शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (17:14 IST)

शेतकरी आंदोलनाच्या 100 व्या दिवशी काय काय घडलं?

देशातील शेतकरी आंदोलनाला आज (6 मार्च) 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या निमित्त नवी दिल्लीला इतर राज्यांशी जोडणाऱ्या महामार्गांवर सकाळपासूनच आंदोलक जमा होण्यास सुरुवात झाली .
 
त्यांनी दिल्लीकडे जाणारे महामार्ग अडवून तीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे.
 
या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचं शेतकऱ्यांनी ठरवलं असून सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीवर आंदोलक अजूनही ठाम आहेत.
 
हे तीनही कृषी कायदे केंद्र सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये लागू केले होते. या कायद्यांच्या विरोधात नोव्हेंबर महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन होत आहे. शेतकरी आंदोलक चारचाकी वाहनं आणि ट्रॅक्टर घेऊन एक्सप्रेस वेवर पोहोचत आहेत.
 
मूळचे पंजाबचे असलेले 68 वर्षीय अमरजीत सिंह यांनी यावेळी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी संवाद साधला. "मोदी सरकारने लोकांचं हे आंदोलन म्हणजे ईगोचा मुद्दा (अहंकाराचा मुद्दा) बनवला आहे. त्यांना शेतकऱ्यांचं दुःख समजत नाही. त्यांनी आमच्यासाठी आंदोलनाशिवाय इतर पर्याय ठेवलेला नाही," असं ते म्हणाले.
 
कुंडली-मानेसर-पलवल महामार्गावर रास्ता रोको
 
शेतकरी कुंडली-मानेसर-पलवल महामार्गावर रास्तारोको करणार असल्याची माहिती किसान एकता मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी दिली.
 
हे आंदोलन सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत होईल. शेतकरी सकाळी अकरा वाजल्यापासून रास्ता रोको करतील. रस्त्यावर उन्हात बसून ते कायद्यांचा विरोध करतील, असं त्यांनी सांगितलं.
 
तर टिकरी बॉर्डरवर दाखल झालेले राकेश टिकैत म्हणाले, "आता आपल्याला उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागेल. मात्र आपण इथून उठायचं नाही.
 
"कृषी कायद्यामुळे लाभ होईल, असं सरकारने म्हटलं आहे. हा लाभ कधी आणि कसा मिळेल, हे सांगणाऱ्या व्यक्तीला आम्हाला भेटायचं आहे. करावी लागेल. आम्हाला हे गणित समजून घ्यायचं आहे. हे आंदोलन बराच काळ चालेल. मागण्या पूर्ण झाल्यानंतर शेतकरी स्वतःहून निघून जातील," असं टिकैत म्हणाले.
 
पलवलमध्येही मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाल्याची माहिती बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांनी दिली.
 
इथं शेतकरी मोठ्या संख्येने मानेसर-पलवल टोलनाक्यावर पोहोचले आहेत. शेतकरी आता रस्त्यावर बसत असून येथील सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
 
गेल्या वर्षी 30 नोव्हेंबरपासून शेतकरी हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.
 
डिसेंबरच्या गोठवणाऱ्या थंडीला तोंड दिल्यानंतर शेतकरी आता उन्हाळ्याच्या दृष्टीने तयारी करत आहेत. सरकार मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असं शेतकरी आंदोलकांनी म्हटलं आहे.
 
26 जानेवारीदरम्यान शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत झालेला हिंसाचार वगळता हे आंदोलन शांततापूर्वक होत आहे. ट्रॅक्टर रॅलीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.
 
त्यावेळी काही लोकांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर शीखांचा धार्मिक झेंडा फडकवला होता. याप्रकरणी पोलिसांनी अनेक पत्रकारांनी चुकीच्या बातम्या दिल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले होते.