मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

भारतीय पाहुण्यांबरोबर पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं गैरवर्तन

भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दुतावासात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. पण पाकिस्तानने याठिकाणी जाणाऱ्या पाहुण्यांना अडवलं. तसेच सुरक्षेच्या नावाखाली पाहुण्यांची छळवणूक केल्याचा आरोप भारतीय परराष्ट्र खात्याने केला आहे.
 
भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी सरीना हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. भारतीय दुतावासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना मनस्ताप सहन करावा लागला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं तसेच त्यांना धमकावलं.
 
पत्रकात म्हटलं आहे की इफ्तार पार्टीमध्ये पाहुण्यांनी येऊ नये म्हणून त्यांना धमकवण्यात आलं होतं. जे पाहुणे इस्लामाबादमध्ये पोहोचले त्यापैकी काही कराची आणि लाहोरहून आले होते. त्यांनी या पार्टीला पोहोचू नये यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी एकाप्रकारे या हॉटेलला चारीबाजूंनी घेरलं होतं.
 
भारताने पुढे म्हटलं आहे की इस्लामाबादमध्ये राहणाऱ्या भारतीय परराष्ट्र खात्यातील समुदायावर या जाचाचा सामना करण्याचा प्रसंग ओढवला आहे.
 
किमान 300 पाहुण्यांना या पार्टीत येऊ दिलं गेलं नाही असं भारतीय परराष्ट्र खात्याने सांगितलं आहे.
 
सुरक्षेच्या नावाखाली होणारा जाच थांबावा म्हणून ज्या भारतीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले त्यांच्याशी देखील गैरवर्तणूक झाल्याचं परराष्ट्र खात्याने म्हटलं आहे. त्यांचे मोबाईल देखील हिसकावून घेतले गेले.
 
शनिवारी झालेली घटना निंदनीय असल्याचं म्हणत या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी भारताने केली आहे.
 
अद्याप यावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
पाकिस्तानमधील पत्रकार महरीन जहरा मलिक यांनी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, 'सरीना हॉटेलमध्ये अभूतपूर्व छळ. भारतीय दुतावासात इफ्तार पार्टी होत आहे आणि पोलीस आणि दहशतवाद विरोधी तुकडी हॉटेलमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाशी खूप वाईट वर्तणूक करत आहेत.'
 
28 मे रोजी दिल्लीत पाकिस्तानी दूतावासाने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या इफ्तारसाठी भारतातील राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध लोक आले होते. पाकिस्तानी विद्यार्थीही या पार्टीत सहभागी झाले होते.
 
पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार भारतीय अधिकाऱ्यांनीही या मेजवानीसाठी आलेल्या पाहुण्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पाकिस्तान सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून एकमेकांविरोधात छळाचे आरोप लावले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा निवडून आल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या खऱ्या, पण त्यामुळे दोन्ही देशांमधील राजकीय आणि राजनयिक संबंध सुधारतील, असं म्हणता येत नाही.