औरंगाबादमध्ये दुकान उघडण्यासाठी व्यापाऱ्यांना कोरोनामुक्त प्रमाणपत्र अनिवार्य
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात १८४ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये चिकन, मटण आणि किराणा मालाची दुकाने चालवणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता औरंगाबाद महानगरपालिकेने दुकान उघडण्यासाठी व्यापाऱ्यांना कोरोनामुक्त असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकेने शनिवारी झालेल्या पत्रकारपरिषदेतच लॉकडाऊन आणखी वाढवला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, जिल्ह्याता अँटीजेन टेस्ट वाढवणार असल्याचे औरंगाबादचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले होते. भाजी, फळं, दूध, सलून, चिकन, मटण या व्यापाऱ्यांची टेस्ट होईल पुढील दोन दिवसात होईल, असेही आयुक्तांनी सांगितले होते.
सध्या शहरात १५ ठिकाणी व्यापारी संघाने निश्चित केलेल्या ठिकाणी कोरोनाच्या टेस्ट सुरु आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादमधील कोरोना पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.