गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (19:19 IST)

डॉ. राहुल पवार : ऊसतोड करून डॉक्टर झाला, पण कोरोनाने घात केला

असंख्य कोव्हिड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. राहुल पवार यांना कोरोनानेच गाठलं. कोरोनाशी लढता लढता त्यांचा मृत्यू झाला.
 
मागच्या एक ते दीड वर्षांपासून इंटर्न डॉक्टर्स हे कोरोना रुग्णांसाठी काम करत आहेत. पण आम्हाला कामाचं मानधन किंवा कोणतंही विमा कवच मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
काही दिवसांपूर्वी लातूर मेडिकल कॉलेजमधल्या इंटर्न डॉक्टर राहुल पवार यांचा कोव्हिड आणि 'मुक्यरमायकोसिस' या आजाराने मृत्यू झाला. इतके दिवस कोव्हिड रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा देऊन सुद्धा डॉक्टर राहुल पवार यांच्या उपचारादरम्यान सरकारकडून कोणतेही विमा कवच मिळाले नाही.
 
त्यामुळे गरीब कुटुंबातील असलेल्या डॉक्टर राहुल पवार यांच्या उपचारासाठी वर्गणी गोळा करण्याची वेळ आली. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
 
या सगळ्या प्रकाराचा निषेध म्हणून आज (सोमवार) राज्यातल्या जवळपास 5500 'इंटर्न डॉक्टर्सनी' काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. याचबरोबर डॉक्टर राहुल पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
 
राज्य वैद्यकीय इंटर्न असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रतिक देबाजे या आंदोलनाबद्दल म्हणाले, "इंटर्न डॉक्टर्सच्या गेल्या वर्षभरापासून कोव्हिड रूग्णांसाठीच सेवा देत आहेत. डॉक्टर राहुल पवार यांचा मृत्यू झाला. तेव्हा सोशल मिडियाच्या मदतीने वर्गणी जमवून मित्रांनी उपचारासाठी पैसे जमवले. ही परिस्थिती कोणावर येऊ नये. इंटर्न डॉक्टर्स हेही कोव्हिड योद्ध्यांप्रमाणे रूग्णसेवा देत आहेत. त्यांना शासनाने विमा कवच द्यावं ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर मानधन म्हणून फक्त 11,000 रूपये मिळत आहेत त्यातही वाढ करण्यात यावी."
 
हलाखीच्या परिस्थितीत तो डॉक्टर झाला होता...
परभणीतील पाथरी तालुक्यातील आनंदनगर भागात राहणारे डॉक्टर राहुल विश्वनाथ पवार. त्यांचे आई-वडील हे ऊसतोड कामगार आहेत. तरीही शिक्षणाचा ध्यास असलेल्या राहुल यांनी ऊस तोडण्याच्या कामात मदत करत लातूरच्या एमआयटी कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं.
हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी राहुल यांच्या आईवडिलांना खूप कष्ट करावे लागले. राहुल यांचे लहान भाऊ सचिन पवार सांगतात, "राहुल हा आमच्या घराण्यातला पहिला डॉक्टर होता.
 
राहुल डॉक्टर होणार हा अभिमान आईवडिलांच्या डोळ्यात, त्यांच्या बोलण्यातून कायम दिसायचा. त्याच्या शिक्षणासाठी व्याजाने पैसे उभे केले. काहीवेळा जिथे ऊसतोडणीचं काम करायचो तिथून कामाआधी पैसे उचलून अधिक काम केलं. राहुलमध्ये आमच्या कुटुंबियांला आमचं चांगलं भविष्य दिसायचं."
 
'महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स' ची एमबीबीएसची अंतिम वर्षाची परीक्षा झाली. परीक्षा सुरू असताना राहुल यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. परीक्षा झाल्यानंतर राहुल यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं लक्षात आलं. तेव्हा त्यांना औरंगाबादच्या 'एमजीएम' रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण कालांतराने राहुल पवार यांची प्रकृती गंभीर होत गेली.
 
उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. राहुल यांच्या मित्रांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकून मदतीचं आवाहन केलं. ही पोस्ट व्हायरल झाली. त्यातून राहुल यांच्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले.
 
पण 27 मेरोजी राहुल यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. सचिन पवार सांगतात, "देवाने आमच्याबरोबर खूप वाईट केलं. माझ्या आईबाबांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांना मी सावरण्याचा प्रयत्न करतोय. पण आमच्या मनात जे चाललंय ते मी तुम्हाला शब्दांत नाही सांगू शकणार. पण जे काही झालय ते वाईट झालंय".
 
8 लाखांचं बिल कसं भरणार?
डॉक्टर राहुल पवार यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या कुटुंबियांनी पुढील 2-3 वर्षांच्या कामाच्या पैशांची उचल घेतलीय. 5-6 लाख रूपये ऊसतोड कामगार असलेल्या राहुल यांच्या कुटुंबीयांनी जमा केले होते. जेव्हा त्यांचे पूर्ण पैसे संपले तेव्हा राहुल यांच्या मित्रांना ही परिस्थिती कळली.
राहुल यांचे मित्र डॉक्टर अमरनाथ गुट्टे सांगतात, "राहुलच्या कुटुंबियांनी 5-6 लाख जमवले. पण नंतर त्यांचे सगळे पैसे संपले. ते जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही सोशल मिडियाच्या माध्यमातून मदतीचं आवाहन केलं. आम्हाला मदतीचे खूप हात पुढे आले.
 
जवळपास 5-6 लाख रूपये विविध ट्रस्टकडून मिळाले. पण दुर्दैवाने राहुल यांचा मृत्यू झाला. एखाद्या इंटर्न डॉक्टरसाठी वर्गणी जमा करण्याची वेळ आली. त्यामुळे सरकारने याचा विचार करून इंटर्न डॉक्टरांना विमा कवच द्यावं ही विनंती आहे."