नाना पटोले: 'कोश्यारींना राजकारणाची खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा'
"राज्यपाल म्हणून जी कार्य करायची आहेत ती सोडून भगतसिंह कोश्यारी इतर कार्यातच जास्त रस घेताना दिसतात. राज्यपाल हा कोणत्याच पक्षाचा नसतो तो राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर राजकीय वक्तव्ये करावीत," अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पटोले बोलत होते.
26 जुलै रोजी कारगिल दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज्यपालांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरू यांच्या शांतीदूत धोरणामुळेच देशाचं नुकसान झाल्याचं कोश्यारी यांनी म्हटलं होतं. पण या वक्तव्यावरून नंतर वाद निर्माण झाला.
"हे विधान भारताचा अवमान करणारं असल्याचं सांगत कोश्यारी यांनी देशाची माफी मागावी," अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
कोश्यारी यांनी राजभवनला भारतीय जनता पक्षाचे कार्यालयच बनवले आहे, असं पटोले म्हणाले.
राज्यपालपदावर असतानाही त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर राजकीय वक्तव्ये करावीत, अशा शब्दांत नाना पटोलेंनी राज्यपालांवर निशाणा साधला.