शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2020 (18:33 IST)

इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेनचा 'शहीद' उल्लेख केल्यानंतर पाकिस्तानात काय प्रतिक्रिया उमटल्या?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये गुरुवारी (25 जून) ओसामा बिन लादेनचा उल्लेख शहीद म्हणून केला होता. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली.
 
इम्रान खान यांच्या भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील विरोधी पक्ष PML-N चे नेते ख्वाजा आसिफ यांनी संसदेत म्हटलं, "इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेनचा उल्लेख शहीद असा केला. ओसामा आमच्या देशात कट्टरवाद घेऊन आला. तो कट्टरवादी होता आणि तुम्ही त्याला शहीद म्हणता?"
 
ख्वाजा यांनी म्हटलं, "ओसामा एक दहशतवादी होता. त्यानं आपल्या देशाला बरबाद केलं आणि तुम्ही त्याला शहीद म्हणत आहात? ज्यापद्धतीनं मी इम्रान खान यांचं म्हणणं ऐकलं आहे, त्याच पद्धतीनं तुम्ही माझं आणि बिलावल भुट्टोंचं म्हणणं ऐकण्याची क्षमता ठेवायला हवी. आपल्यावरील टीका ऐकण्यासाठी निधडी छाती पाहिजे. पाकिस्तानच्या संसेदत सगळ्यांत कमी वेळ देणारे पंतप्रधान इम्रान खान आहेत. ते फक्त त्यांचं म्हणणं तेवढं मांडतात. इतरांना मात्र बोलू देत नाहीत."
 
पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर वाद सुरू झाल्यानंतर त्यांचे विशेष सचिव डॉ. शाहबाज गिल यांनी ट्वीट करत म्हटलं, "अतिशय अयोग्य पद्धतीनं पंतप्रधानांच्या वक्तव्याला वादग्रस्त ठरवलं जात आहे. पंतप्रधान इम्रान खान हे कट्टरवादाविरोधात आहेत. त्यांनी दोनदा आपल्या भाषणात ओसामा किल्ड (ओसामाला ठार केल्याचा) असा उल्लेख केला आहे."
 
गुरुवारी इम्रान खान यांनी संसदेतल्या भाषणात म्हटलं होतं, "आम्ही दहशतवादाविरोधातल्या युद्धात अमेरिकेला पाठिंबा दिल्यानंतर अपमान अनुभवला आहे. अमेरिका अफगाणिस्तानात अयशस्वी झाल्यानंतर आम्हाला दोष देण्यात आला. अमेरिकेनं एबोटाबादमध्ये येऊन ओसामाचा खात्मा केला, त्याला शहीद केलं. त्यानंतर जगभरात आमची काय स्थिती झाली, प्रत्येक देश आमचा तिरस्कार करायला लागला आहे."
 
इम्रान खान यांचं वक्तव्य हिंसक कट्टरवादाच्या पाठिंब्यासाठी आहे, असं पाकिस्तानातील विरोधी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे.
 
पाकिस्तानमधले खासदार मुस्तफा नवाझ खोखर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रवक्ते आहेत.
 
त्यांनी म्हटलंय, "इम्रान खान यांच्या वक्तव्यामुळे मला दु:ख झालं आहे. कुणाच्या हातांमध्ये हा देश सोपावला आहे, असा प्रश्न मनात येतोय. त्यांच्या वक्तव्यातून असं वाटतं की ते स्वत:च देशाच्या सुरक्षेसाठी धोका बनले आहेत."
 
मुस्तफा यांनी म्हटलं, "आज ते ओसामाला शहीद म्हणत आहेत. पण, जे अल्-कायद्याच्या हल्ल्यात शहीद झालेत, त्यांना आम्ही काय उत्तर द्यावं? आमच्या तरुण पीढीला आम्ही काय सांगावं की ओसामानं जो मार्ग निवडला, तोच निवडा? आमच्या तरुणांसाठी आम्हाला ओसामा आदर्श बनवायचा आहे का? इम्रान खान पूर्वीपासूनच तालिबान खान या नावानं प्रसिद्ध होते. ते तालिबानची कार्यालयं सुरू करण्याच्या गोष्टी करत. आज त्यांनी त्यांची इच्छा जाहीर केली आहे. देश कोणत्या हातात आहे, याविषयी आम्हाला दु:ख वाटत आहे."
 
ओसामा बिन-लादेनला अमेरिकेनं पाकिस्तानमध्ये 2011ला एका मोहिमेदरम्यान ठार केलं होतं.
 
गेल्या वर्षी इम्रान खान अमेरिका दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, "पाकिस्ताननेच अमेरिकेला ओसामाच्या बाबतीत गुप्त माहिती पुरवली होती. त्यानंतर अमेरिकेनं मोहीम यशस्वी केली होती."
 
इम्रान खान यांनी वॉशिंग्टनमधील US इन्स्टिट्यूट ऑफ पीसमध्ये बोलताना म्हटलं होतं की, "2 मे 2011 रोजी मला जितका अपमान झाल्यासारखं वाटलं, तितकं यापूर्वी कधीच वाटलं नाही. कारण, अमेरिकेनं पाकिस्तानला काही न सांगता मोहीम पूर्ण केली. जो देश अमेरिकेचा सहकारी होता, त्यानेच पूर्ण प्रकरणात आमच्यावर विश्वास ठेवला नाही. आता पुन्हा असा अपमान सहन करण्याची इच्छा नाही."
 
इम्रान खान नियमितपणे त्यांच्या मुलाखतीत ओसमा बिन लादेनचा उल्लेख दहशतवादी करणं टाळत राहीले आहेत.
 
2016 मध्ये इम्रान खान यांना पत्रकार वसीम बादामी यांनी प्रश्न विचारला होता की, तुम्ही ओसामा बिन-लादेनला दहशतवादी समजता का, यावर इम्रान यांनी उत्तर दिलं होतं, "जॉर्ज वॉशिंग्टन इंग्रजांसाठी दहशवादी होता आणि अमेरिकेसाठी स्वातंत्र्य सेनानी होता. मी आता ओसामा बिन लादेनवर वक्तव्य करणार नाही, कारण हा मुद्दा मागे पडला आहे."