शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (19:21 IST)

जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं हेलिकॉप्टर अपघातात निधन

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे.
तामिळनाडूमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलानं ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, ज्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बिपीन रावत यांच्या विमानाला तामिळनाडूमधील कुन्नूर इथं अपघात झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
"तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा, ज्यामध्ये आपण जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कराच्या इतर जवानांना गमावलं आहे, त्याचा मला खेद आहे. त्यांनी पूर्ण निष्ठेने देशाची सेवा केली होती. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो."

दरम्यान, हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या 14 पैकी 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक पुरुष प्रवासी वाचला आहे. नीलगिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेने सांगितलं होतं.
या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं वायूसेनेने स्पष्ट केलं आहे.
हेलिकॉप्टर क्रॅश तामिळनाडूमधील नीलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये झालं. हेलिकॉप्टर सुलुर आर्मी बेसवरून निघालं होतं. जनरल रावत यांना घेऊन हे हेलिकॉप्टप वेलिंग्टन लष्करी छावणीच्या दिशेने जात होतं.
जनरल रावत हे एक जानेवारी 2020 मध्ये देशाचे पहिले चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
राजनाथ सिंह यांनी काही वेळापूर्वी जनरल रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली होती.
राजनाथ सिंह यांनी हा दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. त्यांनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजी
 
रावत यांच्या सुरक्षेसाठी सर्वांच्या प्रार्थना
बिपीन रावत यांच्या विमान अपघाताचं वृत्त कळल्यानंतर अनेकांनी त्यांच्या आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल नेते यांनीही ट्वीटरवर काळजी व्यक्त केली. ते म्हणाले, "चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर प्रवाशांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी मी प्रार्थना करतो.
राजभवनातील कार्यक्रम रद्द
दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजभवन येथे होणारा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना राजभवनाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी सांगितलं, "कार्यक्रमस्थळी येऊन राज्यपालकांनी माहिती दिली की दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर असा कार्यक्रम करणं योग्य ठरणार नाही. हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. राष्ट्रपती या कार्यक्रमासाठी येणार होते." आज (8 डिसेंबर) संध्याकाळी 4 वाजता मुंबईत राजभवन येथे नवीन दलबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार होते.