गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

हिमा दासः देशासाठी गोल्ड पटकावत आसामच्या पुराकडे लक्ष वेधणारी ‘उडनपरी’

"ती वेडी होती एकदम. जवळून एखादी कार जरी गेली ना तर त्या चालत्या गाडीशी स्पर्धा असायची या बयोची. अशी सुसाट पळायची ना की बस!"
 
आसामच्या नौगाव या छोट्याशा गावात राहाणारे रत्नेश्वर दास. जुन्या आठवणींना डोळ्यासमोर येता येता त्यांच्या चेहऱ्यावर हसू तरळतं. त्यांना अजूनही आठवते, शेतातून, रानातून, चिखलातून अनवाणी धावणारी हिमा.
 
हिमा दास... तिला कुणी उडनपरी म्हणतं, कुणी गोल्डन गर्ल तर कोणी धिंग एक्स्प्रेस.
 
19 वर्षांच्या या पोरीने गेल्या एक महिन्यात आपलं पाचवं सुवर्णपदक जिंकलंय! तिने चेक रिपब्लिकच्या प्राग शहरात झालेल्या स्पर्धेत 400 मीटर आपलं पाचवं रेसमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.
 
याआधी तिने मागच्या बुधवारी ताबोर अॅथलॅटिक्स मीटमध्ये 200 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याआधीच्या क्लाडो अॅथलॅटिक्स मीट, कुंटो अॅथलॅटिक्स मीट आणि पोंझान अॅथलॅटिक्स ग्राँ प्रीमध्येही तिने गोल्ड मेडल पटकावलं.
 
पण एकीकडे ती जगभरात देशाची मान उंचावतेय तर दुसरीकडे या यशाद्वारे ती जगाचं लक्ष आपल्या पूरग्रस्त राज्याकडे वेधत आहे.
 
आसाममध्ये सध्या भयंकर पूर आलाय. अनेक गावं, जिल्हे पाण्याखाली आहेत. शंभरहून अधिक लोकांचा यामुळे जीव गेलाय तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत.
 
अशात हिमाने आपला अर्धा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ केला आहे. इतकंच नाही तर तिने ट्विटरवर इतरांनाही मदत करण्यासाठी आवाहन केलं आहे.
 
तिने थेट मुख्यमंत्री मदतनिधीच्या अकाउंटमध्ये आपली मदत जमा केली असून, यासाठी तिचं सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक होतंय.
 
हिमा सामाजिक चळवळीत सक्रिय आहे. ती ऑल आसाम स्टुडंट्स युनियन या संस्थेची स्पोर्ट्स सेक्रेटरी आहे. तिच्या भागात तिने अवैध दारूविरोधात मोहीम चालवली आहे.
 
पण तिचं हे यश सहज नाहीच आलं. किंबहुना या यशाची तिनेही कदाचित कल्पना केली नसेल. कारण एक तर घरची पार्श्वभूमी फार काही चांगली नव्हती आणि दुसरं म्हणजे तिची स्वप्नं वेगळी होती.
 
धावपटू बनायचं नव्हतं
हो, लहानपणी तर या 'उडनपरी'च्या डोक्यात धावपटू बनण्याचा विचार आला नव्हता. तिला आवडायचा तो फुटबॉल. तिचे लहानपणीचे मित्र जॉय दास तिच्या फुटबॉलच्या वेडेपणाविषयी सांगतात.
 
"खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गावातली मुलं फुटबॉल खेळत होती. हिमा आली आणि म्हणाली, 'मी पण खेळणार.' आम्ही म्हणालो, 'तू तर पोरगी आहेस. तुला काय जमणार?' तरी तिने ऐकलं नाही आणि खेळायला लागली. आमचं भांडण झालं आणि मारामारीही. पण नंतर आम्ही मित्र बनलो, तोवर हिमाने धडाधड गोल मारायला सुरुवातही केली होती."
 
हिमा सुरुवातीला फुटबॉल खेळायची आणि आपल्या गावात किंवा जिल्ह्यात छोट्यामोठ्या मॅचेस खेळून 100-200 रुपये जिंकायची.
 
फुटबॉल खेळून खेळून हिमाचा स्टॅमिना चांगलाच वाढला होता. आणि याचाच फायदा तिला ट्रॅकवर झाला.
 
प्रशिक्षकांनी केला खर्च
जानेवारी 2017 गुवाहाटीमध्ये हिमा एका कँम्पसाठी आली होती, त्यावेळेस तिचे प्रशिक्षक निपुण दास यांची नजर तिच्यावर पडली. ते सांगतात, "ती ज्याप्रकारे ट्रॅकवर पळत होती, ते पाहून माझ्या लक्षात आलं की ही मुलगी खूप पुढे जाणार."
 
यानंतर निपुण हिमाच्या आईवडिलांना भेटायला गेले आणि म्हणाले की तिला चांगल्या प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला पाठवा.
 
हिमाच्या पालकांना एकीकडे तिच्या कर्तबगारीची आस होती तर आपल्या पोरीचं प्रशिक्षण परवडत नाही, याचं दुःख. या कठीण परिस्थितीतून निपुण यांनीच रस्ता काढला.
 
ते म्हणाले की हिमाच्या गुवाहाटीत राहाण्याचा खर्च मी करतो तुम्ही फक्त तिला येण्याची परवानगी द्या. तिच्या आईवडिलांनी परवानगी दिली आणि हिमा इतिहासाच्या पानात आपलं नाव झळकवायला सज्ज झाली.
 
शेतकऱ्याची लेक
हिमा एका शेतकरी कुटुंबातून येते. त्यांचं एकत्र कुटुंब आहे, आणि अजूनही परिस्थिती अशी आहे की त्यांची हातातोंडाशी गाठ आहे.
 
हिमाचे वडील रंजीत दास यांना तिचा प्रचंड अभिमान आहे. ते सांगतात, "हिमा लहानपणापासून खूप धीराची आहे. तिच्यात हिंमतही फार आहे, मग ते मला शेतात मदत करणं असो किंवा गावातल्या कुण्या आजारी माणसाला दवाखान्यात नेणं असो, तिचं यश निर्विवाद आहे कारण ते तिने परिस्थितीशी झगडून मिळवलं आहे."
 
आजही हिमाच्या गावात तीन-चार तासच वीज येते. खेळण्यासाठी ना कुठलं ग्राऊंड आहे न कोणत्या सोईसुविधा.
 
2016 पर्यंत ज्या मैदानात हिमाने धावण्याची प्रॅक्टिस केली, तिथे आजही सकाळ-संध्याकाळ गुरं चरतात. वर्षातून तीन महिने पावसाचं पाणी भरलेलं असतं पण या सगळ्या अडचणींना हिमाने आपली ताकद बनवलं.
 
लोक शोधत होते तिची जात
12 जुलै 2018 साली हिमाने IAAF अंडर-20 अॅथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं. हा तो क्षण होता, जेव्हा सगळ्या जगाला भारताचा उडनपरीविषयी कळालं. सगळीकडून हिमावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
 
पण या सगळ्यातही काही लोकांना प्रश्न पडला होता, हिमाची जात काय? गुगलवर अचानक हिमा दास कास्ट या ट्रेंडने उसळी घेतली आणि भारतभरातून लोक हिमाची जात शोधत होते हे दिसून आलं.