शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मे 2022 (08:45 IST)

महेश बाबू म्हणतो- हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मी परवडणार नाही

Mahesh Babu
केजीएफ, आरआरआर, पुष्पा यांसारख्या चित्रपटांमुळे एकीकडे बॉलिवूडला साउथ इंडियन सिनेमामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या एका विधानानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
 
'हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मी परवडणार नाही, त्यामुळे मी हिंदी चित्रपट करून वेळ वाया घालवू इच्छित नाही,' असं महेश बाबूनं माध्यमांशी बोलताना म्हटलं.
 
आदिवी शेष याच्या 'मेजर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी माध्यमांशी बोलताना महेश बाबूला बॉलिवूड डेब्यूबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्यानं बॉलिवूडमध्ये काम करण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगताना आपलं परखड मतच व्यक्त केलं.
 
महेश बाबूचा 'सरकारी वारी पाटा' हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होत आहे.
 
"मला हिंदीमधून अनेक ऑफर येतात, पण त्यांना मी परवडेन असं मला वाटत नाही. ज्या इंडस्ट्रीला मी परवडत नाही, तिथे काम करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाहीये," असं महेश बाबूनं म्हटलं.
 
त्यानं पुढं म्हटलं, "जे स्टारडम आणि आदर मला इथे मिळतो, तो प्रचंड आहे. त्यामुळे मी ही इंडस्ट्री सोडून इतर कोणत्याही इंडस्ट्रीत जाण्याचा विचार करणार नाही."
 
सध्या देशभरात साउथ इंडियन सिनेमाची क्रेझ वाढतीये. त्याबद्दल महेश बाबूनं म्हटलं, "मला नेहमीच तेलुगू चित्रपट करायचे होते आणि देशभरातील लोकांनी त्या पाहाव्यात असं मला वाटतं. आता ते होत आहे याचा मला आनंद आहे."
 
तेलुगू सिनेमा ही माझी ताकद आहे आणि मी तेलुगू सिनेमातील ज्या भावना आहेत त्या समजून घेऊ शकतो असंही त्यानं म्हटलं.
 
हिंदी फिल्म इंडस्ट्री मला 'अफोर्ड' करू शकत नाही, असं जेव्हा महेश बाबू म्हणतो तेव्हा त्याचा सरळ अर्थ हाच निघतो की, बॉलिवूडकडे महेश बाबूला कास्ट करता येईल एवढा पैसा नाहीये. म्हणजेच महेश बाबू इतका महागडा आहे.
 
महेश बाबू हिंदी पट्ट्यातल्या प्रेक्षकांसाठी काही नवं नाव नाहीये. कोल्ड ड्रिंक आणि एका वादग्रस्त तंबाखू उत्पादनाच्या जाहिरातीच्या माध्यातून महेश बाबूचा चेहरा अनेकांनी पाहिला असेल. पण त्याआधीही हिंदीमध्ये डब झालेल्या त्याच्या चित्रपटांमुळेही तो दक्षिण भारताच्या बाहेरही पोहोचला होता.
 
वादात न अडकणारा 'फॅमिली मॅन'
प्रिन्स ऑफ टॉलिवूड या नावानं प्रसिद्ध असलेल्या महेश बाबूला कोणत्याही वादात न अडकणारा 'फॅमिली मॅन' म्हणूनही ओळखलं जातं.
 
47 वर्षांच्या महेश बाबूची अभिनयातली कारकिर्द वयाच्या चौथ्या वर्षीच सुरूच झाली होती. महेश बाबू तेलुगू इंडस्ट्रीतले प्रसिद्ध अभिनेते कृष्णा यांचा धाकटा मुलगा. बाल कलाकार म्हणून त्यानं पहिल्यांदा नीडा या चित्रपटात काम केलं. त्यानंतर आठ चित्रपटांत त्यानं बाल कलाकार म्हणून काम केलं. लीड अक्टर म्हणून त्यानं 'राजाकुमारुडू' या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला अवॉर्डही मिळालं होतं.
 
2003 मध्ये रिलीज झालेल्या 'ओक्काडू'मध्ये त्यानं कबड्डीपटूची भूमिका केली होती. हा चित्रपट तेलुगूमधील सर्वाधिक हिट सिनेमांपैकी एक समजला जातो.
 
त्यानंतर दोन वर्षांपैकी प्रदर्शित झालेल्या 'अथाडु'नेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 'मुरारी', 'पोकिरी', 'ननेक्कोडाइन', 'सरिमंथुडू', 'व्यापारी', 'सीथम्मा वकितलो सरिमल्ले चेट्टू' सारख्या हिट सिनेमांनंतर महेश बाबूच्या सुपरस्टार पदावर शिक्कामोर्तबच झालं.
 
2005 साली महेश बाबूने अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं. त्यांना गौतम आणि सितारा अशी दोन मुलं आहेत.
 
सोशल मीडियावर आपले कुटुंबासोबतचे फोटो शेअर करणाऱ्या महेश बाबूची आलिशान लाइफस्टाइल सगळ्यांनाच माहीत आहे.
 
महेश बाबूची नेटवर्थ इमेज
2012 साली फोर्ब्जच्या सेलिब्रिटी 100 च्या यादीत महेश बाबूचंही नाव होतं. त्याचं हैदराबादमधलं घर हे तिथल्या महागड्या प्रॉपर्टींपैकी एक आहे. ज्युबिली हिल्स भागात त्याचे दोन आलिशन बंगले आहेत. बंगळुरूमध्येही त्याच्या काही प्रॉपर्टी आहेत.
 
एका डॉटकॉम कंपनीनं दिलेल्या वृत्तानुसार महेश बाबूची नेटवर्थ जवळपास 135 कोटी रुपये आहे. तो एका सिनेमासाठी 55 कोटींहून अधिक मानधन घेतो, त्याशिवाय सिनेमाच्या प्रॉफिटमध्येही त्याचा शेअर असतो.
 
ब्रँड एन्डोर्समेंटसाठीही तो 15 कोटींहून अधिक कमाई करतो.
 
त्याची स्वतःची 7 कोटी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन आहे.
 
गेल्या 20 वर्षांत 40 हून अधिक चित्रपट करणाऱ्या महेश बाबूचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊसही आहे.