बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2019 (10:58 IST)

मॅकडोनाल्ड्सच्या CEOची हकालपट्टी, कर्मचाऱ्याबरोबर सूत जुळवणं पडलं महागात

मॅकडोनाल्ड्स या जागतिक फास्टफुड ब्रँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची कंपनीतल्याच कर्मचाऱ्याबरोबर सूत जुळवल्यावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे.
 
स्टीव्ह यांचं हे नातं परस्पर संमतीचं असलं तरीही त्यांनी "काही चुकीचे निर्णय घेऊन" आणि "कंपनीचे नियम मोडले", असं मॅकडीतर्फे सांगण्यात आलं आहे.
 
स्टीव्ह यांनी एका ईमेलमधून कर्मचाऱ्यांबरोबर असलेल्या नातेसंबंधांबाबत कबुली देत, आपली चूक मान्य केली आहे.
 
"कंपनीच्या पॉलिसींचा विचार करता, मी कंपनीच्या मंडळाच्या मताशी सहमत आहे. मी आता इथून बाहेर पडण्याची वेळ आली आहे," असंही ते म्हणाले.
 
52 वर्षांचे स्टीव्ह घटस्फोटित आहेत. लंडनमधल्या मॅकडोनाल्ड्समध्ये ते 1993 सालापासून व्यवस्थापक म्हणून काम करू लागले.
 
यानंतर 2011 साली ते पिझ्झा एक्सप्रेस आणि वागामामा या आशियाई फूड चेनच्या प्रमुखपदी गेले. 2013 साली ते मॅकडोनाल्डला परतले आणि युके तसंच उत्तर युरोचे प्रमुख म्हणून काम पाहू लागले.
 
2015 साली स्टीव्ह यांची मॅकडोनाल्ड्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
मॅकडोनाल्ड्सच्या संचालक मंडळाने स्टीव्ह यांच्या गच्छंतीबद्दल शुक्रवारी मतदान घेतले. स्टीव्ह यांची रवानगी करत असताना त्यांना देण्यात येणारी मोठी रक्कम काय असेल, यावर सर्वांच अतिशय बारकाईनं लक्ष्य असेल.
 
कारण ही कंपनी आपल्या हॉटेलांमधील कर्मचाऱ्यांना देत असलेल्या पॅकेजवर टीका झाली होती. 2018 साली स्टीव्ह यांना वर्षाला 15 लाख 90 हजार डॉलर्सचं वेतन मिळत असल्याचं जाहीर झालं होतं, जे की एका सामान्य मॅकडी कर्मचाऱ्यांच्या 7,473 डॉलर्सच्या वेतनापेक्षा 2,124 पट जास्त होतं.
 
मॅकडोनाल्ड्स अमेरिकेचे प्रमुख ख्रिस केम्पिसिजन्स्की हे तातडीनं मॅकडोनाल्ड्स कॉर्पोरेशनची सूत्र स्वीकारतील.
 
केम्पिसिजन्स्की यांनी आपल्या निवेदनात स्टीव्ह ईस्टरब्रुक यांचे कंपनीतील योगदानाबद्दल आभार मानले आहेत. ते लिहितात की, "स्टीव्ह यांच्यामुळे मी मॅकडोनाल्ड्समध्ये आलो. त्यांनी मला नेहमीच चांगलं मार्गदर्शन केलं, सांभाळून घेतलं."
 
स्टीव्ह ईस्टरब्रुक यांच्या नातेसंबंधांबाबत कंपनीने अधिक तपशील देण्यास नकार दिल्याचं द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.
 
गेल्याच वर्षी इंटेल या जागतिक काँप्युटर कंपनीचे प्रमुख ब्रायन क्रायनच यांना कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याबरोबरच्या नातेसंबंधांमुळे पायउतार व्हावं लागलं होतं. मे 2013 पासून ते पदावर कार्यरत होते.