शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (19:18 IST)

पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जी यांची नंदीग्रामची उमेदवारी 'मास्टर स्ट्रोक' आहे का?

प्रभाकर मणि तिवारी
बीबीसी हिंदीसाठी, कोलकात्याहून
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मेदिनीपूर जिल्ह्यातल्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
 
त्यांचा हा निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. पण, शुभेंदू अधिकारी यांच्या साहाय्यानं या भागात सत्ता प्रस्थापित करण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी बॅनर्जी यांनी असा निर्णय घेतला आहे का?
 
तसं पाहिलं तर आपल्या राजकीय कारकिर्दीत अशाप्रकारच्या निर्णयांसाठी ममता नेहमीच प्रसिद्ध राहिल्या आहेत. पण, नंदीग्राममधून निवडणूक लढवण्यामागे अनेक कारणं आहेत.
 
नंदीग्राम हे फक्त गाव नसून पश्चिम बंगालच्या राजकारणात बदलाचं प्रतीक आहे. 2007 मध्ये इथं भूसंपादन कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान पोलिसांनी फायरिंग केल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ही जागा जगभरात चर्चेचा विषय ठरली होती.
 
नंदीग्राम... विजयाची वाट?
 
याच आंदोलनानं राज्यातील डाव्या संघटनांची तीन दशकांची सत्ता संपुष्टात आली आणि ममता यांच्यासाठी सत्तेची वाट मोकळी करून दिली. आता 14 वर्षांनंतर ही जागा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
 
आता मात्र नंदीग्राम वेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. एकेकाळी ममता यांचा उजवा हात असलेले आणि आंदोलनाची रुपरेषा ठरवून नंदीग्रामला जगभरात पोहोचवणारे शुभेंदू अधिकारी यावेळी मात्र भाजपमध्ये सहभागी झाले आहेत.
 
त्यांच्या साहाय्यानं बंगालमध्ये सत्ता काबीज करायचा भाजपचा प्रयत्न आहे. पण, आता त्याच शुभेंदू यांच्या किल्ल्यात ममता बॅनर्जी यांनी स्वत: निवडणूक लढायचं जाहीर केलं आहे.
 
ममता यांनी सोमवारी (19 जानेवारी) नंदीग्राममधील रॅलीत ही घोषणा केली. शुभेंदू यांनी डिसेंबर महिन्यात तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या भागातील ममता यांची ही पहिली रॅली होती. 2016मध्ये टीएमसीच्या तिकीटावर शुभेंदू यांनी या जागेवर विजय मिळवला होता.
 
नंदीग्राममधील रॅलीत ममता यांनी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं.
 
त्यांनी म्हटलं, "मी माझं नाव विसरू शकते, पण नंदीग्रामच नाही. नंदीग्राम बळजबरीच्या भूसंपादनाच्या विरोधातील प्रतीक आहे. ही जागा नेहमीच पक्षासाठी सुदैवाची राहिली आहे. मी 2016मध्ये इथूनच टीएमसीच्या पहिल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं होतं."
 
ममता यांनी 14 मार्च 2007मध्ये पोलीस फायरिंगमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मासिक पेंशन देण्याचं जाहीर केलं.
 
ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आल्या आहेत. मी भवानीपूरच्या जनतेच्या भावनेची उपेक्षा करू शकत नाही, असंही ममता यांनी म्हटलं आहे. यामुळे मग त्या दोन जागांवर लढतील, असा अंदाज बांधला जात आहे.
 
शुभेंदू अधिकारी - भाजपचा हुकूमी एक्का
 
शुभेंदू अधिकारी यांचं नाव न घेता ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, "पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची चिंता करू नका. ज्यावेळी टीएमसी पक्ष निर्माण झाला, त्यावेळी हे नेते पक्षात नव्हते."
 
ममता यांनी म्हटलं, "मी नेहमीच नंदीग्रामहून निवडणूक मोहिमेची सुरुवात केली आहे. ही जागा माझ्यासाठी लाभदायी ठरली आहे. काही जण बंगालला भाजपच्या हातात विकू पाहत आहेत. पण, मी असं होऊ देणार नाही. टीएमसी सोडणारे देशाचे राष्ट्रपती तसंच उपराष्ट्रपती होऊ शकतात. पण, मी जिवंत असेपर्यंत बंगालची भाजपच्या हातानं विक्री होऊ देणार नाही."
 
आता इथं प्रश्न उपस्थित होत आहे की, ममता बॅनर्जी यांनी असा निर्णय का घेतला? यामागे अनेक कारणं आहेत.
 
पहिलं म्हणजे ज्या शुभेंदू अधिकारी यांचा हात पकडून भाजप बंगालमध्ये सत्ता मिळवू पाहत आहेत, त्या अधिकारी यांना त्यांच्याच घरात ममता यांनी घेरलं आहे.
 
गेल्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकत भाजपनं बंगालमध्ये टीएमसीला झटका दिला होता. असं असलं तरी झारखंड नजीकच्या भागात भाजपची कामगिरी खराब राहिली. याचं एक कारण हे होतं की या भागात भाजपकडे ममता किंवा शुभेंदू यांच्या तोडीचा नेता नव्हता.
 
आता शुभेंदू यांना आपल्याकडे खेचून भाजप या भागात सत्ता स्थापन करू पाहत आहे. पण, ममता यांच्या घोषणेमुळे भाजपला आव्हान दिलं आहे. भाजप शुभेंदू यांचा पुरेपूर वापर करू पाहत आहे. यामुळे आता ते दुसऱ्या जागेवरून लढतील, असा अंदाज बांधला जात आहे.
 
शुभेंदू दक्षिण बंगालमध्ये पक्षाची मूळं मजबूत करतील, अशी भाजपला आशा होती. पण आता शुभेंदू यांची वाट खडतर राहणार आहे.
 
ममता यांचा निर्णय महत्त्वाचा का?
 
दुसरं कारण हे आहे की, यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण होण्याची मोठी शक्यता आहे. अशात जर ममता बॅनर्जी मेदिनीपूर जिल्ह्यातल्या मागास भागातून निवडणुकीला सामोरं जात असतील, तर त्यांना भाजपच्या बाजूनं होणाऱ्या हिंदू मतदारांच्या ध्रुवीकरणावर नियंत्रण मिळवणं शक्य होऊ शकतं.
 
पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात मुस्लीम जवळपास 14.6 टक्के आहेत. पण, नंदीग्राममध्ये मात्र मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार, नंदीग्राम ब्लॉक-1, ब्लॉक-2 आणि नंदीग्राम कस्बा येथील मुस्लिमांची संख्या अनुक्रमे 34, 12.1 आणि 40.3 टक्के होती. गेल्या 10 वर्षांत ही संख्या वाढली आहे.
 
गेल्या तीन निवडणुकांचे निकाल पाहिले तर नंदीग्राममधील मुस्लीम मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरल्याचं दिसून येतं. 2006 सालच्या विधानसभा निवडणुकीत इथं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर मुस्लीम उमेदवार होते. तेव्हा विजयी आणि पराभूत उमेदवारामधील मतांचं अंतर 3.4 टक्के इतकं होतं.
 
 
2011मध्ये टीएमसीटच्या मुस्लीम उमेदवारानं सीपीआयच्या हिंदू उमेदवाराचा पराभव केला होता. पण, विजयी आणि पराभूत उमेदवारामधील मतांचं अंतर 26 टक्के इतकं होतं. 2016मध्ये या जागेवर शुभेंदू अधिकारी यांना 2011मध्ये टीएमसीला मिळालेल्या मतांपेक्षा 7 टक्के अधिक मतं मिळाले होते. त्यावेळी सीपीआयनं इथं एक मुस्लीम उमेदवार दिला होता.
 
ममता यांनी नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेतला नसता, तर टीएमसीनं इथून मुस्लीम उमेदवारच दिला असता, असं जाणकार सांगतात.
 
त्या परिस्थितीत भाजपला नंदीग्राम आणि परिसरात हिंदू मतदारांच्या ध्रुवीकरणास मदत मिळाली असती. पण, आता ममता यांच्या निर्णयामुळे भाजपच्या डावपेचांना फटका बसला आहे.
 
ममता बॅनर्जी दक्षिण कोलकात्यातल्या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आल्या आहेत. आता नंदीग्राम निवडण्यामागे एक कारण असंही सांगितलं जात आहे की, यावेळेस भवानीपूर मतदारसंघात बाजी मारणं ममता यांच्यासाठी सोपं नव्हतं.
 
2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं या विधानसभा क्षेत्रात टीएमसीवर 0.13 टक्क्यांनी वर्चस्व मिळवलं होतं. पण, 2016मध्ये मात्र ममतांनी इथं भरघोस मतांनी विजय मिळवला होता. पण, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीला भाजपच्या तुलनेत केवळ 2 टक्क्यांनी अधिक मतं मिळाली आहेत.
 
भवानीपूर भागात बिगर-बंगाली हिंदूंची संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपची पहिल्यापासून या भागावर नजर आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासहित अनेक नेत्यांनी या भागात रोड शो केले आहेत. राज्यातल्या कोलकाता शहरात हिंदी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे.
 
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कोलकाता महानगर पालिकेच्या निवडणुका होतात. या निकालांवरून शक्यता वर्तवणं सोपं काम असतं. पण, यावेळेला कोरोनामुळे निवडणूक झाली नाही. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर इथल्या परिस्थितीत काय बदल झाला, याचा अंदाज लगेच बांधता येणं शक्य नाही.
 
हिंदी भाषिक भाजपच्या बाजूनं?
 
ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या नेत्यांचा उपरे किंवा बाहेरचे असा उल्लेख केला आहे. हा मुद्दा पकडून भाजप हिंदी भाषिकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे.
 
ममता यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यानंतर त्या या परिसरातील अधिकारी कुटुंबाचा सामना करू शकतील काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यात विधानसभेच्या अनुक्रमे 16 आणि 18 जागा आहेत. या भागात अधिकारी कुटुंबाची पकड जबरदस्त आहे.
 
शुभेंदू यांनी टीएमसी सोडल्यानंतर भाजपचा हात पकडला. त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला नाही, या गोष्टीचा ममता यांना आधार आहे. जर असं झालं असतं तर मात्र ममता यांच्यासाठी अवघड स्थिती निर्माण झाली असती. पण, शुभेंदू भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणं ममता यांच्यासाठी सोपं झालं आहे.
 
आता ममता बॅनर्जी यांनी त्या नेत्यांना महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे, ज्यांना शुभेंदू असताना महत्त्व दिलं गेलं नाही. सूफियान आणि अबू ताम्र यांच्या सारख्या नेत्यांना आता संपूर्ण सूट दिली आहे.
 
हे दोन्ही नेते रॅलींचं आयोजन करत आहेत. दुसरीकडे या भागात भाजपचं संघटन नाहीये. भाजप शुभेंदू आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांच्या आधारे मैदान जिंकण्याचं स्वप्न पाहत आहे. पक्षानं या भागात जे पोस्टर्स लावले आहेत, त्यावर मोदींसोबत शुभेंदू यांचा फोटो आहे. दुसरीकडे टीएमसीच्या पोस्टर्समध्ये ममता बॅनर्जी यांचा फोटो आहे.
 
ममता यांच्या घोषणनेनंतर शुभेंदू यांच्या भाजपमध्ये जाण्यानं टीएमसीचे जे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत होते, त्यांचं मनोबलही वाढलं आहे. दुसरीकडे शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचं आव्हान स्वीकारत म्हटलंय की, "नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 50 हजार मतांनी पराभूत न झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन."
 
ममता यांच्या घोषणेवर पश्चिम बंगाल भाजपचे प्रवक्ते शमिक भट्टाचार्य यांनी म्हटलं, "मुख्यमंत्री हताश आहेत हे यातून दिसून येतं. तसंच मुख्यमंत्र्यांना आपल्या पक्षातील नेत्यांवर विश्वास नाही, हेही यातून स्पष्ट होतं."
 
सीपीएसचे ज्येष्ठ नेते सुजन चक्रवर्ती सांगतात, मुख्यमंत्र्यांचं पक्षांवर नियंत्रण राहिलेलं नाही, हे या प्रकारच्या घोषणांमधून स्पष्ट होतं. त्यांची पुढची वाट बिकट आहे.
 
राजकीय जाणकार निर्माल्य बॅनर्जी यांच्या मते, "ममता यांच्या घोषणेमुळे शुभेंदू यांच्या उमेदवारीवर संकट येऊ शकतं. या भागावर त्यांची पकड असली तरी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात लढायचं असल्यानं त्यांच्यासाठी त्यांची स्वत:ची जागा राखणं आव्हानात्मक असणार आहे. बाकी जागांचा तर विचारच करायला नको. ममता यांचा हा मास्टरस्ट्रोक आहे."
 
ते पुढे सांगतात, "आता बदललेलं चित्र डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आपले राजकीय डावपेच नव्यानं आखवे लागतील. सध्या मात्र ही लढत सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे."