1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (12:35 IST)

भारताची गोल्फर आदिती अशोकचं करिअर

गोल्फमध्ये अखेर आदिती अशोकला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. अत्यंत दर्जेदार खेळ करत आदितीनं पदकासाठी दावा ठोकला होता. पण केवळ एका शॉटच्या फरकानं तिचं पदक हुकलं.
 
आदितीनं आजच्या 18 होलच्या चौथ्या राऊंडच्या सुरुवातीला अगदी पहिल्या स्थानापर्यंतही मजल मारली होती. पण काही होलसाठी पट करताना शॉटची संख्या वाढल्यानं तिचं पदक हुकलं.
 
मात्र आदितीची ही कामगिरी भारतीय गोल्फसाठी ऐतिहासिक अशी ठरली आहे. आदितीनं चौथ्या स्थानावर ही स्पर्धा संपवली.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॉकी, कुस्ती आणि इतर खेळांच्या गर्दीमध्ये कुणाचंही लक्ष नसलेल्या गोल्फमध्ये भारतासाठी आशा पल्लवित केल्या होत्या. आदिती अशोक पदकाच्या अगदी जवळ पोहोचली होती. मात्र, तिला चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं.
 
आदितीचं करिअर
आदिती अशोकचा जन्म 29 मार्च 1998 मध्ये बेंगळुरूमध्ये झाला होता. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून गोल्फ खेळायला सुरुवात केली होती. त्यावेळी बेंगळुरूमध्ये केवळ तीच गोल्फ कोर्स होते.
 
आदितीच्या वडिलांनी तिला गोल्फसाठी पाठिंबा दिला आणि तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.
 
आदिती 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ 18 वर्षांची होती. त्यावेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली ती सर्वात कमी वयाची खेळाडू होती.
 
पण रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती.
 
त्याशिवाय आदिती ही भारताची पहिली महिला गोल्फर आहे. तिनं एशियन यूथ गेम्स (2013), यूथ ऑलिम्पिक गेम्स (2014), एशियन गेम्स (2014) मध्ये सहभाग घेतला होता.
 
लल्ला आइचा टूर स्कूलला किताब मिळवून देणारी सर्वात कमी वयाची ती भारतीय आहे. या विजयामुळंच तिला 2016 मध्ये लेडिज युरोपियन टूर कार्डसाठी एंट्री मिळाली होती.
 
2017 मध्ये ती पहिली भारतीय महिली प्रोफेशनल गोल्फ असोसिएशन (LPGA) ची खेळाडू बनली.