रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2023 (23:17 IST)

ब्रेंडा वेनेबल्स : शेतकऱ्याची पत्नी 40 वर्षे 'बेपत्ता', पण एका घटनेने उघड केलं खूनाचं रहस्य

murder
ब्रेंडा वेनेबल्स या वोर्सेस्टरशायरच्या एका गावामध्ये राहत होत्या. त्या जवळपास 40 वर्षे बेपत्ता होत्या आणि त्यांचं बेपत्ता असणं त्या गावासाठी गूढ बनलेलं होतं.पण, अखेर अनेक दशकांनी का होईना, त्यांच्या कुटुंबाला त्यांच्याबाबत काही उत्तरं मिळाली आहेत. ब्रेंडा यांचे पती दुहेरी जीवन जगत होते आणि तेच ब्रेंडा यांच्या हत्येसाठी दोषीही होते.
 
ब्रेंडा बोल्टन 23 वर्षांच्या होत्या. त्यावेळी पीटर वेनेबल्स बरोबर त्यांची भेट झाली होती. पुढे त्यांच्याशीच त्यांचं लग्न झालं.
 
वोर्सेस्टरशायरमध्ये आयोजित तरुण शेतकऱ्यांच्या एका सोहळ्यात त्यांची भेट झाली होती.
 
दोघेही ग्रामीण भागातील असल्यामुळं त्यांची लवकरच गट्टी जमली होती. ब्रेंडा दयाळू, नम्र आणि चांगली पार्टनर होती, असं डेवीड वेनेबल्स यांनी नंतर, हत्येप्रकरणी सुनावणी सुरू असलेल्या ज्युरीला सांगितलं होतं.
 
"एकमेकांबरोबर ते दोघंही अत्यंत आनंदी होते," असंही त्यांनी सांगितलं.
 
ड्रॉइटविच विंटर गार्डनमध्ये त्यांची पहिली भेट झाली. वेनेबल्स हे त्यांच्या कुटुंबाबरोबर पिग फार्म (वराह पालनाची जागा)मध्ये काम करत असायचे. त्यावेळी रशॉकच्या लहानशा गावामध्ये ते ब्रेंडा यांना पाहत असायचे.
 
त्यामुळंच बर्मिंघम येथील बाजारातून माल घेऊन घरी परत येताना ते रस्त्यामध्ये नाश्त्यासाठी थांबायचे.
 
त्यांनी 1960 मध्ये लग्न केलं. त्यानंतर जर्सीमध्ये हनिमूननंतर ते दोघं केम्पसी याठिकाणी असलेल्या एका शेतातील जुनाट अशा घरामध्ये राहू लागले.
 
वेनेबल्स यांच्या वडिलांनी त्यांना स्वतःचं घर तयार करण्यासाठी जमीन दिली होती. त्याठिकाणी ते जवळपास एका वर्षानंतर राहायला गेले.
 
त्याठिकाणी वेनेबल्स यांनी वराह (डुक्कर) पालन सुरू केलं. त्यानंतर हे दाम्पत्य त्या गावातील सुंदर अशा वातावरणाचा आनंद घेत चांगलं जीवन जगू लागले.
 
बाहेरून पाहणाऱ्यांना त्यांचं जीवन हे साधं पण आनंदी आणि शांत वाटत होतं.
 
पण 3 मे 1982 रोजी ब्रेंडा वेनेबल्स बेपत्ता जणू अचानक गायबच झाल्या.
 
वेनेबल्स यांनी दुसऱ्या दिवशी याबाबत पोलिसांत तक्रार दिली.
 
त्या बेपत्ता झाल्या त्याच्या आधीचा दिवस इतर दिवसांसारखाच सर्वसामान्य होता आणि ते बटाट्याची पेरणी करत होते, असं त्यांनी सांगितलं.
 
पत्नी ब्रेंडा यादेखील कुत्र्याच्या पिलाबरोबर खेळत होत्या. त्या अत्यंत आनंदी दिसत होती. त्यावेळी किंवा रात्री झोपतानाही तिच्या मूडमध्ये काहीही वेगळं जाणवलं नाही असंही त्यांनी म्हटलं.
 
"मला जेव्हा जाग आली तेव्हा ती कुठेही नव्हती," असं वेनेबल्स यांनी वोर्सेस्टर इव्हिनिंग न्यूजच्या एका पत्रकाराशी बोलताना म्हटलं होतं.
 
"तिनं यापूर्वी कधीही असं काही केलं नव्हतं. त्यामुळं तिच्याबरोबर काय झालं असावं, याचा काहीही अंदाज लावू शकत नाही," असंही ते म्हणाले.
 
पत्नी बेपत्ता झाल्यापासून झोपही येत नसल्याचंही वेनेबल्स यांनी सांगितलं. तसंच त्यांच्या पत्नी ब्रेंडा नैराश्याचा सामना करत होत्या असंही त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी त्यांना आजाराचा (फ्लू) सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांना नैराश्य आलं होतं, असंही ते म्हणाले.
 
ब्रेंडा वेनेबल्स यांच्याबाबत तपास सुरू झाल्यानंतर सर्वात आधी केम्पसी गावामध्ये सगळीकडे शोधाशोध सुरू झाली.
 
वेस्ट मर्सिया पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली. तसंच शेती, इमारती आणि इतर ठिकाणी श्वानांच्या मदतीनंही शोधाशोध केली. पण त्यांना काहीही सुगावा लागला नाही.
 
वेनेबल्स दाम्पत्याचे मित्र असलेले विकी जेनिंग्स नंतर म्हणाले की, "त्यावेळी डेवीड वेनेबल्स यांना फार चिंता आहे, असं जाणवतच नव्हतं. किंवा ते पत्नीला शोधण्याचा फार प्रयत्नही करत नव्हते."
 
डेवीड हॅरीसन हे सध्या मालवर्न हिल्स डिस्ट्रिक्ट काऊन्सिलमध्ये काऊन्सिलर पदावर आहेत. ते त्यावेळी केम्पसीमध्ये बेस्टमन्स लेन भागामध्ये फार्मर्स आर्म्स पब चालवत होते.
 
"सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. जेव्हाही एखादी व्यक्ती गायब होत असते तेव्हा तो संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनतो. हे नेहमीचंच होतं," असं त्यांनी म्हटलं.
 
"या संपूर्ण विषयाबाबत अनेक तर्क लावले जात होते, काही बाबी समोर येत होत्या तर बऱ्याच फक्त अफवाच होत्या."
 
ते म्हणाले की, पोलिसांचा तपास जवळपास दोन ते तीन आठवडे चालला. त्यांनी केम्पसीच्या भोवतालच्या जवळपास चार ते पाच मैलाच्या परिसरात शोध घेतला होता. त्यात त्यांच्या नऊ एकर जमिनीचाही समावेश होता.
 
"तपासाच्या दरम्यान पोलिस जिथं कुठं शोध घेत होते, तिथून त्यांना ब्रेंडा यांचा शोध घेण्यासाठी काही तरी संकेत किंवा सुगावा मिळतो का, याच्याच ते शोधात होते," असं ते म्हणाले.
 
"त्यांनी खड्ड्यांमध्ये तर काही पडलेलं नाही ना, याची खात्री करण्यासाठी म्हणून त्यांच्या आजुबाजुची झाडं, गवतंही कापली होती. "
 
पण त्यानंतरही जवळपास 40 वर्षांपर्यंत ब्रेंडा वेनेबल्स यांच्याबरोबर नेमकं काय घडलं, याबाबत त्यांच्या कुटुंबाला काहीही उत्तर मिळालेलं नव्हतं.
 
पण जुलै 2019 मध्ये शेतात असलेल्या त्या जुनाट घराच्या परिसरातील एका सेप्टिक टँकमध्ये मानवी शरिराचे काही अवशेष आढळले.
 
वेनेबल्स यांनी 2014 मध्ये ती जागा सोडली होती. त्यामुळं नव्या मालकांना या टँकची स्वच्छता करायची होती.
 
इंजिनीअर अॅलिस्टर पिट यांना त्यावेळी आधी एक केसांचा मोठा पुंजका आणि त्यानंतर मानवी कवटी आढळताच, ते प्रचंड घाबरले.
 
त्यानंतर त्याठिकाणी पोटाची आणि मांड्याची हाडंही सापडली. पण त्याद्वारे मृत्यूचं कारणं समजणं अशक्य होतं.
त्याचबरोबर या टँकमध्ये काही कपडे आणि इतर गोष्टीही होत्या. त्यात निकर, पँट, एक ब्रा आणि काही बुटांचे अवशेष तसंच एक स्वेटर याचाही समावेश होता.
 
नेमकं त्याचवेळी तिथून काही अंतरावर सुझी लॅम्पलघ नावाच्या इस्टेट एजंटसाठी शोध सुरू होता. त्या 1986 मध्ये बेपत्ता झाल्या होत्या.
 
पण पोलिसांना ते मानवी शरिराचे अवशेष आणि लॅम्पलघ यांच्यात काहीही साम्य आढळलं नाही.
 
त्यानंतर सुमारे एका वर्षानंतर गुप्तहेरांनी त्या अवशेषांची ओळख पटली असल्याचं जाहीर केलं. ते ब्रेंडा वेनेबल्स यांचे होते. या प्रकरणी ब्रेंडा यांच्या पतीवर हत्येचे आरोप लावण्यात आले होते. त्यांचं वय तेव्हा 88 वर्ष होतं.
 
त्यांच्यावर जेव्हा खटला चालवण्यात आला, त्यावेळी त्यांचं दुहेरी आयुष्य समोर आलं होतं. त्यांच्या आईची देखभाल करणाऱ्या लॉरेन स्टाइल्स यांच्याबरोबर त्यांचे जवळपास 1967 पासून दीर्घकाळ संबंध होते, असं या प्रकरणातील वकिलांनी सांगितलं.
 
स्टाइल्स यांचं 2017 मध्येच निधन झालं होतं. पण तरीही ब्रेंडा बेपत्ता झाल्या, तेव्हा त्यांनी पोलिसांना दिलेला जबाब खटल्यादरम्यान न्यायालयात वाचून दाखवण्यात आला.
 
डेवीड यांनी पोलिसांना पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिली, त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फोन केला होता, असं त्यांनी जबाबात म्हटलं होतं.
 
"ते अतिशय शांत वाटत होते. त्याचवेळी त्यांनी मला त्यांच्या पत्नी बेपत्ता झाल्याचं सांगितलं. मला वृत्तपत्रात वाचून समजण्याआधीच सांगावं म्हणून फोन केला, असं ते म्हणाले होतं," असं स्टाइल्स यांनी जबाबात म्हटलं होतं.
 
"त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी त्यांनी मला फोन केला. पण याबाबत काहीही उल्लेख केला नाही.
 
"या संपूर्ण प्रकरणाबद्दल ते एवढे शांत कसे राहू शकतात, हेच मला समजत नव्हतं."
 
त्यांना ब्रेंडाला त्यांच्या मार्गातून हटवायचं होतं, असं वकील मायकल बरोज यांनी ज्युरीतील सदस्यांना सांगितलं.
 
"त्यांना दुसऱ्या एका महिलेबरोबर दीर्घकाळ चाललेलं अफेयर पुन्हा सुरू करायचं होतं," असं बरोज म्हणाले.
 
"या निर्जन ठिकाणी असलेल्या सेप्टिक टँकबाबत त्यांना माहिती होती. त्यामुळं मृतदेह लपवण्यासाठीची ती अत्यंत योग्य जागा असल्याचं त्यांना ठावूक होतं.
"जवळपास 40 वर्षे ते तसंच "अत्यंत योग्य" ठिकाण ठरलं होतं, आणि ते या हत्येपासून स्वतःला वाचवूही शकले होते."
 
वेस्ट मर्सिया पोलिसांचे कॉन्सटेबल पीटर शॅरॉक हे त्यावेळी तपासाचा भाग होते. सुरुवातीच्या तपासादरम्यान या सेप्टिक टँककडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
 
"त्यावेळी ते फक्त काँक्रिटच्या एखाद्या ब्लॉकसारखं दिसत होतं. त्यामुळं त्याच्याकडं कोणाचं फारसं लक्ष गेलं नाही," असं ते म्हणाले.
 
वकील बरोज म्हणाले की, ब्रेंडा वेनेबल्स यांनी स्वतःच सेप्टिक टँकमध्ये उडी मारली आणि कोणाला काहीच कळू नये म्हणून, त्यांनीच परत एवढा जाड काँक्रिटचा ब्लॉक टँकवर ओढून घेतला, हे विश्वास ठेवण्यापलिकडचं आहे.
 
तसंच त्या रात्री ब्रेंडा वेनेबल्स काही कामानिमित्त बाहेर निघाल्या आणि रस्त्यात कुणाबरोबर तरी त्यांचा आमना-सामना झाला असावा, असं समजणंदेखील अगदीच तर्कहीन असल्याचंही ते म्हणाले.
 
वेनेबल्स यांनी त्यांच्या बाजुनं काही पुरावे सादर केले आणि जुन्या अफेअरबाबत पश्चाताप असल्याचंही ते म्हणाले.
 
त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीमध्ये बेपत्ता होईपर्यंत, अखेरपर्यंत शारीरिक संबंधांचं नातंही होतं, असा दावाही त्यांनी केला.
 
पण याच मुद्द्यावर ब्रेंडा यांच्यावर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञानं उपचारासाठी लिहिलेल्या नोट्स पुरावा म्हणून न्यायालयानं विचारात घेतल्या. मार्च 1982 मध्ये नैराश्य प्रकरणी ब्रेंडा यांच्यावर उपचार सुरू होते. तेव्हा या नोट्स लिहिलेल्या होत्या. 1968 पासून त्यांच्यात शारीरिक संबधं नव्हते. तसंच तीन वर्षांपासून ते वेगवेगळ्या बेडवर झोपायचे, असं त्यांनी या नोट्समध्ये लिहिलेलं होतं.
 
पोलिसांबरोबरच्या जबाबादरम्यान वेनेबल्स यांनी त्यांच्या पत्नीच्या हत्येचा दोषी फ्रेड वेस्टदेखील असू शकतो, असाही दावा केला होता.
पण त्यांचा दावा फेटाळण्यात आला आणि ब्रेंडा वेनेबल्स यांच्या हत्येप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं.
 
दोषी ठरवल्यानंतर कोर्टानं म्हटलं की, 1982 मध्ये या सेप्टिक टँकबद्दल अत्यंत मोजक्या लोकांना माहिती होती. फक्त दोन जणांनीच ती रिकामी केली होती. एक म्हणजे पीटर वेनेबल्स आणि दुसरी त्या कारागिरानं. त्यानं ही टँक अत्यंत कठिण ठिकाणी असल्याचं म्हटलं होतं.
 
त्यामुळं जर दुसरं कोणी वेनेबल्स यांच्या हत्येसाठी जबाबदार असतं, तर त्यांना मृतदेह लपवण्यासाठी ही सेप्टिक टँक सर्वात सुरक्षित जागा आहे हे माहिती नसतं. शिवाय दुसरं कोणी तरी त्यांची हत्या केली आणि परत मृतदेह घरी आणून या टँकमध्ये लपवला हे अविश्वसनीय असल्याचं म्हटलं गेलं.
 
ब्रेंडा यांच्या बेपत्ता होण्यानं सगळेच धक्क्यात गेल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं.
 
"त्या अत्यंत दयाळू होत्या आणि सर्वांची काळजी घ्यायच्या. त्यामुळं सगळे त्यांना मिस करत होते," असं ते म्हणाले.
 
"ब्रेंडा यांचा शोध लागला आणि आम्ही त्यांच्या आई वडिलांबरोबर आदरानं, शांत आणि सुरक्षित वातावरणात त्यांना दफन करू शकलो, याचा आनंद आहे."
 
वेनेबल्स यांच्या भावाबरोबर मैत्री असलेल्या मॅरीअन वॉल्टर्स यांच्या मते, या खटल्यामुळं अखेर अनेक दशकांची चिंता संपुष्टात आली.
 
"या कुटुंबासाठी ही घटना कशी राहिली असेल याचा अंदाज कुणालाही येऊ शकणार नाही. कुटुंबातील सर्वांसाठी ही भावना अत्यंत धक्कादायक असणार," असं त्या म्हणाल्या.
 
"ही बातमी बाहेर येईपर्यंत सत्य अक्षरशः जमिनीखाली लपलेलं होतं.
 
"पण, सोपं नसलं तरी, कुटुंबाला यातून सावरून पुढं सरकावं लागणार असणार."
 
Published By- Priya Dixit