श्री ज्ञानेश्वर महाराज मंदीरा लगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत
आळंदीमध्ये आषाढी वारी पालखी सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपला असताना श्री ज्ञानेश्वर महाराज मंदीराच्या परिसरालगतच राहणाऱ्या एका करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मंदिरालगतचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे. “आळंदीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून करोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आल्याने आळंदीमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे मंदिराचा लगतचा परिसर कंन्टेन्मेट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे,” अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.
“आळंदीमध्ये आठ ते दहा रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने अधिक रुग्ण वाढू नयेत ही जबाबदारी वारकरी संप्रदाय आणि आळंदीच्या नागरिकांवर आहे. नियमांचे उल्लंघन करून आळंदीमध्ये प्रवेश केल्यास ज्या प्रकारे पंढरपूरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. तशीच कारवाई आळंदीमध्ये देखील करण्यात येईल,” असा इशाराही प्रांताधिकारी तेली यांनी दिला.