मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जुलै 2020 (16:28 IST)

भारत बायोटेकची लस नागपूरमध्ये तिघांना दिली

भारतात भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोरोनावरील देशातील पहिल्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या लसीची चाचणी ही नागपूरमध्ये करण्यात आली आहे. सोमवारी तीन रुग्णांना ही लस देण्यात आली असून ज्या तिघांना ही लस देण्यात आली त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.
 
भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांना नागपूरमधील गिल्लूरकर हॉस्पिटलमधून सुरुवात झाली आहे. या लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्पात सोमावारी दोन पुरुष आणि एका महिलेला लस देण्यात आली. त्या लसीचे या व्यक्तींना कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. पुढील १४ दिवसापर्यंत यांना कोणतीही लक्षणे किंवा त्रास नसल्यास कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोज दिला जाणार आहे.
 
नागपूरचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह यामध्ये आणखी चार संस्थाचा समावेश आहे. तसेच कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यात आल्यानंतर गिल्लूरकर हॉस्पिटलची निवड करण्यात आली होती. त्यानंतर या लसीच्या चाचणीसाठी ५० जण स्वत: पुढे आले. त्यानंतर या सर्वांची तपासणी करुन त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यातील आठ जणांचे नमुने सामन्य आल्यानंतर यातील तिघांना सोमवारी लस देण्यात आली.
 
पहिल्या टप्प्यात दिल्ली, रोहतांग, हैदराबाद, पाटणा या चार ठिकाणी पहिली चाचणी होईल. त्याचे परिणाम पाहून पुढच्या टप्प्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर कानपूर, गोवा, बेळगाव, चेन्नई, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर इथल्या सेंटर्सवरही या चाचण्या केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये ७५० जणांवर ही चाचणी होणार आहे.