बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (14:55 IST)

पंकजा मुंडे: भगवानगड आणि गोपीनाथगडाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी कार्यकर्त्यांना गोपीनाथगड येथे जमण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे परळी येथे आज सकाळपासून राजकीय वातावरणाला वेग आला आहे. पंकजा मुंडे या पराभूत झाल्या नसून त्यांना पराभूत केलं गेलं असं मत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी परळीत व्यक्त केलं.
 
आजच्या दिवशी पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहेत. त्यामुळे त्या पक्ष सोडतील किंवा इतर कोणत्या तरी पक्षात जातील असेही बोलले जात होते. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच पक्ष सोडणार की दुसरा कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
गोपीनाथगडावरील कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
 
यावेळेस बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, "भाजपची वाटचाल गेली चाळीस वर्षे आम्ही पाहिली आहे. शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून पक्षाला ओळखलं जायचं त्या पक्षाला बहुजन पक्षाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. शेकडो लोकांना एकत्र घेऊन जाण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. मुंडे साहेबांनी आमच्या सर्वांची महाराष्ट्राला ओळख करुन दिली. मुंडे साहेबांनी मोकळ्या मनाने कार्यकर्ता घडवला, त्यांनी कधीही पाठीत खंजिर खुपसला नाही. मुंडे साहेबांची आठवण आली की आज ओक्साबोक्शी रडावसं वाटतंय. तुम्ही (कार्यकर्ते) आहात म्हणून आम्ही जगतोय. ज्यानं सुखदुःखात हात दिला ते मुंडे आज आमच्यात नाही हे सहन होत नाही."
 
जिथं गोपीनाथ तिथं एकनाथ
जिथं गोपीनाथ तिथं एकनाथ असं म्हटलं जायचं असं सांगून खडसे म्हणाले, मुंडे साहेब आपल्यात नाहीत हे पटत नाही. पक्षाविरोधात बोलू नका असा पक्षानं आदेश दिला आहे. आज पक्षाचं जे चित्र आहे ते महाराष्ट्राला मान्य नाही. वरुन गोड बोलायचं आणि दुसऱ्याला साथ देऊन पाडायचं हे मला माहिती आहे. पंकजा मुंडे यांचं दुःख मला समजतंय. गोपीनाथ मुंडे यांच्या मतदारसंघात त्यांची मुलगी पराभूत झाली हे मला मान्य नाहीय
 
आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील परळीत दाखल झाले आणि त्यांनी पंकजा मुंडे यांच्याशी चर्चाही केली.
 
गे्ल्या आठवड्यात पंकजा यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांना अखेर मीडिया समोर येऊन उत्तर दिलं होतं. भाजप नेते विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी संध्याकाळी पत्रकारांशी बोलाताना त्यांची बाजू मांडली.
 
"मला आत्मचिंतनासाठी वेळ हवा आहे. मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेत असते. फेसबुक पोस्टची सर्व मीडियानं योग्य बातमी दिली. पण काही वर्तमानपत्रांनी मी पक्ष सोडणार अशा बातम्या दिल्या. त्यामुळे या चर्चेला वेगळा सूर मिळाला. मी यामुळे दुःखी आहे, व्यथित आहे. माझ्यावर असा आरोप केला जात आहे की मी कुठल्या पदासाठी असं करत आहे. पण उलट आता मला कुठलं पद मिळू नये म्हणून हे सगळं सुरू आहे का," असा सवाल पंकजा मुंडे यांनी मीडियाला उद्देशून उपस्थित केला आहे.