कोरोना व्हायरस खवल्या मांजरामुळे पसरला?
कोरोना व्हायरसच्या प्रसाराची सुरुवात चीनमधून झाली होती पण हा विषाणू नेमका कोणत्या प्राण्यातून मानवी शरीरात आला, याबाबत ठोस पुरावा उपलब्ध नव्हता.
पण या विषयी नवी माहिती समोर आली आहे. चीनमध्ये तस्करी करून आणल्या गेलेल्या खवल्या मांजराच्या शरीरात कोरोना व्हायरसशी मिळते जुळते नमुने मिळाले आहेत.
दरम्यान, भविष्यात अशा प्रकारचे संसर्ग टाळायचे असतील, तर बाजारात जंगली प्राण्यांची विक्री करण्यावर बंदी घातली पाहिजे, असं एका आंतरराष्ट्रीय संघटनेनं म्हटलं आहे.
खवल्या मांजर हा एक सस्तन प्राणी आहे. पारंपरिक औषधांमध्ये वापर करण्यासाठी या प्राण्याची सर्वात जास्त तस्करी होते.
खरंतर कोरोना व्हायरसचा मूळ स्त्रोत वटवाघळं असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. वटवाघळातील व्हायरस इतर प्राण्यांच्या माध्यमातून माणसापर्यंत पोहोचल्याचं मानलं जातं.
संशोधनात काय म्हटलं?
नेचर जर्नलमध्ये प्रकाशित एका नव्या संशोधन अहवालात संशोधकांनी या व्हायरसच्या जेनेटिक माहितीबाबत सांगितलं आहे.
त्यांच्या मते, या प्राण्यांच्या बाबतीत अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. बाजारात यांच्या विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात यावेत.
चीन आणि दक्षिण-पूर्व आशियातील जंगलांमध्ये आढळून येणाऱ्या खवल्या मांजरावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यासाठी त्याची भूमिका आणि भविष्यात मानवामध्ये त्याच्या संसर्गाचा धोका, याबाबत अधिक माहिती समोर आली पाहिजे.
मुंग्या हे प्रमुख खाद्य असलेल्या खवल्या मांजराची तस्करी जगात सर्वाधिक होते, असं मानलं जातं. यामुळेच खवल्या मांजराची प्रजात आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
पारंपरिक चीनी पद्धतीचं औषध बनवण्यासाठी खवल्या मांजराच्या चामड्याला खूप मागणी आहे. तर काही लोकांना खवल्या मांजराचं मांस अत्यंत चविष्ट असल्याचं वाटतं.