बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (15:26 IST)

कोरोना : लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारण्याची तयारी राज्यात कशी सुरु आहे?

मयांक भागवत
कोरोनो संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोव्हिड-19 ची लागण होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
 
हा संभाव्य धोका लक्षात घेता मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसारख्या महानगरात लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारण्याचं काम सुरू झालंय. या सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर आणि अतिदक्षता विभाग (NICU) असणार आहेत.
 
कोरोनाग्रस्त लहान मुलांवर उपचार कसे करायचे, याबाबत मार्गदर्शनासाठी सरकारने नऊ बालरोगतज्ज्ञांची टास्कफोर्स तयार केलीय.
आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात, "लहान मुलांचे बेड्स, वॉर्ड, व्हेन्टिलेटर आणि औषध वेगळी असतात. त्यामुळे टास्सफोर्सच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल."
टास्कफोर्सने सरकारला केलेल्या सूचना
कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलंय.
 
1 मार्च ते 19 एप्रिल दरम्यान राज्यात 0 ते 20 वयोगटातील दीड लाखांपेक्षा जास्त मुलांना कोरोनासंसर्ग झालाय.
 
बालरोगतज्ज्ञांच्या टास्कफोर्सने उपाययोजनांच्या गरजेबाबत सरकारला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात बालरोगतज्ज्ञ, औषध, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज हे प्रमुख मुद्दे आहेत.
मुंबईतील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास प्रभू या टास्कफोर्सचे प्रमुख आहेत.
 
ते सांगतात, "90 टक्के मुलांना लक्षणं दिसून येत नाहीत किंवा अत्यंत सौम्य आजार होतो. एक-दोन दिवसात ही मुलं घरच्या-घरी बरी होतात."
 
कोव्हिडग्रस्त लहान मुलांची काळजी घेण्याचे तीन प्रमुख टप्पे डॉ. प्रभू अधोरेखित करतात.
 
1. फिव्हर क्लिनिक
जिल्हा आणि तालुका स्तरावर फिव्हर क्लिनिक (Fever Clinic) तयार करावे लागतील. याठिकाणी 90 टक्के लहान मुलांवर उपचार शक्य होतील. ज्यांना अत्यंत सौम्य आजार आहे.
 
2. रुग्णालयात उपचारांची गरज
उरलेल्या 10 टक्के मुलांना रुग्णालयात ऑक्सिजन, सलाईनची गरज लागेल. यासाठी कोव्हिड केअर सेंटर तयार करावे लागतील.
 
3. ICU ची गरज
गंभीर स्वरूपाचा आजार असलेल्यांसाठी ICU लागतील. हे नवीन तयार करणं कठिण आहे. त्यामुळे उपलब्ध सुविधांमध्ये अतिदक्षता कक्ष तयार करावे लागतील.
डॉ. प्रभू पुढे म्हणतात, "शहरात घरीच उपचार घेणाऱ्या मुलांचं मॉनिटरिंग शक्य आहे. पण, ग्रामीण भागात हे शक्य होणार का? त्यांच्याकडे स्मार्टफोन, पल्स ऑक्सिमीटर असणार का? हा देखील एक प्रमुख मुद्दा आहे."
 
तज्ज्ञांच्या मते, कोव्हिड सेंटरमध्ये मुलं एकटी राहणार नाहीत. त्याच्यासोबत कोणीतरी रहावं लागेल. मग, त्यांचं संरक्षणं कसं करायचं. याबाबत विचार करावा लागेल.
 
मुंबईची तयारी कशी आहे?
मुंबईत आत्तापर्यंत 40 हजारपेक्षा जास्त लहान मुलांना कोरोनाची लागणी झालीये.
 
0 ते 9 वयोगटातील 11, 423 मुलांना संसर्ग झाला ज्यातील 17 मुलांचा मृत्यू झाला आहे.
 
10 -19 वयोगटातील 29,463 मुलांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 34 मुलं मृत्यूमुखी पडली आहेत.
 
मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे सांगतात, "शहरात लहान मुलांचे कोव्हिड केअर वॉर्ड तयार करण्यात येतील."
 
पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लहान मुलांसाठी 500 बेड्स तयार केले जातील. जंबो कोव्हिड सेंटर्समध्ये वेगळा वॉर्ड असेल. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात मॅटर्निटी होममध्ये कोव्हिड सेंटर बनवण्याबाबत विचार सुरू आहे.
 
पुण्यातील लहान मुलांचं कोव्हिड युनिट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तालुका स्तरावर लहान मुलांचा कोव्हिड वॉर्ड तयार करण्याची सूचना केली आहे. तर, पुणे महापालिकेने राजीव गांधी रुग्णालयात लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
महापौर मुरलीधर मोहोळ सांगतात, "लहान मुलांच्या कोव्हिड सेंटरमध्ये 100 ऑक्सिजन बेड्स, 30 कोव्हिडग्रस्त महिलांची प्रसूती करण्यासाठी बेड्स, 12 लहान मुलांचे अतिदक्षता कक्ष, 20 ICU आणि 10 ICU-व्हेन्टिलेटर्स असतील."
 
पालिका अधिकारी म्हणतात, येत्या महिनाभरात याचं काम पूर्ण केलं जाईल.
 
पंढरपुरात डॉक्टरने सुरू केलं कोव्हिड सेंटर
पंढरपुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. शितल शहा यांनी लहान मुलांचा 15 बेड्सचा कोव्हिड वॉर्ड सुरू केलाय.
 
डॉ. शहा म्हणतात, "गेल्यावर्षी पॉझिटिव्ह लहान मुलं आढळून आली नाही. आता मात्र, 10 मुलांमागे 4 मुलांना कोरोनासंसर्ग होतोय. त्यामुळे 1 ते 12 वर्षं वयोगटातील मुलांसाठी कोव्हिड वॉर्ड सुरू केला."
 
सद्यस्थितीत डॉ. शहा यांच्याकडे 9 कोरोनाबाधित मुलं उपचार घेत आहेत. यातील सहा बेड्स ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत.
 
"कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत आत्तापर्यंत 25 लहान मुलांवर उपचार केले आहेत. या मुलांना न्यूमोनियाचा त्रास आहे. सौम्य आजार असलेल्या मुलांवर घरीच उपचार करतो," असं डॉ. शहा म्हणतात.
 
कशी सुरू आहे औरंगाबादची तयारी?
कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढेल हे लक्षात घेता. औरंगाबाद महापालिकेने शहरातील सर्व बालरोगतज्ज्ञांची बैठक घेतली.
आयुक्त आस्तिक कुमार पांडे म्हणाले, "सद्यस्थितीत उपलब्ध 100 बेड्सचं रुपांतर लहान मुलांच्या कोव्हिड सेंटरमध्ये करण्याचं नियोजन आहे. लहान मुलांना लागणारी औषध, उपकरणं खरेदी करण्यात येणार आहेत."
 
शहरात लहान मुलांवर उपचारासाठी सद्यस्थितीत उपलब्ध असणारं मनुष्यबळ आणि सोयी-सुविधा यांची माहिती गोळा केली जात आहे.
 
नागपूरमध्ये 200 बेड्सचं कोव्हिड सेंटर
 
लहान मुलांमध्ये पसरणाऱ्या कोव्हिड संसर्गाला आळा घालण्यासाठी नागपूरमध्ये बालरोगतज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करण्यात आलीय.
 
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार सांगतात, "भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूरमध्ये 200 बेड्सचं कोव्हिड सेंटर उभारार आहे. यात लहान मुलांसाठी ICU आणि NICU ची सुविधा असणार आहे."
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शून्य ते 18 वयोगटातील मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण 6 ते 8 टक्के असल्याचं आढळून आलंय.
 
"लहान मुलांसाठी व्हेन्टिलेटर आणि ऑक्सिजनची सुविधा नव्याने निर्माण करावी लागेल. वैद्यकीय उपकरणांची खरेदी, औषधं, प्रशिक्षण याबाबत टास्टफोर्स अहवाल सादर करेल," असं डॉ. कुमार पुढे सांगतात.
 
नागपूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर या टास्टफोर्सचे सदस्य आहेत.
 
ते म्हणतात, "तिसऱ्या लाटेत 20 टक्के लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज आहे. त्यामुळे फक्त 200 बेड्स तयार करून फायदा होणार नाही. नागपूरची लोकसंख्या लक्षात घेता कमीत-कमी 5000 बेड्सची आवश्यकता आहे."
 
ठाण्यात उभारणार 100 बेड्सचं सेंटर
ठाणे महापालिकेने पार्किंग प्लाझा कोव्हिड सेंटरमध्ये 100 बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
'शारीरिक नाही मानसिक उपचार देणार'
 
राज्याच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. समीर दलवाई लहान मुलांच्या डिव्हेलपमेंटल बिहेविअरचे तज्ज्ञ (मानसोपचातज्ज्ञ) आहेत.
 
ते म्हणतात, "कोरोनामुळे मुलांच्या मनावर परिणाम झालाय. पहिल्या लाटेत मुलं बाहेर पडली नाहीत. आता मुलांमध्ये संसर्ग वाढलाय. काही मुलांचे आई-वडील मृत्यू पावलेत. त्यामुळे त्यांच्या मनावरील ताण वाढलाय. त्यामुळे फक्त शारीरिक नाही, तर मानसिक उपचार देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत."