गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (19:17 IST)

टूलकिट प्रकरण : बीडच्या शंतनू मुळूक यांना अटकपूर्व ट्रांझिट जामीन

टूलकिट प्रकरणातील आरोपी बीडचे शंतनू मूळूक यांना बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने 10 दिवसांचा ट्रांझिट जामीन दिला आहे.
 
टूलकिट प्रकरणी बंगळुरूची पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवींच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी शंतनू यांच्या घरी छापेमारी केली होती. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइमची टीम गेल्या दोन दिवसांपासून बीडमध्ये तपास करत आहे.
दरम्यान, टूलकिट प्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्या ट्रांझिट जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात मंगळवारी (16 फेब्रुवारी) सुनावणी झाली. हायकोर्टाने निकिताच्या याचिकेवर निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवला आहे.
 
मुळूक आणि निकिता जेकब यांची चौकशी
 
याआधी, पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांच्यानंतर दिल्ली पोलीस 'टूलकिट' प्रकरणात महाराष्ट्रातून आणखी दोन जणांची चौकशी करत असल्याचं समोर येत आहे.
 
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट करणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी हेच 'टूलकिट' शेअर केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
 
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतून निकिता जेकब आणि बीड जिल्ह्यातून शंतनू मुळूक या दोघांविरोधात वॉरंट बजावण्यात आलं आहे. त्यांच्यावर अजामीनपात्र आरोप ठेवण्यात आलं आहेत.
 
निकिता जेकब यांनी मुंबई उच्च न्यायालयात चार आठवड्यांची मुदत मिळावी यासाठी दाद मागितली आहे.
शंतनू मुळूक या तरुणाच्या बीड जिल्ह्यातील राहत्या घरी दिल्ली पोलिसांनी धाड टाकली असून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली असून शंतनू यांच्या आई-वडिलांची चौकशी केली.
 
या तिघांनीही गुगलचा 'टूलकिट' दस्तऐवज तयार केला आणि तो शेअर केला अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीपूर्वी मोहिमेचे नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये झूम कॉल झाल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे.
दिशा रवी
 
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रेटा थनबर्ग यांनी शेअर केलेलं टूलकिट पोएटिक जस्टीस संस्थेने तयार केलं आहे. या संस्थेने निकिता जेकब यांना संपर्क केला होता. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संस्थेने निकिता यांना ट्विटरवर एक मोहीम सुरू करण्यास सांगितलं. ही संस्था खलिस्तानी गट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
 
दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू पोएटिक जस्टीस संस्थेच्या झूम कॉलसाठी उपस्थित होते. या बैठकीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर एक मोहीम सुरू करण्याचं नियोजन झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
कोण आहे शंतनू मुळूक?
शंतनू बीई मेकॅनिकल आहेत. बीडच्या चाणक्यपुरी भागात ते राहतात. त्यांनी अमेरिकेतून एमएसची पदवी घेतली असून ते पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करतात.
 
शंतनू औरंगाबाद येथे नोकरी करत होते. नव्याने काहीतरी सुरू करण्यासाठी ते पुण्यात गेले होते.
दिल्ली पोलिसांचे अधिकारी आमची चौकशी करत असून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं शंतनू यांच्या पालकांनी सांगितलं आहे.
 
शंतनूचे वडील म्हणतात, "तो पर्यावरणासाठी काम करत होता. लॉकडॉऊनमध्ये आमच्यासोबतच होता. सात तारखेला आमच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं त्यासाठी तो आला होता. तेव्हा त्याच्याशी शेवटची भेट झाली. आम्हालाही त्याची काळजी वाटते आहे."
 
"12 तारखेला सकाळी दिल्ली पोलिसांची टीम आली होती. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यांनी मला चौकशीसाठी औरंगाबादमध्येही नेलं," असं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे.
 
टूलकिट म्हणजे नेमकं काय?
सध्याच्या काळात जगभरात जितकी आंदोलनं होतात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन केलं जातं.
 
यामध्ये 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर्स' असो की अमेरिकेतील 'अँटी-लॉकडाऊन प्रोटेस्ट' किंवा पर्यावरणाशी संबंधित 'क्लायमेट स्ट्राईक कँपेन' अशा प्रकारच्या कोणत्याही आंदोलनाचं नियोजनाचं काम केलं जातं.
याठिकाणी आंदोलन पुढे नेण्यासाठी त्याच्याशी संबंधित लोक विशिष्ट प्रकारचं नियोजन करत असतात. यासाठीचे मुद्दे लिहून संबंधित लोकांना पाठवले जातात. यालाच 'टूलकिट' असं संबोधलं जातं.
 
टूलकिट शब्दाचा वापर सोशल मीडियाच्या संदर्भात जास्त प्रमाणात होतो. यामध्ये सोशल मीडियावरील रणनितीसह प्रत्यक्षपणे करण्याच्या गोष्टींची माहिती दिलेली असते.
 
आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्याचा प्रभाव वाढवण्याची क्षमता असलेल्या लोकांना हे टूलकिट शेअर केलं जातं. त्यामुळे टूलकिट हे कोणत्याही आंदोलनाच्या नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे, असं आपल्याला म्हणता येईल.
भिंतींवर लावायच्या पोस्टर्सचं आधुनिक स्वरुप म्हणून टूलकिटची व्याख्या करता येईल.
 
वर्षानुवर्षे आंदोलन करत असलेले लोक इतरांना आवाहन करण्यासाठी याचा वापर करू शकतात.
 
सोशल मीडिया आणि मार्केटिंग तज्ज्ञांनुसार, या टूलकिटचा मुख्य उद्देश लोकांमध्ये (आंदोलनाचे समर्थक) समन्वय साधणं हा असतो.
 
लोक काय लिहू शकतात, कोणते मुद्दे वापरू शकतात, कोणता हॅशटॅग वापरावा, कोणत्या वेळी ट्वीट केल्यास जास्त उपयोगी ठरेल, या सर्व गोष्टी या टूलकिटमध्ये दिल्या जातात.