Last Modified बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (08:20 IST)
पुणे महापालिकेने शहरातील चार ठिकाणची कोव्हिड केअर सेंटर आणि नऊ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतर्फे शहरात अकरा ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर व १६ विलगीकरण कक्ष चालविले जात आहेत. याशिवाय २० ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर प्रस्तावित आहेत. शिवाजीनगर आणि बाणेर येथे जम्बो कोव्हिड रुग्णालयेही उभारण्यात आली आहेत.
काही दिवसांपासून शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोव्हिड केअर सेंटर, विलगीकरण कक्षांवर होणारा देखभाल दुरुस्तीचा खर्च, मनुष्यबळाचे व्यवस्थापन याचा विचार करता चार कोव्हिड केअर सेंटर व नऊ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरात आता सात ठिकाणची कोव्हिड केअर सेंटर सुरू राहणार आहेत.