शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (16:30 IST)

BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 : विजेता कोण? आज कळणार

BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 पुरस्कारांकडे लक्ष ठेवून बसलेल्या वाचकांची प्रतिक्षा आज संपणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 चा विजेता आज घोषित करण्यात येईल.
 
BBC स्पोर्ट्सवूमन पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे. या पुरस्कारांसाठी धावपटू द्युती चंद, नेमबाज मनू भाकर, पैलवान विनेश फोगाट, बुद्धीबळपटू कोनेरू हंपी आणि सध्याच्या हॉकी संघाची कर्णधार राणी यांना नामांकन मिळालेलं आहे.
 
BBC ने नेमलेल्या ज्युरींकडून सर्वाधिक मतं मिळाल्याने या पाच खेळाडूंना BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराचं नामांकन देण्यात आलं होतं.
 
या पाचही खेळाडूंना मतदान करण्यासाठीची लिंक 8 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीदरम्यान खुली होती. देशातील तसंच जगभरातील वाचकांकडून या खेळाडूंना मतदान करण्यात आलं आहे.
यामध्ये सर्वाधिक मते मिळवणारी खेळाडू BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 पुरस्काराची मानकरी ठरेल.
 
स्पोर्ट्स हॅकेथॉन
यंदाच्या वर्षी BBC ने स्पोर्ट्सवूमन पुरस्कारांसोबतच स्पोर्ट्स हॅकेथॉन उपक्रमाचंही आयोजन केलं होतं. भारतातील महिला खेळाडूंविषयी इंटरनेटवर अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. भारतीय भाषांमध्ये तर ही माहिती उपलब्धच नाही, असं म्हणावं लागेल. त्यामुळे या खेळाडूंविषयी माहिती लोकांना सहजपणे उपलब्ध होण्यासाठी विकिपीडियावर एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं.
 
या अंतर्गत 50 भारतीय महिला खेळाडूंची माहिती भारतीय भाषांमध्ये विकिपीडियावर अपडेट करण्यात आली. यासाठी देशभरातील 13 विद्यापीठांत पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आलं.
 
याशिवाय आपल्या आयुष्यातील आव्हानांचा धाडसाने सामना करून संघर्षपूर्ण यश मिळवणाऱ्या पाच खेळाडूंचा प्रेरणादायक प्रवासही BBC ने आपल्यासमोर आणला आहे.
 
चेंजमेकर सिरीजअंतर्गत पॅरा-बॅडमिंटनपटू पारूल परमार, हेप्थॅटलीट स्वप्ना बर्मन, पॅरा स्केटर प्रियांका देवान, माजी खो-खो खेळाडू सारिका काळे आणि पैलवान दिव्या काक्रान या खेळाडूंचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
 
कोण आहेत नामांकन मिळालेले पाच खेळाडू?
1. मनू भाकर
वय - 19 वर्षं*, खेळ - नेमबाजी (एअरगन शूटिंग)
वयाच्या सोळाव्या वर्षी मनू भाकरने आंतरराष्ट्रीय स्पर्धा फेडरेशन वर्ल्ड कप स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल - महिला या प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. असं करणारी ती सर्वात कमी वयाची भारतीय बनली.
 
मनू भाकरने 2018 च्या युथ ऑलिम्पिक्समध्येही सुवर्णपदक जिंकलं होतं.
त्याच वर्षी तिने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात 240.9 पॉइंट्स मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. 2019 मध्ये तिने नेमबाजीच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये याच प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.
 
2. द्युती चंद
वय - 25, खेळ - अॅथलेटिक्स
द्युती चंद महिलांच्या 100 मीटर धावणे या प्रकारत सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन आहे. 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड युनिर्व्हसाईड स्पर्धेत तिने 100 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. तिला 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. द्युती चंद फक्त तिसरी अशी भारतीय महिला आहे जी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी क्वालिफाय झाली. तिने 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता.
द्युतीने जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्येही रौप्य पदक जिंकलं होतं. 1998 नंतर भारताने जिंकलेलं ते पहिलं पदक होतं.
'फिमेल हायपरांड्रोजनिझम' म्हणजेच शरीरात पुरूषी संप्रेरक जास्त असल्याच्या कारणावरून द्युतीवर बंदी आली होती. पण आंतराष्ट्रीय खेळ कोर्टात आपली बाजू समर्थपणे मांडल्यानंतर 2015 साली तिच्यावरची बंदी उठवण्यात आली.
द्युती चंदने जाहीरपणे मान्य केलं की ती समलैंगिक आहे, असं करणारी ती पहिली भारतीय अॅथलिट ठरली आहे.
 
3. कोनेरू हंपी
महिला रॅपिड चेस चॅम्पियन
2002 मध्ये 15 व्या वर्षी जगातली सर्वांत लहान ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम तिच्या नावे लागला. हा विक्रम 2008 मध्ये चीनच्या होऊ यिफानने मोडला. सध्या ती महिला रॅपिड चेसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे. दोन वर्षांच्या मातृत्व ब्रेकनंतर तिने हा खिताब जिंकला.
कोनेरू हंपीला भारतातल्या सर्वोच्य खेळ पुरस्कारांपैकी एक अर्जुन पुरस्कार मिळाला आहे तसंच पद्मश्री पुरस्कारानेही तिला गौरवण्यात आलं आहे.
 
4. विनेश फोगट
वय - 26, खेळ - कुस्ती
विनेशच्या कुटुंबात अनेक आंतरराष्ट्रीय महिला पैलवान आहेत पण विनेश जकार्तामधल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय पैलवान ठरली. तिने राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही दोन सुवर्ण पदकं जिंकली आहेत. एशियन आणि राष्ट्रकुल या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.
सप्टेंबर 2019 मध्ये तिने आपली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. जानेवारी 2020 मध्ये विनेशने रोम रँकिंग सिरीजमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. तिने गेल्या वर्षी कोरोना व्हायरसलाही हरवलं.
 
5. राणी रामपाल
वय - 26 वर्षं, खेळ - हॉकी
राणी रामपाल प्रतिष्ठेचा 'वर्ल्ड गेम्स अॅथलिट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळवणारी पहिली हॉकी खेळाडू आहे. 2019 मध्ये अमेरिकेविरुद्ध खेळताना तिने केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोलमुळे भारतीय महिला हॉकी टीमची टोकियो ऑलिम्पिकमध्ये जागा निश्चित झाली. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या टीमचाही ती भाग होती.
 
2010 मध्ये राणी भारताकडून वर्ल्डकप खेळणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू बनली. तिने 'स्पर्धेतली सर्वात कमी वयाची खेळाडू' हा पुरस्कारही जिंकला.
2018 च्या एशियन गेम्समध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकलं, त्याच वर्षी हॉकी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत संघ पोहचला आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला.
 
राणीचा जन्म हरियाणातल्या एका गरीब घरात झाला. तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.