शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (16:42 IST)

अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्यातील 'ती' भेट ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं

दीपाली जगताप
18 फेब्रुवारी 2019...भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट झाली.
 
या दोनच नेत्यांमध्ये बंद दाराआड काही खलबतं झाली...नेमकी काय ते आजही स्पष्ट माहीत नाही. पण दोन्ही बाजूंनी भरपूर दावे मात्र केले गेलेत. अर्थात, हा पुढचा इतिहास.
 
आधी त्या बैठकीबद्दल...अमित शाह आणि उद्धव यांच्यामधील बैठकीतच 2019 साठी युतीच्या सत्ता वाटपाची गणितं ठरली.
 
ही भेट झाल्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 50-50 टक्के जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं जाहीर केलं.
विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि अगदी निकालाच्या दिवसापासूनच शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवायला सुरुवात केली.
 
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीतच ठरलं होतं, असा दावा केला आणि त्यानंतर जे घडलं ते सबंध महाराष्ट्राने पाहिलं.
 
आज (26 सप्टेंबर) मुख्यमंत्री बनल्यानंतर उद्धव ठाकरे अमित शाह यांच्यासमोर आले. जवळपास दोन वर्षांनंतर दोन्ही नेते एकमेकांसमोर आले.त्यामुळे दोघांनाही बंद दाराआड झालेल्या 'त्या' भेटीची आठवण नक्कीच झाली असेल.
 
'त्या' भेटीत काय घडलं?
फेब्रुवारी 2019 या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला. केंद्रात भाजप पुन्हा सत्तेत येईल का? याबाबत शंका व्यक्त केली जात होती.

जागा वाटपाच्या मुद्यावर शिवसेना अडून बसली होती आणि यामुळे 25 वर्षांपासून युतीत असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये भांडणं सुरू होती. गुप्त भेटी आणि युतीचा फॉर्म्युला अशा बातम्यांच्या मालिका रंगवल्या जात होत्या.
या काळात 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष मित शाह मुंबईत आले.वांद्रे येथील 'सोफिटेल' हॉटेलमध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील, आशिष शेलारअशा भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली.
 
संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास या भव्य हॉटेलच्या गेटवरुन गाड्यांचा ताफा बाहेर पडला. अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुरक्षेसाठीच्या गाड्यांचा ताफा थेट 'मातोश्री'कडे वळला.
 
यावेळी अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सोबत न घेताच उद्धव ठाकरे यांच्याशी खासगीत भेट घेतली.
 
साडे सहा वाजता सुरू झालेली चर्चा साधारण तासाभरानंतर संपली आणि 'मातोश्री'बाहेर आलेल्या गाडीत दोन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसले. पुढच्या सीटवर देवेंद्र फडणवीस आणि मागच्या सीटवर अमित शाह,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे होते.
 
हे दृश्य पाहताक्षणी युती निश्चित झाली हे उघड झालं. तिन्ही नेत्यांनी पुढच्या काळी वेळातच वरळी येथील 'ब्लू सी' हॉटेवर पत्रकार परिषद घेतली.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमच्यात मतभेद झाले तरी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेहमी एकत्र आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकरिता एकत्र येण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. लोकसभेत शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढवणार, तर विधानसभेत 50-50 टक्के जागा दोन्ही पक्ष लढवणार."
 
उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, "आता गुप्त बैठका घेण्याची गरज नाही. आता मी आणि मुख्यमंत्री उजळ माथ्याने राज्यभर फिरू. आता सत्तेत आणि जबाबदाऱ्यांमध्ये समसमान वाटप होईल. कटू आठवणी विसरणार नाही कारण त्याची पुनरावृत्ती टाळायला हवी."
 
लोकसभा निकालानंतर भाजपची रणनीती बदलली?
7 एप्रिल ते 19 मे 2019 या दरम्यान सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली.
 
परंतु निवडणुकीनंतर भाजपची स्थिती अटीतटीची होऊ शकते असं अनेक मतदानपूर्व चाचण्यातून समोर आलं होतं. बहुमत न मिळाल्यास मित्रपक्षांची गरज लागणार हे ओळखून भाजपनं शिवसेनेसारख्या जुन्या मित्रांशी जुळवून घ्यायला सुरुवात केली होती,हे उघड होतं.अमित शहांची 'मातोश्री' भेट त्याच तडजोडीचा भाग होती.
 
मात्र बालाकोट प्रकरणानंतर भाजपने प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा प्रकर्षाने आणला आणि भाजपला घवघवीत यश मिळालं.
 
23 मे 2019 रोजी मतमोजणी झाली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 542 पैकी (NDA) तब्बल 350 जागा जिंकल्या. भाजपने 303 जागा जिंकत स्वबळावर सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवलं.
 
राज्यात भाजपने 25 जागा लढवून 23 जिंकल्या तर सेनेने 23 लढवून 18 जिंकल्या. यामुळे इथेही भाजप मोठा भाऊ ठरला.
 
या निकालानंतर अवघ्या सहा महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली होती. त्यामुळे अर्थात या अभूतपूर्व निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचं चित्र होतं.
 
लोकसभा निकालानंतर केंद्रात भाजपला आपली मदत लागेल आणि त्याबदल्यात राज्यात आपल्या पदरात काहीतरी पाडून घेता येईल असा विचार शिवसेना करत होती.परंतु तसं काहीच घडलं नाही आणि आता शिवसेनेला भाजपचं ऐकावं लागेल असं चित्र दिसू लागलं. अखेर तसं घडलं सुद्धा.
 
ऑक्टोबर 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवार यादी जाहीर केली आणि पहिल्यांदाच शिवसेनेला 150 पेक्षा कमी जगा दिल्या गेल्या. शिवसेनेने 124 आणि भाजपने इतर मित्रपक्षांसह 164 जागा लढवल्या.
यानंतर शिवसेनेतील खदखद वाढतच गेली. भाजपने शिवसेनेचं महत्त्व कमी केलं, ग्रामीण भागात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही भाजप वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
 
'भाजपने शब्द फिरवला'
विधानसभा निकालानंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि युती सरकार सत्तेत आल्यास अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे द्या, अशी मागणी केली.
 
खरं तर याला मागणी सुद्धा म्हणता येणार नाही.कारण अमित शाह यांच्यासोबत झालेल्या खासगी भेटीत 'असंच ठरलं होतं' असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.त्यामुळे अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
 
मात्र भाजपने 'असं कधी ठरलच नव्हतं' असा दावा केला.त्यामुळे 'भाजपने शब्द फिरवला' अशी टीका शिवसेनेकडून आजही केली जाते.
 
अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' बंद दाराआडच्या भेटीनंतर तीन वर्षांनी 7 फेब्रुवारी 2021 रोजी अमित शाह यांनी पहिल्यांदाच यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली.
 
'आम्ही वचनावर अटळ राहणारे लोक आहोत.आमच्यावर खोटं बोलल्याचा आरोप केला गेला,' असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या 'भाजपनं शब्द फिरवला' या आरोपाला उत्तर दिलं.
 
'मी काहीही एका खोलीत करत नाही. जे काही करतो ते जाहीरपणे करतो,' असंही अमित शाह यांनी म्हटलं.
 
'त्या' भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नेमकं कोणी कोणाला काय आश्वासन दिलं? याबाबत कायम दोन दावे करण्यात आले. शिवसेना आणि भाजप दोघांनी यासंदर्भात वेगवेगळे दावे केले. आता यात खरं काय आणि खोटं काय हे माहित नाही. पण या बंद दाराआडच्या भेटीने महाराष्ट्राचं अख्खं राजकारण ढवळून निघालं हे निश्चित.