शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 20 मे 2020 (08:50 IST)

सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल : आरोग्यमंत्री

राज्यात चौथ्या लॉकडाऊनची सुरूवात झाली असून त्यामध्ये नवे नियम देखील जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार रेड झोन आणि नॉन रेड झोन अशा पद्धतीने राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. मात्र, नव्या नियमांनुसार ज्या ठिकाणी ज्या बाबींची सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं फार गरजेचं आहे, अशी भूमिका राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली आहे. ‘कोविडसोबत राहायचंय, तर सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल. मास्कचा नियमित वापर, स्वच्छता, हात वारंवार धुणं, थर्मल स्कॅनिंग ठेवणं गरजेचं आहे, सॅनिटायझरचा वापर केला गेला पाहिजे. लग्नकार्य किंवा अंत्यसंस्कार अशा ठिकाणी ५० हून जास्त लोक असू नयेत’, असं ते म्हणाले आहेत. सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संपर्क साधला.  
 
डबलिंग रेट १० वरून १४ पर्यंत गेला आहे. आपण रोज १५ हजारांहून जास्त टेस्ट करत आहोत. देशभरात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत. राज्यात ६७ ठिकाणी आता चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दर १० लाख लोकांमागे चाचण्या करण्याची क्षमता महाराष्ट्रात सर्वाधिक आहे’, असं देखील त्यांनी नमूद केलं. ‘मुंबई वगळता राज्यात कुठेही बेड उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती नाही. बेड, डॉक्टर, पीपीई किट यांची कमतरता नाही. मुंबईत काही प्रमाणात ही परिस्थिती दिसून येत आहे. मात्र, ती कायमस्वरूपी राहणार नाही, याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी कोविड रुग्णालयं उभारण्याची तयारी करण्यात आली आहे , अशी माहिती त्यांनी दिली.