शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (08:57 IST)

Jr NTR: साउथ सुपरस्टार एनटीआरचं लग्न जेव्हा मुलगी अल्पवयीन असल्यामुळे वादात अडकलं होतं

नंदमुरी तारक रामाराव... असं नाव सांगितल्यावर हे कोण बुवा असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल. पण या लांबलचक नावाचा शॉर्टफॉर्म करून फक्त NTR एवढी तीन अक्षरं सांगितलं तर वेगळी ओळख करून द्यायची गरज पडणार नाही.
 
दिग्दर्शक राजामौली यांच्या काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेल्या RRR या चित्रपटातल्या एनटीआरच्या भूमिकेचं प्रेक्षक, समीक्षकांनी कौतुक केलं.
 
'माझ्या करिअरचा विचार केला तर RRR आधी आणि RRR नंतर अशी विभागणी करता येईल.'
 
अभिनेता एनटीआर ज्युनिअर एका मुलाखतीत सांगत होता. एनटीआरनं हे विधान अभिनेता म्हणून या चित्रपटानं आपल्याला काय दिलं या प्रश्नाचं उत्तर देताना केलं होतं.
 
पण एका वेगळ्या अर्थानंही एनटीआरचं हे विधान खरं आहे...
 
प्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम यानं RRR च्या प्रमोशनल इंटरव्ह्यूच्या वेळी एनटीआरला गंमतीत म्हटलं, तुमच्या फेमस 'शक्ती' चित्रपटातला एक डायलॉग आठवला.
 
त्यावर एनटीआरनं म्हटलं, "शक्ती? तोच सिनेमा आठवला? तो काय आठवायचा सिनेमा आहे?"
 
एनटीआरनं ही गोष्ट गंमतीत म्हटली असली, तरी गोष्ट खरी होती. सुरूवातीच्या काळातले एनटीआरचे काही चित्रपट असे आहेत की, जे त्याला स्वतःलाही आठवावेस वाटणार नाहीत.
 
आता दिसणारी त्याची मस्क्युलर बॉडी तेव्हा नव्हती… गुबगुबीत शरीरयष्टीचा, भडक कपडे आणि तसेच देमार डायलॉग मारणारा त्याचा 'हिरो' कुठे आणि 'जनता गराज'सारख्या चित्रपटात मोहनलालसारख्या कलाकारासमोर उभा राहिलेला 'अभिनेता' कुठे….
 
RRRनंतर 'यंग टायगर' म्हणून ओळखला जाणारा हा तेलुगू सुपरस्टार देशभरात पोहोचला. साउथ इंडियन सिनेमाच्या फॅन्सना एनटीआर हे नाव नवीन नव्हतं... पण RRRनंतर आता एनटीआरच्या क्रेझनं दाक्षिणात्य सिनेमाच्या सीमारेषा ओलांडल्या.

अर्थात, RRR मध्ये दिसलेला पिळदार शरीरयष्टीचा, बोलक्या डोळ्यांचा हा अभिनेता सुरूवातीच्या काळात असा अजिबातच नव्हता. तद्दन गल्लाभरू सिनेमे करणाऱ्या एनटीआरचं केवळ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं नाहीये, अभिनेता म्हणूनही त्यानं स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणले आहेत.
 
जवळपास वीस वर्षांची त्याची कारकीर्द आहे. आंध्र प्रदेशातल्या एका मातब्बर फिल्मी आणि राजकीय कुटुंबातून आलेल्या एनटीआरसाठी चित्रपटात येणं हे कदाचित सोपं होतं. पण पुढचा सगळा प्रवास सरळ नक्कीच नव्हता.
 
कुटुंबातून मिळालेला वारसा
एनटीआरच्या नावापासूनच त्याला मिळालेला अभिनयाचा वारसा सुरू होतो. आजोबांचंच नाव नातवाला ठेवण्यात आलं.
 
नंदमुरी तारक रामाराव उर्फ एनटीआर हे प्रसिद्ध तेलुगू अभिनेते होते. अभिनय, चित्रपट निर्मितीतून नंतर ते राजकारणात आले. त्यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली आणि त्याच्या सात वर्षांच्या कालावधीत ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही झाले. ते तीन वेळा अखंड आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
 
याच एनटीआर यांचा नातू म्हणजे एनटीआर ज्युनिअर.
त्याचे वडील नंदमुरी हरिकृष्ण हेदेखील अभिनेते, निर्माते आणि राजकारणी. ते राज्यसभेचे खासदारसुद्धा होते.
 
एनटीआरचे काका नंदमुरी बालकृष्ण हेसुद्धा तेलुगू फिल्म इंडस्ट्री आणि राजकारणातलं मोठं नाव.
 
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हेसुद्धा एनटीआरचे आतोबा किंवा फुयाजी.
 
घराण्याचा फिल्मी वारसा चालवणारा एनटीआरच्या राजकारणाबद्दलही अनेकदा चर्चा होतात. तेलुगू देसम पक्षाच्या पडत्या काळात एनटीआरनं पक्षाची सूत्रं हाती घ्यावीत, अशीही मागणी त्याच्या फॅन्सकडून होत होती.
 
अगदी RRRच्या प्रमोशनाच्यावेळीही त्याला याबद्दल विचारलं गेलं. त्यावेळी त्यानं म्हटलं होतं, "माझं याबद्दलचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. या गोष्टी बोलण्यासाठीची ही वेळ नाही आणि जागाही नाही. आता कॉफी घेऊया आणि याबद्दल नंतर कधीतरी बोलूया."
 
हिट-फ्लॉप आणि करिअरमधलं साचलेपण
कुटुंबाचा राजकीय वारसा सांभाळण्यासाठी एनटीआर थेट राजकीय मैदानात अजूनपर्यंत उतरला नसला, तरी घराण्याचा फिल्मी वारसा लहानपणापासून पुढं नेतोय.
 
एनटीआरच्या चित्रपट कारकिर्दीची सुरूवात वयाच्या सातव्या वर्षी बाल कलाकार म्हणून झाली. त्याचे आजोबा एन. टी. रामाराव यांनीच लिहिलेल्या चित्रपटात त्यानं भरताची भूमिका केली होती. त्यानंतर 1997 साली रामायण सिनेमात त्यानं रामाची भूमिका केली.
 
2001 साली दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या पहिल्यावहिल्या स्टुडंट नंबर 1 या सिनेमात एनटीआरनं लीड रोल केला. त्याच्या भूमिकेचं कौतुकही झालं.
 
2003 मध्ये एनटीआरचा सिंहाद्री प्रदर्शित झाला. हा राजामौलींसोबतचा त्याचा दुसरा चित्रपट होता. हा त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा तेलुगू सिनेमा होता.
याच काळात त्याचे आदी, आल्लारी रामुडू, नागा, सांबा, ना अल्लुडू, नरसिंहडू हे चित्रपट प्रदर्शित झाले. यातले काही चालले तर ना अल्लुडू, नरसिंहडू, अशोक हे चित्रपट तर सपशेल फ्लॉप ठरले.
 
या सिनेमातला गोलमटोल एनटीआर आणि आताचा एनटीआर यांमध्ये खूप तफावत दिसते. कारण त्यावेळी त्याचं वजनही जवळपास 90 किलोच्या आसपास होतं.
 
2007 साली राजामौलींसोबतचाच त्याचा 'यमदोंगा' नावाचा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटासाठी पहिल्यांदा त्यानं जवळपास 20 किलो वजन कमी केलं.
 
एनटीआरचे एकापाठोपाठ एक सलग चित्रपट सुरूच होते. पण यशात सातत्य नव्हतं. 2010 नंतरची तीन-चार वर्षं करिअरमध्ये एकप्रकारचं साचलेपण आलं होतं.
 
त्या सगळ्या काळाबद्दल एनटीआरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं, "माझ्या करिअरमध्ये एक वेळ अशी आली की, माझ्यासोबत काय होतंय हेच कळत नव्हतं. सगळं काही 'नॉर्मल' होतं, कोणतीही 'एक्साइटमेंट' नव्हती. एक अभिनेता म्हणून मला जे करायचं आहे, माझी आवड आहे आणि मी जे करतोय ते पूर्णपणे वेगळं आहे. याचमुळे माझे सिनेमे चालत नाहीयेत का, असंही मी दिग्दर्शक राजामौलींना विचारलं."
 
'या' गोष्टीमुळे बदलला कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन
एनटीआरच्या करिअरमधला हा बॅडपॅच वैयक्तिक आयुष्यातल्या एका 'गोड' बातमीनं संपला.
 
"माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला आणि माझा अभिनयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्याचा तो निरागसपणा पाहायला लागल्यानंतर मी विचार करू लागलो की, मी माझ्या कामाबद्दल एवढा निरागस आहे का? आपली प्रत्येक गोष्ट एवढी कॅलक्युलेटेड का आहे? आपल्या कामातली मजा कुठे गेलीये?"
 
यावेळी एनटीआरच्या टेम्पर चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं.
 
"त्या दरम्यान टेम्परचं काम सुरू होतं. माझ्या बदलेल्या दृष्टिकोनातून जेव्हा मी काम करायला लागलो, तेव्हा टेम्परचा प्रत्येक शॉट माझ्यासाठी आव्हान ठरला आणि मी तो तितकाच एन्जॉयही केला," एनटीआरनं सांगितलं होतं.
 
याच काळात हिट आणि फ्लॉपकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलला असल्याचं तो सांगतो.
 
"मी अगदी लहानपणापासून काम करतोय. माझ्या करिअरलाही आता 20 वर्षं झालीयेत. तेव्हा माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट मोठी असायची, मग ते यश असो की अपयश. पण आता माझ्यासाठी ते फार महत्त्वाचं राहिलं नाहीये. यश-अपयश माझ्यासाठी तासाभराची गोष्ट आहे. तेवढ्यापुरताच माझ्यावर परिणाम होतो. त्यानंतर मी पुढे जातो," एनटीआरनं सांगितलं.
 
2015 साली प्रदर्शित झालेला 'टेम्पर' हिट झाला. त्यानंतरचे नानक्कू प्रेमथो, जनता गराज, जय लव-कुशासारखे चित्रपट हिट ठरले.
 
दिग्दर्शक राजामौलींनीही एनटीआरच्या करिअरमधल्या बदलांबद्दलचं त्यांचं निरीक्षण नोंदवलं होतं.
 
'एकवेळ होती जेव्हा तो समोर येईल ते चित्रपट करतोय असं वाटायचं. पण हळूहळू त्याच्या निवडींमध्ये बदल होताना दिसायला लागला.'
 
लग्नावरून झालेला वाद
आपल्या मुलाच्या जन्मानंतर कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असं सांगणारा एनटीआरची प्रतिमा 'फॅमिली मॅन' अशी आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल तो फारसं बोलत नाही.
 
पण त्याच्या खासगी आयुष्यातल्या गोष्टीमुळेच त्याला एकदा वादाला सामोरं जावं लागलं होतं. अल्पवयीन मुलीशी लग्न करत असल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार केली होती.
 
5 मे 2011 ला एनटीआरचं लग्न लक्ष्मी प्रणाथी सोबत झालं.
 
प्रणाथी ही उद्योगपती नारने श्रीनिवास राव यांची मुलगी. तिची आई ही आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची भाची.
 
एनटीआर आणि प्रणाथीच्या साखरपुड्यानंतर अॅडव्होकेट सिंगुलुरी सांती प्रसाद यांनी एनटीआरविरोधात कृष्णा डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस ऑथोरिटिजकडे तक्रार केली होती. मुलगी बारावीत असून 17 वर्षांचीच आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.
 
मुलगी 18 वर्षांची नसल्यामुळे हे लग्न म्हणजे बालविवाह कायद्याचं उल्लंघन आहे, असं म्हणत प्रसाद यांनी तक्रार केली होती.
 
एनटीआर, चंद्राबाबू नायडू, श्रीनिवास राव यांना या प्रकरणी नोटीसही बजावण्यात आली होती.
 
मात्र प्रणाथी लग्नापर्यंत 18 वर्षांची होत असल्याचं सांगत तिच्या कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिलं आणि या वादावर पडदा पडला.
 
दुसऱ्या एका कारणावरूनही हे लग्न गाजलं होतं. हे लग्न दक्षिण भारतातल्या सर्वांत महागड्या लग्नांपैकी एक होतं.
 
आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्याचा नातू, फिल्म स्टार एनटीआर आणि प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास राव यांची मुलगी प्रणाथी यांचं लग्न हे साधं नसणारच होतं.
 
पण या लग्नावर झालेला खर्च डोळे विस्फारायला लावणारा होता. या लग्नावर जवळपास 100 कोटींहून अधिक खर्च झाल्याची तेव्हा चर्चा होती. या लग्नाला हजारो पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती.
 
मीरा चोप्राच्या 'त्या' प्रकरणावर गप्प का?
एनटीआर अजून एक प्रकरणी वादात अडकला होता.
 
बॉलिवूड अभिनेत्री मीरा चोप्रानं एनटीआरच्या एका फॅनविरोधात हैदराबाद सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
 
मीरानं ट्वीटर 'Ask Meera' सेशन घेतलं होतं. यामध्ये तिला एका युझरनं एनटीआरबद्दल विचारलं.
 
मीरानं 'मला एनटीआरबद्दल माहीत नाही, मी त्याची फॅन नाही,' असं म्हटलं होतं.
 
यानंतर एनटीआरच्या फॅन पेजशी संबंधित काही नेटिझन्सनी मीराला बलात्कार, अॅसिड हल्ला, जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या.
 
मीरानं तेव्हा एनटीआरला टॅग करून ट्वीट केलं होतं.
 
"मी महेश बाबूची फॅन आहे याचा अर्थ तुमच्या फॅन्सनी मला अश्लाघ्य भाषेत धमकी द्यावी असा होत नाही. अशा फॅन्सच्या जोरावर तुम्ही स्वतःला यशस्वी अभिनेता समजता? तुम्ही माझ्या ट्वीटकडे दुर्लक्ष करणार नाही असं मला वाटतंय," असं मीरानं म्हटलं होतं.
 
पण एनटीआरकडून मीराच्या या ट्वीटला कोणतंही उत्तर देण्यात आलं नव्हतं.
 
चंद्राबाबू नायडूंच्या समर्थनार्थ व्हीडिओ
नोव्हेंबर 2021 मध्ये चंद्राबाबू नायडू यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये महिला सबलीकरणाच्या विषयावर चर्चा सुरू होती. त्यावेळी सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी चंद्राबाबूंच्या पत्नीविरोधात अपशब्दांचा वापर केल्याचं चंद्राबाबूंनी सांगितलं.
 
पत्नीबाबतच्या वक्तव्यांनी व्यथित झाल्याचं सांगताना चंद्राबाबू नायडू यांना पत्रकार परिषदेतच रडू कोसळलं.
 
या घटनेनंतर एनटीआरनं एक व्हीडिओ ट्वीट केला होता. राजकारण हे सार्वजनिक विषयांपुरतं मर्यादित राहायला हवं, त्यात वैयक्तिक गोष्टी आणल्या नाही पाहिजेत.
 
त्यानं म्हटलं होतं, "आपण जे बोलतो त्यातून आपलं व्यक्तिमत्त्व समोर येतं. राजकारणात टीका आणि आरोप-प्रत्यारोप नवीन नाहीत, पण ते केवळ सार्वजनिक विषयांपुरतेच मर्यादित राहायला हवेत.
 
विधानसभेतील प्रकारानं मला व्यक्त व्हायला भाग पाडलं आहे. जेव्हा सार्वजनिक विषयांना बगल देऊन वैयक्तिक टीका करायला लागतो, महिलांना त्या वादात ओढतो तेव्हा आपण अनागोंदीच्या दिशेने जातो. महिलांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे. ती आपण आपल्या भावी पिढ्यांनाही शिकवायला हवी."
 
सार्वजनिक आयुष्यात मर्यादा पाळायला हवी, असं सांगणारा एनटीआर स्वतःही कटाक्षाने ती पाळण्याचा प्रयत्न करताना दिसतो, शूटिंगच्या धकाधकीतून आपल्या कुटुंबासाठी वेळ देतो.
 
आपल्या पाठीशी कायम ठामपणे उभ्या असलेल्या बायकोसाठी वेळ मिळेल तेव्हा स्वयंपाक करणं हा आपला स्ट्रेस बस्टर आहे, असं त्याला वाटतं. काम संपलं की माझा 'वर्किंग मोड' आपोआप ऑफ होतो आणि मी घराकडे, मुलांकडे वळतो, हे पण तो आवर्जून सांगतो.
 
पडद्यावर कायम सगळ्या चांगुलपणाचा अर्क असलेला हिरो प्रत्यक्षातही तसाच असावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते. त्यांच्या मनातल्या त्या प्रतिमेला एनटीआरचं सार्वजनिक परिघातलं वर्तन जराही छेद देत नाही. कदाचित त्यामुळेच ' हिरो वर्शिप' करणारे दाक्षिणात्य फॅन्स एनटीआरवर एवढं मनापासून प्रेम करतात.