बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (22:35 IST)

कोरोना लशीमुळे शरीर चुंबक झाल्याच्या दाव्यात तथ्य नाही- डॉक्टरांनी केलं स्पष्ट

प्रवीण ठाकरे
कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व आलं असा दावा नाशिकच्या एका ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.
मात्र डॉक्टर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या दाव्यात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
हे प्रकरण काय आहे आणि हा दावा फेटाळताना डॉक्टरांनी कोणती शास्त्रीय कारणं दिली आहेत, ते आपण जाणून घेऊ.
कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला नाणे आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा अरविंद सोनार यांनी केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे.
लस घेतल्यामुळे हे झालेलं नसावं, तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार असल्याचं नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी म्हटलं आहे.
आपल्या शरीराला नाणी चिकटत असल्याचा व्हीडिओ त्यांनी शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे.
 
दुसरा डोस घेतल्यानंतर'मॅग्नेटमॅन' बनल्याचा दावा
नाशिकमधील शिवाजी चौक येथे राहणारे अरविंद सोनार यांनी 4-5 दिवसांपूर्वी लशीचा दुसरा डोस खासगी रुग्णालयात घेतला होता.
अरविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ते आणि त्यांचे चिरंजीव असेच एकमेकांशी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी मुलाने त्यांना लशीबाबत एक बातमी दाखवली. कोरोना लस घेतल्यावर स्टील शरीराला चिकटते, असा या बातमीचा आशय होता. त्यानंतर आपणही तो प्रयोग करून पाहू, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यावेळी खरंच स्टीलच्या वस्तू त्यांना चिकटू लागल्याने त्यांना आश्चर्य वाटलं."
सोनार यांची तब्येत ठणठणीत असून दोन्ही डोस घेतल्यानंतर त्यांना काहीही त्रास झालेला नाही, असं त्यांनी सांगितलं.
अरविंद सोनार यांनी कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस 9 मार्च रोजी घेतला होता. त्यानंतर 2 जूनला त्यांनी दुसरा डोस घेतला.
त्यांची दहा वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे. शिवाय त्यांना गेल्या दोन वर्षांपासून मधुमेहाचा त्रास असून त्यावर औषधोपचार सुरू आहेत. अरविंद यांना स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचं निदर्शनास येताच त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना याबाबत माहिती दिली.
 
'कोरोना लस नाही, तर विज्ञानाच्या नियमामुळे हे घडलं'
सोनार यांनी जो दावा केला आहे ते का घडलं असावं हे समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांच्याशी संवाद साधला. ते सांगतात, "कोरोनाची लस आणि अंगाला नाणी, भांडी चिकटण्यामागे पदार्थ विज्ञानाचा नियम आहे. त्याचा कोरोना लसीकरणाशी संबंध जोडणे चुकीचे आहे. त्वचेवर ओलसरपणा असेल आणि निर्वात पोकळी असेल तर भांडी चिकटू शकतात. अंनिसच्या अनेक कार्यकर्त्यांनी या आधीही असे दावे फोल ठरवले आहेत."
"लसीकरण हे करोना विरोधी लढ्यातील महत्त्वाचे शस्त्र आहे. त्याविषयी सनसनाटी दावे करण्याआधी त्याची चिकित्सा होणे आवश्यक आहे," असं दाभोलकर सांगतात.
जे. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील सोनार यांचा दावा फोल ठरवला आहे. ते सांगतात, "आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांना आपण लस दिली आहे. कोव्हिडविरोधी लस आणि अंगाला वस्तू चिकटण्याचा काही संबंध नाही. वैज्ञानिकही काही संबंध होत नाही.त्यांच्या त्वचेला काहीतरी असेल याचा तपास डॅाक्टरांकडून करून घ्यावा. पण लशीचा संबंध लावणं योग्य होणार नाही. लशीमुळे अशा प्रकारची कोणतीही गोष्ट होत नाही."
 
'प्रकरणाची चौकशी करणार'
या घटनेचं कारण जाणून घेण्यासाठी बीबीसीने नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी चर्चा केली.
या घटनेची माहिती आपल्याला माध्यमांमधूनच मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. "या प्रकरणी तज्ज्ञ पाठवून त्यासंबंधी एक अहवाल शासनास पाठवणार आहे. त्यानंतर शासन निर्देशानुसार कार्यवाही होईल," असं ते म्हणाले. शिवाय, "लशीमुळे असं काही होईल, हा दावाही त्यांनी फेटाळून लावला."
त्यांच्या मते, हा प्रकार नेमकं काय याची सखोल माहिती घेणं आवश्यक आहे. हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे.
"माझ्या संपूर्ण वैद्यकीय कारकिर्दीत आपण पहिल्यांदाच अशी घटना पाहतोय," अशी प्रतिक्रिया डॉ. थोरात यांनी दिली.
'लशीशी संबंध नाही'
एखाद्या व्यक्तीच्या शरीराला धातू का चिकटतो याचा अभ्यास धातूतज्ज्ञांनी देखील करावा असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. समीर चंद्रात्रे यांनी म्हटलं आहे.
"अंगाला वस्तू चिकटणं आणि कोव्हिड लशीचा काहीही संबंध नाही. कोणत्याही गोष्टीचा लशीचा संबंध लावण्याने अफवांचं प्रमाण वाढेल. लोकं लस घेण्यासाठी घाबरतील," असं डॉ. चंद्रात्रे सांगतात."लस घेतल्यानंतर अंगदुखी, ताप यांसारखे साईडइफेक्ट होतात. इतर कोणतीही गोष्ट शरीरात घडली तर लशीशी संबंध जोडू नका. याचा लसीकरण मोहिमेवर परिणाम होऊ शकतो. या व्यक्तींच्या शरीरावर गोष्टी का चिकटतात याचा अभ्यास फिजिसिस्टने किंवा धातूंवर संशोधन करणाऱ्यांनी करावं," डॉ. चंद्रात्रे सांगतात.