शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 18 जुलै 2021 (17:38 IST)

टोकियो ऑलिम्पिक : युगांडा,दक्षिण आफ्रिकेच्या संघामधील काहींना कोरोनाची लागण

टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी 90 भारतीय खेळाडूंची एक तुकडी आज (18 जुलै) जपानमध्ये दाखल झालीय.
 
एकीकडे ऑलिम्पिक आणि दुसरीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या यामुळे चिंता वाढली आहे.
 
रविवारी (18 जुलै) 2 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्याच्या एक दिवस आधी या संघातल्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती.
 
कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंना क्वारंटाईन केलं असून त्यांच्या संघातील इतर खेळाडूंना त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये आयसोलेट केलं आहे.
 
दक्षिण आफ्रिकेचे फुटबॉल प्रशिक्षक डेव्हिड नोटोने यांनी बीबीसीला सांगितलं की,ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या संघातील खेळाडू आणि अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.विमानतळावरील त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली होती.
 
यामुळे संघावर काय परिणाम झाला, याविषयी डेव्हिड यांनी माहिती दिली.
 
"या खेळाडूंना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.आता सगळ्या गोष्टी ट्रेस कराव्या लागतील. शनिवारी (17 जुलै) आमचं पहिलं प्रशिक्षण सत्र होतं, पण ते रद्द झालं. या स्पर्धेतील गोष्टींवर परिणाम होण्याच्या दृष्टीनं कोरोनाची लागण भीतीदायक आहे."
 
खेळाडूंमध्ये चिंता
आतापर्यंत युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघामधील काहींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
 
ऑलिम्पिकशी संबंधित एकूण 10 कोरोनाचे रुग्ण रविवारी (18 जुलै) आढळले. यात खेळाडू,मीडिया,कंत्राटदार आणि इतरांचा समावेश आहे.
 
टोकियो ऑलिम्पिकसाठी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ शनिवारी केर्न्स येथील त्यांच्या प्री-गेम्स प्रशिक्षण शिबिरात त्यांच्या खोल्यांमध्ये अलगीकरणात ठेवण्यात आला.त्यानंतर या खेळाडूच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या.
 
आयोजक काय म्हणताहेत?
खेळांचे प्रमुख सेईको हाशिमोटो यांनी शनिवारी सांगितलं, "कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करत आहोत. पण, जर कोरोनाचा उद्रेक झालाच तर त्याला प्रतिसाद देण्याकरता आमच्याकडे दुसरी योजना असेल,अशी आम्ही खात्री करत आहोत."
 
ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर काही खेळाडूंनी बीबीसीबरोबर बोलताना याबाबतची चिंता व्यक्त केली.
 
जपानमधील कोरोनाची स्थिती कशी आहे?
गेल्या काही दिवसांपासून जपानमधील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या 4 दिवसांपासून राजधानी टोकियामध्ये दरदिवशी हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत.
 
आयोजनकर्ते कोरोनाचा प्रसार कसा रोखणार,याविषयी इथल्या काही स्थानिकांनी आमच्याशी बोलताना चिंता व्यक्त केली.
 
यांतील अनेक जण या खेळांना विरोध करत आहेत, कारण यामुळे कोरोनाचा मोठा उद्रेक होईल,अशी भीती त्यांच्या मनात आहे.
 
भारतीय खेळाडू
90 भारतीय खेळाडूंची तुकडी टोकियोमध्ये पोहोचली असून यात तिरंदाजी आणि बॅडमिंटन संघाचा समावेश आहे.
विमानतळावरील लांबलचक प्रक्रियेनंतर हे खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजकडे निघाले आहेत.