शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 30 एप्रिल 2020 (08:00 IST)

कोरोना व्हायरसः मराठी पायलटनं जर्मनीत अडकलेल्या 192 लोकांना भारतात कसं आणलं?

प्राजक्ता पोळ
 
गेल्या महिन्यात कोरोना व्हायरसने जगभर हातपाय पसरले होते. रुग्णांची संख्या वाढतच होती. 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन जाहीर केलं.
विमानं, रेल्वे, रस्ते वाहतूक बंद झाली. असंख्य लोक आहे तिथेच अडकली. जर्मनीमध्ये 192 भारतीय लोक अडकून पडले होते.
जर्मनीच्या या लोकांना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी विशेष विमान सोडण्याचा निर्णय झाला. एअर इंडियाने त्यासाठी विशेष विमान तयार केलं. या परिस्थितीत या नागरिकांना घेऊन जर्मनीला कोण जाणार याची एअर इंडियाकडून विचारणा सुरू झाली. ज्यांनी होकार दिला त्यांना स्वयंसेवक म्हणून निवडण्यात आलं.
हे विमान जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात घेऊन जायचं होतं. त्यासाठी चार पायलटची निवड करण्यात आली होती. त्यापैकी एक होते मुंबईमध्ये गिरगावात राहणारे मोहनीश परब. गेल्या चार वर्षांपासून मोहनीश एअर इंडियामध्ये पायलट म्हणून काम करत आहेत.

पाकिस्तानकडून कौतुक

 
2 एप्रिल 2020 ला एअर इंडियाचं हे विमान फ्रँकफर्टला निघणार होतं. जर्मनीमध्ये कोरोनाची असलेली भयानक परिस्थिती पाहता मोहनीशच्या कुटुंबीयांना चिंता वाटणं साहजिक होतं. पण पूर्ण काळजी घेऊन आम्ही सुखरूप परत येऊ, असा विश्वास मोहनीशने त्याच्या कुटुंबीयांना दिला.
'काळजीची परिस्थिती असली तरी जे काम आहे ते केलंच पाहिजे', असं मोहनीश यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मास्क, हँडग्लोव्ज आणि पीपीई किट घालून मोहनीश आणि त्यांच्या सहकार्‍यांचा प्रवास सुरू झाला.
एरवी प्रचंड एअर ट्रॅफिक असणारे मार्ग त्या दिवशी पूर्णपणे खुले होते. मोहनीश आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी हा प्रवास नवीन नव्हता, पण नेहमीपेक्षा वेगळा निश्चितच होता. युनिफॉर्मवर चढवलेल्या त्या पीपीई किटमध्ये त्यांना अस्वस्थ वाटत होतं. इतका वेळ ते किट घालून विमान उडवणं आव्हानात्मक होतं. मात्र मोहनीश यांनी ते पेललं.
भारताची सीमा पार केल्यानंतर दुसऱ्या देशांच्या सीमेमध्ये प्रवास करताना परवानगी असावी लागते. भारतानंतर पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करावा लागतो. एरव्ही या हद्दीतून असंख्य विमानं जातात. पण तो दिवस वेगळा होता असं मोहनीश सांगतात.

मोहनीश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेलेल्या विमानाने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला. तेव्हा कराचीच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमने भारतीय वैमानिकांचं स्वागत केलं, तसंच कोरोनाच्या संकटात ही जोखिम पत्करून विमान घेऊन जाणार्‍या वैमानिकांचा आम्हाला अभिमान वाटतो असंही म्हटल्याचं वृत्त एनआयए वृत्तसंस्थेनं दिलं होतं.
भारत आणि पाकिस्तानचे संबंध कायमच तणावपूर्ण असतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानकडून कौतुकाचे शब्द ऐकल्यावर वैमानिकांना सुखद धक्का बसला.

पीपीई किट घालून 20 तासांचा अखंड प्रवास

पाकिस्तानातून या विमानाने इराणमध्ये प्रवेश केला. या टप्प्याबद्दल बोलताना मोहनीश सांगतात, "भारत आणि इराणचे संबंध चांगले असल्यामुळे इराणकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. प्रत्येक देशाचा एक 'रिस्ट्रिक्टेड झोन' असतो. त्या भागात परवानगीशिवाय प्रवेश करता येत नाही. पण आम्ही कोरोनाच्या या परिस्थितीत आम्हाला इराणने त्यांचा 'रिस्ट्रिक्टेड झोन'मधला शॉर्टकट खुला करून दिला. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला.
इराण, तुर्कस्थान, युरोप आणि फ्रँकफर्ट या सगळ्याच देशांकडून यावेळी उत्तम सहकार्य मिळालं. आम्ही फ्रँकफर्टला पोहचलो. नेहमीच्या परिस्थितीत आम्ही 2 दिवस तिथे राहतो. पण यावेळी तिकडे लोकांना सोडलं. आम्हाला तिकडच्या जमिनीवर न उतरताच परतायचं होतं. लोकांना उतरवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. साधारण 20 तासांचा प्रवास संपवून भारतात परतलो." हा प्रवास चांगलाच लक्षात राहण्यासारखा असल्याचं ते म्हणाले.

चीनहून आणले पीपीई किट्स

 
जर्मनीतून परतल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केलं. ते संपताच त्यांना पुन्हा एकदा विशेष मोहिमेवर पाठवण्यात आलं.
चीनमधून पीपीई किट्स आणण्यासाठी त्यांना शांघायला पाठवण्यात आलं. कोणत्याही देशात गेलं तरी त्या देशाच्या भूमीवर पाय ठेवायचा नाही अशा कडक सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या.
20 एप्रिलला मोहनीश आणि त्यांचे सहकारी शांघायला गेले. मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते शांघाय आणि पुन्हा शांघाय ते मुंबई असा 20 तासांचा प्रवास मोहनीश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला. चीनमध्ये झालेल्या कोरानाच्या प्रादुर्भावात हे वैमानिक जीवाची पर्वा न करता चीनला जाऊन वैद्यकीय साठा घेऊन आले याबाबत त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
सध्या मोहनीश पुन्हा एकदा क्वारनंटाईनमध्ये आहेत. सध्या विमानसेवा बंद आहेत, पण अशा विशेष मोहिमेत मोहनीश यांनी सहभाग घेतला आहे.