1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (09:06 IST)

राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १० हजार ४९८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात १७७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले
राज्यात  कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या आता ४५९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ रुग्ण आहेत. या शिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे.
 
आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
 
आता नागपूर कारागृहात सुद्धा लॉकडाऊन – गृहमंत्री अनिल देशमुख
 कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील सात कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती कारागृहाची भर पडली असून, हे कारागृहही तातडीने लॉकडाऊन करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
 
यापूर्वीच्या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद व नाशिक ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात आली आहेत.
 
यापूर्वी लॉकडाऊन झालेल्या कारागृहातील कार्यपद्धतीनुसार नागपूर कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी.
 
कारागृहात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. ज्यायोगे त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण होईल.