शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

आयुर्वेदिक कोंबडी शाकाहारी की मांसाहारी, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

अंडे आणि कोंबडीला शाकाहाराचा दर्जा द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केली आहे.
 
ही मागणी करताना राऊत यांनी एक किस्सा सांगितला.
 
त्यात ते म्हणाले, "मी एकदा नंदुरबारला गेलो होतो. काम आटोपल्यानंतर तिथल्या आदिवासी लोकांनी आम्हाला जेवायला दिलं. मी विचारलं, हे काय आहे, तर ही कोंबडी आहे, असं त्यांनी मला सांगितलं.
 
पण, मी आज कोंबडी खाणार नाही, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर त्यांचं म्हणणं होतं की, ही आयुर्वेदिक कोंबडी आहे. या कोंबडीला आम्ही अशा पद्धतीनं वाढवतो की, ती खाल्ल्यामुळे तुमचे सगळे आजार दूर होऊ शकतात. त्यामुळे आयुष मंत्रालयानं यावर रिसर्च करायला हवा."
 
ते पुढे म्हणाले की, "हरियाणात चौधरी चरणसिंग अॅग्रीकल्चर इन्स्टिट्यूट आहे. आयुर्वेदिक अंड्यांचा आम्ही शोध लावला आहे, असं तिथल्या लोकांनी मला मागे एकदा सांगितलं.
 
"आमच्याकडे पोल्ट्री फार्ममध्ये असलेल्या कोंबडीला आम्ही फक्त वनौषधी खाऊ घालतो. त्यापासून तयार झालेलं अंडं पूर्णपणे आयुर्वेदिक आणि शाकाहारी असतं, असं आम्ही समजतो. त्यामुळे हे अंडं शाकाहारी आहे की मांसाहारी, हे आयुष मंत्रालयानं प्रमाणित करायला हवं."
 
आयुर्वेदिक कोंबडी भानगड काय?
आयुर्वेदिक अंड देणाऱ्या कोंबडीला फक्त वनस्पती, आयुर्वेदिक खाद्य दिलं जातं.
 
आयुर्वेदिक कोंबडी आणि अंड्याविषयी चौधरी चरणसिंह विद्यापीठातील संशोधक डी. के. सिंह सांगतात, "विद्यापीठातील पोल्ट्री फार्मध्ये ज्या कोंबड्या असतात, त्यांचं खाद्य वेगळं असतं, त्यात 17 ते 18 घटक असतात.
 
"या खाद्यात 18 ते 20 टक्के प्रोटीनची मात्रा ठेवावी लागते. याशिवाय फॅट, मिनरल्स असे वेगवेगळे घटक असतात. 27 ते 28 प्रकारच्या विविध पदार्थांचा कोंबड्यांच्या अन्नात समावेश केला जातो. त्यामुळे कोंबडीला जे अन्न तुम्ही खाऊ घालणार, त्याच पद्धतीचं अंड्याला ती जन्म देणार."
 
पण, आयुर्वेदिक कोंबडी आणि अंड्यांची संकल्पना शास्त्रात नसल्याचं आयुर्वेदाचार्य ए. के. त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.
 
त्यांच्या मते, "वनौषधी खाऊ घातलेली कोंबडी जे अंड देते, त्याला आम्ही कधीच आयुर्वेदिक अंडं म्हणून ओळख देऊ शकत नाही. कोंबडी हे एक वेगळ्या प्रकारचं खाद्य आहे. पण, आयुर्वेदिक अंड्याची जी संकल्पना आहे, तिचं शास्त्रात वर्णन केलेलं नाही."
 
सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया
प्रसाद चव्हाण यांनी फेसबुकवरील प्रतिक्रियेत म्हटलंय की, "बकरी पण गवत खाते मग तिला सुद्धा शाकाहाराचा दर्जा द्या."
 
तर आशिष फुलझेले यांनी म्हटलं की, "ह्या देशाची शोकांतिका अशी की कोंबडी आणि अंड्यावर भाष्य केले जाते, पण ज्यांना 2 वेळेचं जेवण नाही, ज्यांना घर नाही, जे बेरोजगार आहेत त्याबद्दल एकही खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच कोणीच आवाज उचलत नाही."
 
"कोंबडी जर व्हेज खात असेल तर ती शाकाहारी आहे,(कोंबडी सुद्धा किडे,कटकूल,नाकतोडे खात असते). पण कुणी कोंबडीला खात असेल तर तो मांसाहारी आहे," असं पंकज बोराडे यांनी लिहिलं आहे.
 
केदार गिरधारी यांच्या मते, "शाकाहारी लोकांना प्रथिनयुक्त आहार मिळण्यासाठी हे महत्त्वाचं आहे, जर अंड मांसाहारी असेल तर दूध पण आहे. Table egg मध्ये पिल्लू नसते."
 
"आम्ही मत शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देतो, तर मग अशा निवडून गेलेल्या लोकांनी ही त्याप्रमाणे प्रामाणिक काम केलं पाहिजे," असं मत सुशांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
 
वैजनाथ यादव यांनी लिहिलंय की, "तसा विचार केल्यास दुधालाही मांसाहाराचा दर्जा हवा. तोही प्राणीजन्य पदार्थ आहे."