घरच्यांना आशेचा किरण दिसला. पण हा निर्णय अभिजितचं आयुष्य कायमचं बदलणारा ठरला.
 
"डॉक्टरांनी सांगितलं, ही औषधं घे, एक-दीड वर्षात इन्सुलिन पूर्ण बंद होईल"
 
अभिजितच्या नातेवाईकांनी त्यांना पर्यायी उपचारपद्धतीबाबत माहिती दिली. इन्सुलिन घेऊन वैतागलेल्या अभिजीतसाठी ही खूप मोठी गोष्ट होती. तो तात्काळ तयार झाला.
 
"मी डॉक्टरांना भेटलो. त्यांनी इन्सुलिनच्या चार पैकी तीन डोस बंद केले. आणि काही गोळ्या दिल्या. "म्हणाले ही औषध एक-दिड वर्ष सुरु ठेवली तर इन्सुलिन पूर्ण बंद होईल. मला खूप आनंद झाला होता," अभिजित सांगत होता.
 
वेळ दुपारची असल्यामुळे तो जेवणाआधी इन्सुलिनचा डोस घेण्याची तयारी करत होता.
 
टाईप-1 मधुमेह ग्रस्त रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन घेणं गरजेचं आहे, असं असूनही अभिजितने पाच वर्ष इन्सुलिनचे तीन डोस बंद ठेवले. पण याचे परिणाम हळूहळू दिसू लागले.
 
नोकरीला असताना अभिजितला कॉम्प्युटर स्क्रीनवरचं दिसत नव्हतं. त्यामुळे नोकरी सोडावी लागली. अभिजित पुढे सांगतो, "गाडी चालवताना अजिबात आत्मविश्वास नव्हता. समोरून येणारी गाडी दिसत नव्हती. डोळ्यात काहीतरी गडबड आहे हे कळत होतं."
 
तपासणीत उजव्या डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचं निदान झालं. त्यानंतर काही महिन्यानंतर डाव्या डोळ्याचा त्रास सुरू झाला.
 
अभिजितला 2020 मध्ये मधुमेहामुळे होणारा डायबेटिस रॅटिनोपॅथी आजाराचं निदान झालं होतं. "हा आजार मला 5-6 वर्ष इन्सुलिन बंद ठेवल्यामुळे झाला," हे सांगताना अभिजितचा आवाज खोलवर गेला होता.
 
डायबेटिस रेटिनोपॅथी काय आहे?
अभिजित गेल्या दोन वर्षांपासून मधुमेहतज्ज्ञ डॉ. अनुश्री मेहता यांच्याकडे उपचार घेतोय.
 
डॉ. मेहता सांगतात, "अभिजितने इन्सुलिन घेणं बंद केलं. त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण खूप वाढलं. त्यामुळे डायबेटिस रेटिनोपॅथी आजार झाला."
 
डायबेटिस रेटिनोपॅथी आजार टाईप-1 आणि टाईप-2 दोन्ही प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसून येतोय. यात डोळ्याच्या मागच्या पडद्यावर (Ratina) इजा होते आणि रक्तस्राव होतो. रॅटीनाच्या ज्या भागात रक्तस्राव होतो त्याभागात दृष्टी अंधूक होत जाते. वेळीच उपाय आणि शरीरातील साखर नियंत्रणात आणली नाही तर, दृष्टी कमकुवत होते.
 
"अभिजित इन्सुलिन अनियमित घेत होता. पण आता तो इन्सुलिन वेळेवर घेऊ लागलाय," डॉ. अनुश्री पुढे म्हणाल्या.
 
अभिजितच्या उजव्या डोळ्याची दृष्टी 70 टक्के गेलीये. तर डाव्या डोळ्याने फक्त 50 टक्के दिसतं. तो म्हणतो, "माझ्यासमोर ५ फूटांवरचा माणूस मला डाव्या डोळ्याने दिसतो. पण त्यापुढे कोणी असेल तर दिसत नाही. उजव्या डोळ्याने मला तो माणूसच दिसत नाही."
 
डोळ्यांची राहीलेली दृष्टी आणखी कमकुवत होऊ नये आणि कायम रहावी यासाठी त्याला दर तीन महिन्यांनी डोळ्यात इन्जेक्शन घ्यावी लागतात. डॉ. शिवणे सांगतात, "रॅटीनाच्या मधल्या भागाला इजा झाली तर दृष्टी जाऊन अंधत्व येऊ शकतं. जगभरात मोतीबिंदूनंतर अंधत्व येण्याचं दुसरं कारण डायबेटिस रेटिनोपॅथी आहे."
 
'मी बाईक आणि गाडी विकली'
अभिजितला बाईक राईड आणि गाडी चालवण्याचं खूप वेड होतं. पण दृष्टी कमकुवत झाल्याने त्याला बाईक आणि गाडी विकावी लागली. क्रिकेटचं वेड तर आता इतिहासजमा झालंय.
 
"मी बाईक आणि गाडी चालवायचो. आता सर्वकाही बंद झालंय. याचं मुख्य कारण म्हणजे, इन्सुलिन बंद करून मोठी चूक केली," बोलताना अभिजितचा कंठ दाटून आला होता.
 
घरातून दुपारी बाहेर पडताना काळा चष्मा आता रोजचाच झालाय. वाचायला, लिहायला खूप त्रास होतो. अभिजित पदवीधर आहे. पण शिक्षण पूर्ण झालं असूनही त्याला नोकरी मिळत नाहीये. याची खंत त्याच्या बोलण्यातून सातत्याने दिसून येत होती.
 
दृष्टी कमकुवत असल्याने काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. त्याबाबत बोलताना अभिजित म्हणाला, "गणपतीत खूप पाऊस पडत होता. मी रस्त्याच्या कडेला उभा होतो. पण समोरून येणारी रिक्षा मला दिसली नाही. रिक्षाने मला टक्कर दिली. त्यामुळे कपाळावर खोक पडलीये."
 
योगगुरू बाबा रामदेवांच्या दाव्यावरून वादंग
योगगुरू बाबा रामदेव यांच्या टाईप-1 मधुमेह बरा करण्याबाबत आणि रुग्णांचं इन्सुलिन बंद करण्याच्या दाव्यावरून मोठा गदारोळ झाला होता. यूकेचा आरोग्य विभाग आणि डायबिटीस संघटनांनी जुलै महिन्यात रामदेव यांच्या दाव्याबाबत आक्षेप घेतले होते.
 
आरोग्य विभागाने याबाबत एक परिपत्रक जारी केलं होतं. "या व्हीडिओत करण्यात आलेले दावे डायबेटिस असोसिएशन म्हणून आम्ही फेटाळत आहोत," असं यात लिहीण्यात आलंय.
 
यात पुढे लिहीलंय की, "टाईप-1 मधुमेह बरा करण्याबाबत आणि रुग्णांचं इन्सुलिन बंद करण्याबाबत बाबा रामदेव यांचा एका व्हिडीयोची माहिती मिळालीये. देशातील काही लोक त्यांना फॉलो करतात. भारतीय आयुर्वेदाला 5000 वर्षांचा इतिहास आहे. पण, टाईप-1 मधुमेहात स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना इजा पोहोचते. इन्सुलिनशिवाय टाईप-1 मधुमेह ग्रस्त रुग्ण जगू शकत नाही. त्यामुळे आम्ही रुग्णांना आवाहन करतो की त्यांनी औषधं सुरू ठेवावीत."
 
दुसरीकडे बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीला विरोध करणाऱ्या अनेक जाहिराती छापल्या होत्या. याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी कोर्टात धाव घेतली होती. सरन्यायाधीश रामण्णा यांच्या खंडपीठाने रामदेव यांना चांगलंच फटकारलं होतं."
 
"तुम्ही अॅलोपॅथी डॉक्टरांना शिवीगाळ का करता? तुम्हाला इतर उपचार पद्धतीवर टीका करण्याचा अधिकार काय?" अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने त्यांची कानउघडणी केली होती.
 
तर, बाबा वापरत असलेल्या उपचारपद्धतीने आजार नक्की बरा होईल याची गॅरंटी काय? असा सवालही कोर्टाने विचारला होता.
 
बाबा रामदेव यांनी कोरोनाकाळात कोरोनिल औषधांमुळे कोव्हिड बरा होतो असा दावा केला होता. यावरही डॉक्टरांनी आक्षेप घेतला होता.
 
पर्यायी उपचारपद्धतीने आजार बरा होण्याच्या दाव्यावर मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश शिवणे सांगतात, "पर्यायी उपचारपद्धतीच्या औषधांना शास्त्रीय जोड असली पाहिजे. पण दुर्देवाने पर्यायी उपचारपद्धतीचा वापर करणाऱ्यांमध्ये संशोधन किंवा चाचणी करण्याची प्रवृत्ती दिसून येत नाही."

Published By -Smita Joshi