शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 29 एप्रिल 2020 (21:18 IST)

कोरोना व्हायरस : अस्तित्व टिकवण्यासाठी सर्कशींचा झगडा

चिंकी सिन्हा
भारतामध्ये सर्कशींना उतरती कळा यापूर्वीच लागलेली होती. आणि कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने या उरल्यासुरल्या सर्कशींचं कंबरडंही पार मोडून टाकलंय.
 
16 एप्रिलची रात्र.
 
रंगीबेरंगी ठिपक्यांचा ड्रेस, पांढऱ्या पावडरने रंगवलेला चेहरा, त्यावर गुलाल आणि लिपस्टिकने गालांवर लावलेला लाल रंग अशा अवतारात पन्नास वर्षांचे बिजू पुष्करन् सज्ज होतात आणि नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये सर्कशीने उभारलेल्या तंबूत प्रवेश करतात. एरवीपेक्षा इथे एकच गोष्ट वेगळी आहे. तंबू पूर्णपणे रिकामा आहे. एकही प्रेक्षक नाही.
 
बिजू ज्या रॅम्बो सर्कसमध्ये काम करतात, तिचा 6 मार्चपासून एकही खेळ झालेला नाही. पण त्या रात्री मात्र वर्ल्ड सर्कस डेच्या निमित्ताने सर्कशीचा खेळ झाला आणि त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आलं.
 
"आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला हसवणार आहोत," बिजूंनी जाहीर केलं.
त्या दिवशी प्रेक्षकांच्या टाळ्या आणि आरोळ्यांच्या शिवायच सर्कशीतल्या सगळ्यांनी खेळ सादर केला. पण कदाचित या सर्कशीच्या खेळावर कायमचा पडदा तर पडणार नाही ना, ही भीती सगळ्यांच्याच मनात होती.
 
24 मार्चला भारतात लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यानंतर लवकरच सर्कशीकडचं अन्नधान्य संपलं. त्यांना लोकांकडून मदत घ्यावी लागली.
पश्चिम बंगालमधल्या 61 वर्षांच्या चंद्रनाथ बॅनर्जींनी त्यांच्या ऑलिम्पिक सर्कसला टाळं ठोकत पथकातल्या 75 कलाकारांना घरी जायला सांगितलंय. 'या वाईट काळातून बाहेर पडलोच तर तुम्हाला नक्की बोलवीन', असं आश्वासनही त्यांनी या कलाकारांना दिलंय.
 
"त्यांना रडूच कोसळलं. लोकांनी सर्कशीचे शोज पहायला येणं गरजेचं आहे. पण आताच्या या 'आयसोलेशन'च्या या काळात आम्हाला थांबावं लागलं," ते सांगतात.
 
पण ग्रेटर बॉम्बे सर्कसचे 52 वर्षांचे मॅनेजर पी. व्ही. जयप्रकाशन यांनी अजूनही हार मानलेली नाही.
 
तामिळनाडूच्या मनारगुडी शहरातला त्यांच्या सर्कशीचा तंबू अजूनही उभा आहे.
 
"लॉकडाऊन उठवल्यानंतर काय होणार हे आपल्याला माहित नाही. कोरोना व्हायरसमुळे आम्ही सध्यातरी विंगेत वाट पाहात थांबलोय," त्यांनी सांगितलं.
 
सर्कशीच्या नॅशनल फेडरेशननुसार साधारण 20 वर्षांपूर्वी भारतात एकूण 23 सर्कशी खेळ सादर करत होत्या. शिवाय देशभरात 300 इतर लहान सर्कशीही होत्या.
 
2013मध्ये भारत सरकारने सर्कशीमध्ये जंगली प्राण्यांचे खेळ करण्यावर, लहान मुलांच्या सादरीकरणावर बंदी आणली आणि परिणामी अनेक सर्कशी दिवाळखोरीत गेल्या.
 
सध्या भारतामध्ये 10 नोंदणीकृत सर्कशी आहेत, 25 लहान सर्कस आहेत आणि एकूण 1500 कलाकार यात काम करतात. यामध्ये मणिपूर राज्यातल्या अॅक्रोबॅट टीम्सचाही समावेश आहे.
 
जंगली प्राण्यांच्या समावेशावर आलेल्या बंदीतून सावरत असतानाच या सर्कशींना पुन्हा फटका बसला तो नोटाबंदीचा. 2016मध्ये सरकारने मोठ्या चलनी नोटा बाद केल्या आणि रोख व्यवहारांवर अवलंबून असणाऱ्या सर्कशींना याचा तडाखा बसला.
 
आता कोव्हिड 19ची लस तयार होईपर्यंत टिकून राहण्यासाठी कर्ज मिळावं यासाठी भारतातल्या सर्कस चालकांनी पंतप्रधानांकडे मदत मागितली आहे. पंतप्रधानांच्या उत्तराची ते वाट पाहतायत.
 
जगभरातली परिस्थितीही यापेक्षा फारशी वेगळी नाही. जगप्रसिद्ध सर्क ड सोली (Cirque Du Soleil) मधून 95% कलाकारांना काढून टाकण्यात आल्याच्या बातम्या गेल्या महिन्यात झळकल्या होत्या.
 
वर्ल्ड सर्कस फेडरेशन (FMC) चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झुजाना माटा यांनी ईमेलद्वारे सांगितलं, "जगभर पसरलेल्या या साथीने सगळा इतिहासच बदलून टाकलाय. काहीच मिळकत नसल्याने सर्कशींना कलाकार, त्यांची कुटुंब आणि प्राण्यांना आधार देणं कठीण जातंय."
 
कदाचित ही साथ संपेपर्यंत आपल्या माहितीतली सर्कस, फक्त आठवणींपुरतीच उरेल.