शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

शिवाजी महाराज राज्यातील प्रत्येक विचारधारेच्या माणसाला जवळचे का वाटतात?

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकात पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं वाद निर्माण झाला आहे.
 
महाराष्ट्रात त्याचे राजकीय पडसाद पहायला मिळताहेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनं मोदी आणि भाजपला टारगेट केलं आहे. कॉंग्रेसनं तर राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे.
 
भाजपनंही टीकेला उत्तर देत बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. या वादात सातारा आणि कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यांनीही मतप्रदर्शन केलं आहे.
 
अर्थात, हा वाद केवळ राजकीय राहिलेला नाही. समाजमाध्यमांमध्येही त्यावरून प्रतिक्रिया येताहेत. दोन्ही बाजूंकडून बोललं जातं आहे. प्रकाशकांविरुद्ध पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल होईपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे.
 
यावरून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हा सर्वाधिक अभिमानाचा विषय तर आहेच, पण सोबतच तो भावनिकदृष्ट्या किती संवेदनशील विषयही आहे हे पुन्हा एकदा दिसते आहे. शिवाजी महाराजांच्या उल्लेखावरून घडलेले वाद महाराष्ट्राला नवे नव्हेत.
 
जेम्स लेन प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम झाला हे सर्वांनी पाहिलं. पण विद्यापीठाच्या नामविस्तारापासून ते नाटकाच्या नावापर्यंत ते राजकीय पक्षांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा वा नाव वापरण्यापर्यंत अनेक गोष्टींवरून भूतकाळात वाद झाले आहेत.
 
पण असे होण्यामागची कारणं काय? महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वांत महत्त्वाची व्यक्तिरेखा असणा-या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्र संवेदनशील का आहे? जेव्हाही शिवाजी महाराजांबद्दल आक्षेप वाटतील असे उल्लेख येतात तेव्हा महाराष्ट्रात आक्रमक प्रतिक्रिया का येते?
 
'ऐतिहासिक वारशाचं सर्वोच्च प्रतीक'
"शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचं सर्वोच्च प्रतीक आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल वा त्यांच्याशी संबंधित प्रतिकांचा अन्वयार्थ चुकीचा लावला गेला की त्याची प्रतिक्रिया येते. वाद निर्माण होतात. त्यामुळेच मोदी यांच्यासारख्या सध्याच्या सर्वांत वादग्रस्त राजकीय व्यक्तीशी शिवाजी महाराजांची तुलना केली गेली तेव्हा त्याची प्रतिक्रिया आली. ही तुलना अनुचित आणि अतिशयोक्त होती," ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर सांगतात.
 
महाराष्ट्राचं आणि मराठी भाषिकांच्या अस्मितेचं प्रतिक म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. स्वराज्याचे संस्थापक म्हणून तर आहेच पण आजही अनेक राजकीय, सामरिक, प्रशासकीय, व्यवस्थापन, सामाजिक धोरणांचे उद्गाते म्हणून वर्तमानात शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं.
 
त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळासोबतच आणि स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक चळवळींचं प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना समोर पाहून घेतली गेली.
परिणामी अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वं वेगवेगळ्या विचारधारांशी जोडले गेलेली असतांना, शिवाजी महाराज मात्र महाराष्ट्रात प्रत्येक विचारधारेसाठी जवळचे राहिले आहेत. त्यामुळे आजच्या महाराष्ट्राच्या समाजकारणावर, निवडणुकींच्या राजकारणावर शिवाजी महाराजांच्या प्रभाव सर्वाधिक आहे. परिणामी त्यांच्याशी संबंधित न पटलेल्या उल्लेखांमुळे महाराष्ट्रात भावनिक आंदोलनं सुरू झाल्याचा इतिहास आहे.
 
"महाराष्ट्रात मुलांना जन्मापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या जातात. दिवाळीत ते किल्ले बांधतात. शालेय अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास असतो. त्यामुळे लहापणापासूनच जे संस्कार होतात त्यामुळे महाराजांशी संबंधित कोणताही विषय हा मोठं झाल्यावरही संवेदनशील किंवा भावनेचा बनतोच," 'संभाजी ब्रिगेड'चे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड म्हणतात.
 
'नैतिकता, मूल्य आणि न्यायाचं प्रतीक'
पुढे गायकवाड सांगतात, "शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात नैतिकता, मूल्यं आणि न्यायाचं प्रमाण मानलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही न पटणारं लिहिलं वा बोललं की लोकांना ते सहन होत नाही. त्यांचा अवमान झालेला सहन होत नाही. शिवाजी महाराजांच्या वर कोणीही नाही अशी ती भावना आहे. त्याचवेळेस स्त्रियांचा सन्मान, शेतक-यांना मदत अशा विषयांमध्येही महाराजांनी मापदंड घालून दिलेले असल्याने त्यांच्याविषयी भावना तीव्र आहे.
"यामुळे कोणालाही महाराजांविषयी लिखाण करतांना, चित्रपट करतांना वा नाटक करतांना विचार करावा लागतो. त्याचवेळेस शिवाजी महाराजांचं चरित्र महाराष्ट्रात अनेक विचारधारांच्या अंगांनी लिहिलं गेलं आहे. कोणी समतावादी शिवाजी महाराज लिहिले आहेत, तर कोणी हिंदुत्ववादी. एक असं सर्वमान्य चरित्र नाही. त्यामुळे सगळ्यांच्याच भावना तीव्र आहेत. या भावनांमुळेच कोणत्याही वादावेळेस अशा प्रतिक्रिया पहायला मिळतात," प्रविण गायकवाड म्हणतात.
 
'शिवाजी महाराज हे रयतेचे राजे'
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हिंदुत्ववादी नेते हे वारंवार करत असतात. पण त्यांच्या प्रखर हिंदुत्वाचा विरोध करणारे गोविंद पानसरे यांनी शिवाजी महाराज यांच्यावर 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहिलं होतं.
डाव्या चळवळीशी निगडित असलेल्या या पुस्तकाची राज्यात तर चर्चाच झाली पण या पुस्तकाची दखल भारतातील इंग्रजी माध्यमांनी घेतली आणि हे पुस्तक इंग्रजीतही आलं आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे म्हणजेच कष्टकरी वर्गाचं प्रेम मिळालेले राजे होते अशी मांडणी गोविंद पानसरे यांनी केली आहे.
 
महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना कुलवाडी भूषण असंही म्हटलं होतं.
 
'महाराष्ट्राचा डीएनए'
"शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा डीएनए आहे. या राज्याची जी काही अस्मिता, स्वाभिमान आणि अस्तित्व जे काही आहे ते शिवाजी महाराजांपासून सुरू होतं आणि त्यांच्यामुळेच टिकतं. त्यामुळं त्यांची तुलना कोणाशीही केलं गेली की तो इथे अपमान समजला जातो आणि प्रतिक्रिया येते," ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात. "जरी या प्रतिक्रिया बघता ते राजकारण असलं तरीही ते केवळ राजकीय नसतं. शिवाजी महाराजांच्या बद्दल जी भावना आहे त्यामुळे प्रतिसाद सतत मिळत राहतो हेही इथल्या राजकीय पक्षांनी पाहिलं आहे.
 
शिवसेनेनं कायम शिवाजी महाराजांचं नाव पुढे केलं आहे. 2004 मध्ये जेव्हा भांडारकर संस्थेचं प्रकरण झालं तेव्हा घेतलेल्या भूमिकेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला फायदा झाला होता. अशा प्रकारेही महाराजांच्या बद्दल असलेल्या भावनेचे राजकीय परिणाम दिसतात. परंतु गेल्या काही काळात बहुजन समाजातील तरुणांनी अनेक प्रकारे शिवाजी महाराज समजून घेतले आहेत," चोरमारे म्हणतात.